25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयमोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके...

मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…

संसद हे लोकशाहीचे सर्वात उत्तुंग मंदीर आहे. मोदींच्या प्रयत्नांमुळे या मंदिराला आता भव्यतेची नवी झळाळी प्राप्त झालेली आहे.

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. देशाच्या इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण. विरोधी पक्षातील अनेकांनी या सोहळ्यावर बहीष्कार टाकला होता. परंतु त्यामुळे या सोहळ्याचा दिमाख कणभरही कमी झाला नाही. देशात काही शुभ घडत असेल तर उर बडवायचे आणि नाक कापून अवलक्षण करायचे असा प्रकार विरोधकांनी गेल्या काही वर्षात सुरू केलेला आहे. जनतेलाही आता त्याची बऱ्यापैकी सवय झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात एक नवी परंपरा सुरू केली आहे. ज्या प्रकल्पाची कोनशीला मोदींच्या हस्ते ठेवली जाते त्या प्रकल्पाचे उद्घाटनही तेच करतात. मोदींनी संसदेच्या नव्या इमारतीची घोषणा २०१९ मध्ये केली होती. २०२० मध्ये नव्या इमारतीचे भूमीपूजन झाले आणि आज म्हणजे २८ मे २०२३ रोजी, इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीसारख्या शुभमुहूर्तावर हे राष्ट्रकार्य संपन्न झाले.

देशासाठी कामाचा हा धडाका नवा आहे. जिथे प्रकल्प सुरू झाल्यानंतर कित्येक दशकं रखडायचे, तिथे आता भव्य-दिव्य प्रकल्पांची निर्मिती ठराविक मुदतीत पूर्ण होते आहे. रखडपट्टीमुळे वाया जाणाऱ्या पैशांची बचत होते आहे. जनतेच्या दृष्टीनेही ही बाब आनंददायी आहे. संसद हे लोकशाहीचे सर्वात उत्तुंग मंदीर आहे. मोदींच्या प्रयत्नांमुळे या मंदिराला आता भव्यतेची नवी झळाळी प्राप्त झालेली आहे. पुढे अनेक दशके भारतीयांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्याचे काम इमारतीतून चालणार आहे. त्यामुळे आजचा उद्घाटन सोहळा खरेतर लोकशाहीचा उत्सव ठरायला हवा होता. परंतु भारतातील विघ्नसंतोषी विरोधकांनी या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. बहिष्कारास्त्राचा वापर करून मोदींचे तोंड काळे करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रचे मुख्यमंत्री जगन रेड्डी, अण्णाद्रमुक, शिवसेना, अकाली दल, असे अनेक पक्ष या पोटदुख्या बहिष्कार तंत्राला बळी पडले नाहीत. तरीही काँग्रेसच्या नादी लागून देशातील १९ पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला.

नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे ही मागणी विरोधकांनी लावून धरली होती. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठेपणा मिळालेला त्यांना नको होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही मागणी केली. काँग्रेसच्या तैनाती फौजेने त्यांची री ओढली. त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिउबाठा यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले, ‘इमारत उभारताना आम्हाला विश्वासात घेतले नव्हते’, मुळात पवार यांचा दावा हास्यास्पद आहे. मोदी संसदेची इमारत उभारत होते. ते काही पाकिस्तानवर हल्ला करायला जात नव्हते. त्यासाठी विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याची गरज काय? खरे तर पाकिस्तानवर हल्ला करतानाही विरोधी पक्षांना विश्वासात घेऊ नये, अशी परीस्थिती आहे. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानची मदत मागताना अवघ्या देशाने पाहिले आहे. जनतेने निवडलेले सरकार जनतेचे काम करण्यासाठी असते. प्रत्येक काम करताना विरोधी पक्षांना कानात जाऊन सांगण्याची गरज नसते.

हे ही वाचा:

‘चालण्यासाठी वापरली जाणारी काठी म्हणून सेंगोलचा वापर झाला होता’!

म्हणून गरज होती नव्या संसद भवनाची !…माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘संग्रहालयांची बात’

असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा

उद्घाटनाच्या वेळी झालेली ऐतिहासिक सेंगोलची प्रतिष्ठापना, होम-हवन, मंत्रोच्चार, शंखध्वनी याचा पवारांना जास्त त्रास झालेला दिसतो. या सगळ्या गोष्टी देशाला मागे नेणाऱ्या आहेत, अशी टीका त्यांनी केलेली आहे. हिंदुत्वाच्या प्रतिकांचा पवारांना प्रचंड तिरस्कार आहे. जिथे हिंदुत्वाचे अस्तित्व ठसठशीतपणे जाणवते तिथे पवारांचा पोटशूळ वाढतो हा अनुभव नवा नाही. अल्पसंख्यांक मतांसाठी कायम लाळ गाळणाऱ्या देशातील तथाकथित पुरोगामी नेत्यांना होम-हवनाचे प्रचंड वावडे आहे. पवार त्यांचे अग्रणी आहेत.

सुप्रिया सुळे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण व्हॉट्सएप वरून आल्याचे दु:ख आहे. मोदींनी त्यांच्या घरी नारळ घेऊन निमंत्रण द्यायला गेले पाहिजे होते, अशी त्यांची अपेक्षा असावी. मुळात आपला पक्ष केवढा, पसारा केवढा हे लक्षात घेऊन सुप्रिया सुळे बोलल्या असत्या तर बरं झालं असंत. पक्षाच्या अधिवेशनात पवारांना अजीमो शान शहंशाह… म्हणणे ठीक आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व साडे तीन जिल्ह्यामध्ये आहे, ही वस्तुस्थिती. बाकी पवारांना त्यांचे लोक प्रेमापोटी देशाचे नाहीत तर ब्रह्मांडाचे नेते समजू शकतात.

बिहारच्या राजदच्या नेत्याला नवे संसद भवन पाहून शवपेटीची आठवण झाली. जनतेने या ओंगळवाण्या राजकारणाचा अंत शव पेटीतच केला तर नवल वाटायला नको. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले नाही म्हणून विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला हे खरे नाही. मोदींनी नवे संसद भवन उभारण्याची घोषणा केली तेव्हापासून विरोधकांच्या पोटात मुरडा आला आहे. कोरोनाच्या काळात रोजगार बुडाले असताना, लोकांची उपासमार होत असताना सरकार नवे संसद भवन उभारून पैशांची उधळपट्टी करीत असल्याची टीका विरोधकांनी केली. तेव्हाही असा ओरडा करण्याची सुरूवात राहुल गांधीनी केली होती. प्रत्यक्षात नव्या संसदेच्या निर्मितीमुळे कोरोनाच्या काळात ७ हजार लोकांना रोजगार दिले. ही संख्या छोटी नाही.

कोरोनाच्या काळात मातोश्री-२ ची निर्मिती करणारे आणि मढमध्ये लॉकडाऊनच्या काळात बेकायदा स्टुडीयो उभारणारेही नव्या संसदेची निर्मिती म्हणजे पैशाची उधळपट्टी या गलक्यात सामील होते. ‘मोदी श्रेय घेतायत’, प्रत्येक ठिकाणी ‘मै ही मै हू…’ ही मोदींची भूमिका असते. हा आणखी एक विनोदी आक्षेप. मोदी जर काम करत असतील तर श्रेय सुद्धा तेच घेणार. ते राजकीय नेते आहेत, संन्यासी नाहीत.

मोदींवर होणारी टीका ही पोटदुखीतून निर्माण झालेली आहे. मोदींच्या करिष्म्यामुळे आपला गिनीपिग होतोय, आपले प्रभावक्षेत्र कमी होते आहे, हे या पोटदुखीचे कारण. मोदींमुळे लायकी नसताना आई-बापाच्या नावावर सत्ता मिळवण्याचे दिवस संपले. हे या जळफळाटाचे कारण. जितकी मोदींची झळाळी वाढेल तितके आपले चेहरे काळवंडतील ही भीती या पोटदुखी मागे आहे. त्यामुळे नव्या संसद भवनाची घोषणा झाली तेव्हापासून विरोधकांनी नाट लावायला सुरूवात केली. काम इतके भव्यदिव्य आणि वेगाने होईल अशी विरोधकांची अपेक्षा नव्हती. आता काम झाल्यावर मोदी पुन्हा चमकणार या असूयेने विरोधकांच्या पोटात गोळा आला. राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांची ढाल करून मोदींवर भडीमार करण्याचे काम सुरू झाले. हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी झाला याचीही अनेकांना जळजळ होते आहे. परंतु मोदी इतके उंच झाले आहेत, की विरोधकांच्या थुंकांचे फवारे त्यांच्याच तोंडावर उडतायत. देशाच्या कोट्यवधी जनतेने हा सोहळा लाईव्ह पाहीला. संसदेच्या भव्यतेमुळे त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

विरोधकांचा पोटशूळ संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे होतोय अशातला भाग नाही. मोदी सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्षांचा उर बडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. देशाच्या दृष्टीने एखादा महत्वाचा उपक्रम घडत असेल तर ही रुदाली गँग सुरू होते. कुठे काय चांगले होते आहे, याची फक्त ही मंडळी वाट पाहात असतात. राम जन्मभूमी मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा झाला तेव्हाही यांनी रडारड केली, उर बडवले. मोदी सरकारने २०२१ मध्ये संविधान दिन साजरा करण्याची घोषणा केली, तेव्हा १५ पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. ब्रह्मपुत्रेवर ढोला-सादीया पुलाचे उद्घाटन झाले, तेव्हा यांची मूळव्याध बळावली होती. काशी कॉरीडोअरची निर्मिती झाली तेव्हा यांनी बोटं मोडली. संसदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी त्याची पुनरावृत्ती झाली. जानेवारी २०२४ मध्ये अयोद्धेत भव्य राम मंदिराचे लोकार्पण होईल तेव्हा तर देशात बरनॉलची विक्रमी विक्री होईल असा अंदाज आहे.

विरोधी पक्षाला देशहिताशी काहीही घेणे देणे नाही. सत्ता गमावल्याचे नैराश्य ही मंडळी बहीष्काराच्या माध्यमातून काढत असतात. जनतेला आता या रडारडीची सवय झाली आहे. परंतु कोणीही कितीही बोंब ठोकली, उर बडवले तर भारताचा सूर्योदय आता कोणी रोखू शकत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा