अभिनेता मुकेश खन्ना यांनी सेक्सची इच्छा व्यक्त करणाऱ्या तरुणींवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. समाज माध्यमांमध्ये त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. एके काळी त्यांची महाभारतातील भीष्माची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांची शक्तीमान ही मालिकाही गाजली. परंतु तो एक जमाना होता. सध्या तरी त्यांच्या अभिनयाचे दुकान बंद आहे. किंवा ते निवृत्त जीवन जगत आहेत. अशा काळात लोकांचे तुमच्याकडे लक्ष नसते. तेव्हा फोकस तुमच्याकडे वळवण्यासाठी तुम्हाला काही तरी खळबळजनक बोलत राहावं लागत. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही आदरणीय आहात. परंतु विनाकारण समाजसुधारक किंवा क्रांतिकारकाच्या भूमिकेत शिरून लोकांना सल्ले वाटत फिरलात तर विनाकारण हसे होईल, हे अशा मंडळींना कानठळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजात सांगण्याची गरज आहे.
भारदस्त आवाज आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मुकेश खन्ना यांनी एक काळ गाजवलेला आहे. त्यांनी केवळ भीष्माची भूमिका अजरामर केली एवढंच नाही तर शक्तीमानच्या रुपात भारताला पहीला देसी सुपरहिरो दिला. शक्तिमान ही मालिका सुपरहिट होती. या मालिकेच्या अखेरच्या पाच मिनिटात लहान मुलांसाठी काही संस्कारक्षम सल्ले देण्याची मुकेश खन्ना यांनी सुरुवात केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून मुकेश खन्ना यांना संस्कार सल्ले देण्याची सवय लागली असावी. अशी सवय जडल्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होतात. समोरच्याला तुमच्या सल्ल्यांची गरज आहे की नाही याचा विचार न करता माणूस सल्ले द्यायला लागतो. अनेकदा हे खूपच तापदायक असते.
जी मुलगी सेक्सची इच्छा व्यक्त करते, ती मुलगी धंदा करणारी मुलगी आहे असे समजा. सभ्य समाजातील मुली असे करत नाहीत… असे विधान मुकेश खन्ना यांनी केलेले आहे. मुळात मुकेश खन्ना यांना संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत शिरण्याची काही गरज नव्हती. अभिनेते अलिकडे कारण नसताना समाजसुधारकाच्या भूमिकेत शिरत असतात. त्यांना बोलायचे असेल तर त्यांनी सिने इंडस्ट्रीवर बोलावं. जी अत्यंत बरबटलेली आहे. पैसा हेच इंडस्ट्रीचे केंद्र असून त्याच्याच भोवती सगळे फिरत असतात. ड्रग्जचे सेवन, रात्रभर रंगणाऱ्या पार्ट्या, कामाच्या मोबदल्यात होणारे यौन शोषण या इंडस्ट्रीचा अविभाज्य भाग. पैशासाठी वाट्टेल त्या भूमिका करणारे, सुपाऱ्या वाजवणारी ही मंडळी अनेकदा क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या भूमिकेत शिरतात. हे करताना आपले चारित्र्य काय, समाजासाठी आपले योगदान काय याचा त्यांना विसर पडतो.
हे ही वाचा:
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
बेपत्ता मुलांना शोधून पालकांच्या चेहऱ्यावर आणणार ‘मुस्कान’
उद्धव ठाकरे यांची ती चूक आणि मविआवर घाव
अभिनेता सुबोध भावे याने अलिकडे पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात असेच सनसनाटी विधान केले. ‘आपण लायकी नसणाऱ्यांच्या हाती देश दिलेला आहे. राजकारण्यांच्या हाती देश देऊन काहीही उपयोग नाही, ते काय करतात हे आपल्या समोर आहेच.’ असे विधान भावे यांनी केले होते. देशाचा एक नागरीक म्हणून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. परंतु बोलत असताना आपले चारित्र्य, कृती आपल्या विधानांना समांतर जाणारी आहे, की छेद देणारी याचा विचार ज्याने त्याने करायला हवा. नाही तर नंतर शब्द गिळून माफी मागावी लागते. ‘लोकमान्य’ सिनेमात भूमिका केल्यामुळे आपण ‘लोकमान्य’ होत नाही याचे भान कलाकारांनी बाळगण्याची गरज आहे. आपण कलाकार आहोत, देशासाठी घरादारावर निखारे ठेवणारे समाजसुधारक किंवा क्रांतिकारक नाही, हे लक्षात घेतले तर अशा गफलती होणार नाहीत.
सध्या बऱ्यापैकी सक्रीय असलेल्या भावे यांना जे कळले नाही ते निवृत्त जीवन जगत असलेल्या मुकेश खन्ना यांना कसे कळेल? प्रत्येक काळात जुन्या पिढीला ‘नव्या पिढीने संस्कार हरवले आहेत’, या विचाराने पछाडलेले असते. आपल्या तरुणाईत आपण काय काय उपद्व्याप केले, त्याचा सोयीस्कर विसर पडल्यामुळे हे घडते. मुकेश खन्ना यांचा नेमका हाच प्रॉब्लेम झाला आहे.
अशा संस्कृती रक्षकांना, शीघ्र समाज सुधारकांना आवरण्याची गरज आहे. तुम्ही कलाकार आहात, मनोरंजन करा, निर्मात्याकडून त्याचे मोल घ्या आणि शांत बसा हे सांगण्याची गरज आहे. देशासाठी काही ठोस योगदान द्याल तेव्हा लोकांना शहाणपणा शिकवायला जा, असे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. शहाणपणाचा ठेका आपणच घेतलाय, हा त्यांचा गैरसमज दूर करण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)