मुंबईत ड्रग्जचा सुळसुळाट इतका गंभीर आहे, की हे लोण शाळांपर्यंत पोहोचले आहे. लिमलेटच्या गोळ्यांसारखा गांजा, चरस नाक्या नाक्यावर उपलब्ध होऊ लागले आहे. अनेक पॉश एरीयामध्ये कोकेन आणि हेराईन सुद्धा मिळते. या धंद्यात पैसा प्रचंड आहे, सरकारी यंत्रणा पोखरण्याचे टार्गेट या पैशात आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा एखादी मोठी कारवाई होते तेव्हा ड्रग्ज माफीयांची इको सिस्टीम जागी होते. मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर मधमाशा जशा मागे लागाव्या तशी ही इको सिस्टीम अधिकाऱ्याच्या मागे लागते.
कोरोनाच्या काळात पासून तपास यंत्रणांच्या रडारवर एक नवे नाव झळकू लागगले. एक मराठी तरुण. मुळचा नवी मुंबईचा. बारावी पर्यंतचे शिक्षण मुंबईत नंतर उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेलेला. सध्या ज्याचे वय अवघे पस्तीशीच्या आसपास असावे. हा तरुण ड्रग्जच्या धंद्यातील नवा माफीया असला तरी कमी काळात त्याचे साम्राज्य निर्माण केले होते. तरुणाचे नाव नवीन चिचकर.
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबई येथील बेलापूरच्या नीलांबरी इमारतीवर धाड टाकली. अत्यंत उच्च प्रतिचे कोलंबियन कोकेन, तेवढाच उच्च प्रतिचा गांजा. ज्याची किंमत कोकोन एवढीच महागडी म्हणजे एका ग्रामची किंमत १५ हजार रुपये. गांजाचे च्युईंगम. एकूण माल फक्त २०० कोटी रुपयांचा. या कारवाई आधी एनसीबीने २०० ग्रॅम कोकेन पकडले होते. त्याच सुतावरून स्वर्ग गाठत एनसीबीने हा स्वर्ग गाठला. कारवाई इतकी जबरदस्त होती की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांचे एक्सवर पोस्ट अपलोडवरून अभिनंदन केले.
ज्याच्या फ्लॅटमध्ये हा माल मिळाला, त्याते नाव जयकृष्ण गोपाकुमार. प्रकरणाचा खोलवर तपास केल्यानंतर माहिती मिळाली की या ड्रग्ज कार्टेलचा म्होरक्या आहे, नवीन चिचकर जो २०२१ पासून तपास यंत्रणांच्या रडारवर होता.
कारवाईत जप्त करण्यात आलेले कोकेन अतिउच्च प्रतिचे होते. ते कोलंबिया येथून आधी अमेरीकेत आणि तिथून भारतात आणण्यात आले होते. गांजा कॅनेडातून आला होता. भारतात येणारे कोकेन किंवा हेरॉईन युरोप, ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येते या कोकेनचा वापर मात्र भारतात होणार होता. या कार्टेलच्या माध्यमातून येणारे ड्रग्ज बडे सेलिब्रिटी, श्रीमंत असामींना हे पुरवण्यात येत असे.
नवीन चिचकर ब्रिटनमध्ये गेला. तिथे क्रिमिनल सायकॉलॉजी या विषयात उच्च शिक्षण घेतले. गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून तपास यंत्रणांची मदत करण्याचा त्याचा अजिबात इरादा नव्हता. उलट तो गुन्हेगारी जगाकडे आकर्षित झाला. सध्या तो थायलंडमधून ऑपरेट करतो. एनसीबीने बेलापूरमध्ये केलेल्या कारवाईतून जे कार्टेल उघड झाले, हा त्याचा मास्टर माईंड. एनसीबीच्या तपासात आणखी एक बाब उघड झाली. या नवीन चिचकारच्या कार्टेलमध्ये काम करणारी सगळी मुलं तरुण आहेत. उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचे. व्हीओआयपीद्वारे एकमेकांशी संपर्कात राहायचे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. त्यांनी मधमाशांच्या पोळ्याला हात घातला होता. जेव्हा अशा प्रकारच्या कारवाया होतात. तेव्हा ड्रग्ज माफीयांची इको सिस्टीम जागी होते. कामाला लागते. अचानक घावटे यांच्या विरोधात तक्रारी होऊ लागल्या. आरटीआयचे अर्ज केले जाऊ लागले. काही विशिष्ट पत्रकारांनी त्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. घावटे यांना धमक्या येऊ लागल्या. हे पंगे घावटे यांना नवे नाहीत. २०२० मध्ये आंध्रमध्ये कारवाई झाली तेव्हा अमित घावटे दक्षिणेतील राज्यांत एनसीबीमध्ये कार्यरत होते. तेव्हा सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन देशभरात ड्रग्जच्या धंद्याविरुद्ध मोठी कारवाई केली होती. एक मोठे ऑपेरशन तब्बल तीन महिने चालले होते. ड्रग्ज नावाचे प्रकरण फक्त नशे पुरते मर्यादीत राहिलेले नाही. त्याचा थेट संबंध दहशतवादाशी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानातील दहशतीची फॅक्टरी याच ड्रग्जच्या पैशावर चालते. मणिपूरमध्ये गेली दोन वर्षे जो रक्तरंजित धुमाकूळ सुरू आहे, त्यामागे ड्रग्जचा धंदाच आहे.
हे ही वाचा :
८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश
हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त
संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या
त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक
२०२० मध्ये एनसीबीसह तमाम सुरक्षा यंत्रणांनी देशातील नक्षलग्रस्त भागामध्ये होणाऱ्या गांजा आणि अफूच्या शेतीवर कारवाई केली. दहा हजार किलो गांजा जप्त केला. आंध्रप्रदेश, झारखंड, ओडीशा, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांच्याकडून गांजाची शेती करून घेतली जात होती. हा सगळा भाग दाट जंगलांचा आहे. त्यात इथे नक्षलवाद्यांचा सुळसुळाट असल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही इथे शिरायला बिचकत. त्यामुळे दुर्गमचेचा फायदा घेऊन इथे गांजा आणि अफूची शेती जोरात होती. हा गांजा विकून आलेला पैसा नक्षलवाद्यांच्या शस्त्र खरेदीसाठी वापरण्यात येत होता. गेली काही वर्षे सतत या आर्थिक स्त्रोतावर केंद्र सरकार आघात करत असल्यामुळे २०२६ च्या अखेर पर्यंत देशातील नक्षलवाद पूर्णपणे संपवून टाकण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. हा आत्मविश्वास या आर्थिक नाड्या उद्ध्वस्त करणाऱ्या कारवाईतूनच आलेला आहे.
जंगलातील ड्रग्जचे साम्राज्य निर्माण करणारे जर मगरमच्छ असतील तर मुंबईत ड्रग्जच्या धंद्यात असलेल्यांना डायनासोर म्हणावे लागेल. हे डायनासोर आता त्यांच्या इको सिस्टीमसह एनसीबीच्या मागे लागले आहेत. त्यांना घरचे भेदीही सामील आहेत. सामना मोठा कठीण आहे. तो कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहाणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)