एका वाक्यात कचरा केला…

ठाकरेंची मानसिकता सरंजामी आहे

एका वाक्यात कचरा केला…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते विधिमंडळात कमी आणि पत्रकारांच्या कॅमेरासमोर जास्त बडबड करत असतात. सभागृहातील कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाकरे पितापुत्रांबाबत पत्रकारही फारशी चर्चा करताना दिसत नाही. ठाकरे पिता-पुत्रांनी विधिमंडळात कोणते मुद्दे उठवले यापेक्षा ते आले, त्यांनी अमक्याकडे पाहिले, तमक्याकडे दुर्लक्ष केले, ढमक्याशी हस्तांदोलन केले, अशा प्रकारच्या बातम्या देण्याचे काम
पत्रकार मंडळी करत असतात. सभागृहात फिरकायचे नाही आणि वर ‘आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही’, असा कांगावा आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते करत असतात. त्याच आदित्य ठाकरे यांने पितळ उघडे पाडण्याचे
काम भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी अधिवेशनादरम्यान केले.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान नियम २९३ अंतर्गत चर्चा होते. विरोधी पक्षांच्या वतीने मागण्यांचा प्रस्ताव ठेवला जातो. सत्ताधारी पक्षातर्फे त्यावर उत्तर दिले जाते. हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. विरोधी पक्षांच्या वक्त्यांच्या यादीत सगळ्यात पहिले नाव होते आदित्य ठाकरे यांचे होते. ते विरोधी पक्षांचे ओपनिंग बोलर होते. विरोधी पक्षात अनेक वरिष्ठ सदस्य असताना त्यांना हे मोठेपणे देण्यात आले होते. कारण ते ठाकरे आहेत. तेच चर्चेची सुरूवात करणार होते. त्यांच्या नावाने ढोल बडवण्याची सुरूवात झाली होती. आदित्य ठाकरे चर्चेची सुरूवात करणार, ते सरकारवर प्रहार करणार अशी वातावरण निर्मिती करण्यात येत होती. प्रत्यक्षात चर्चेला सुरूवात झाली तेव्हा आदित्य ठाकरे सभागृहात उपस्थितच नव्हते. त्यांच्या जागी किल्ला लढवला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी. चर्चेची सुरूवात त्यांनीच केली. त्यांच्यानंतर अतुल भातखळकर बोलायला उभे राहिले. म्हणजे तसा प्रघातच आहे, विरोधी पक्षातर्फे कलम २९३ चा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षाचा नेता बोलल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून एक नेता त्यांना उत्तर द्यायला उभा राहतो.

भातखळकर यांनी पहिल्या चार वाक्यात आदित्य ठाकरे यांची पिसं काढली. वक्त्यांच्या यादीत पहिले नाव आदित्य ठाकरे यांचे होते, परंतु ते सभागृहात उपस्थित नाहीत, हेच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते राज्यपालांकडे जाऊन सांगतात आम्हाला सभागृहात बोलू दिले जाते नाही. त्यानंतर भातखळकर यांनी प्रस्तावाच्या विरोधात त्यांचे भाषण सुरू केले. जे भातखळकर म्हणाले त्यात कणभर सुद्धा असत्य नाही. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला बोलू दिले जात नाही, अशी तक्रार करण्यासाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने महामहीम राज्यपालांची भेट घेतली होती. सत्ताधाऱ्यांच्याविरोधात तक्रार केली होती. हा निव्वळ कांगावा होता, हे भातखळकर यांनी उघड केले.

सभागृहात मीठाची गुळणी करून बसायचे आणि बाहेर पत्रकांरांसमोर बडबड करायची हा ठाकरेंचा खाक्याच आहे. आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते व्हावेत म्हणून संजय राऊत जोरदार बॅटींग करत होते. उबाठा शिवसेनेकडे तेवढे
संख्याबळ नाही. परंतु संजय राऊतांच्या आशावादाला संख्याबळाची कधीही आवश्यकता नसते. ते आजही उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाच्या आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवू शकतात. कारण राऊतांना माहिती
आहे, बोलायला पैसेही लागत नाही आणि संख्याबळही लागत नाही. तुमच्याकडे पोकळ शब्दांचे बळ असले तरी पुरे. त्यामुळे ते हिरीरीने आदित्य ठाकरे हेच विरोधी पक्षनेते पदासाठी योग्य उमेदवार आहेत, त्याचा प्रचार करत होते. राऊतांना चूक ठरवण्याचे काम स्वत: आदित्य ठाकरे यांनीच केले.

विरोधी पक्ष नेते पद हे मिरवायचे पद नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. अभ्यास करावा लागतो. फायली वाचाव्या लागतात. अधिवेशना दरम्यान सभागृहात तळ ठोकून बसावे लागते. सत्ताधारी पक्षाचे सदस्य काय म्हणतायत, ते ऐकावे लागते. सत्ताधारी नेत्यांच्या भाषणातील मुद्द्यांचा वापर करून त्यांना घेरावे लागते. हे काम सोपे नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. न कंटाळता सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे लागते. यासाठी प्रचंड संयम लागतो. आदित्य ठाकरे यांच्याकडे संयमही नाही, अभ्यासही नाही आणि वक्तृत्व गुणही नाहीत.

हे ही वाचा:

आयपीएलचे नऊ दिग्गज खेळाडू, जे आजही मैदान गाजवतायत!

युवराज सिंग डब्ल्यूसीएल सीझन २ मध्ये भारताचे नेतृत्व करणार

औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!

चेन्नई सुपर किंग्सची ताकद, कमजोरी आणि रणनीती

संख्याबळाचे एक महत्व असते, परंतु तर्कपूर्ण युक्तिवाद केले तर संख्याबळाशिवायही सत्ताधाऱ्यांची कोंडी करता येते. कधी काळी रामभाऊ म्हाळगी, अटलबिहारी वाजपेयी अशा दिग्गजांनी हे दाखवून दिलेले आहे. संख्याबळाशिवाय आमचे अडत नाही, हे दाखवून देण्याची आदित्य ठाकरे यांनाही संधी होती. परंतु अधिवेशनातील त्यांची कामगिरी पाहिली तर ती अत्यंत
निराशाजनक आहे. ना लक्षवेधी, ना तारांकीत प्रश्न, ना चर्चेत सहभाग. सभागृहात अनेक अनुभवी सदस्य मुद्दे मांडत असतात, राज्यातील प्रश्नांची चर्चा करत असतात. सभागृहात उपस्थित राहून आदित्य ठाकरे यांनी त्यांचे ऐकले जरी असते तरी बरेच शिकता आले असते. परंतु केंद्रातील राजकारणात गांधी परिवाराची मानसिकता जशी सरंजामी आहे, विरोधकांना तुच्छ लेखणारी आहे, आम्ही देशावर सत्ता राबवली आहे, हे काय आम्हाला शिकवणार? अशा प्रकारची आहे. तशीच मानसितका ठाकरेंची आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सभागृहात कमीत कमी वेळ दिला. अर्थसंकल्पावर
ते बोलले नाहीत. कोणत्याही चर्चेत त्यांनी फारसा सहभाग घेतला नाही.

राज्यातील समस्या तर दूरची बाब, मतदार संघातील समस्यांवरही ते बोलेले नाहीत. केवळ मुखदर्शन. सभागृहात डोकावायचे, अर्धा पाऊणतास बसायचे आणि नंतर पत्रकारांसमोर बडबड करून काढता पाय घ्यायचा. राज्य सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे विषय नव्हते असे नाही. अनेक विषय असे आहेत, की ज्यावर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यात येऊ शकते. परंतु विरोधी पक्षात प्रचंड शैथिल्य आलेले आहे. फार मेहनत घेण्याची कोणाची तयारी दिसत नाही. सरकारशी भिडण्याची तयारी नाही. जेव्हा शक्य होईल तेव्हा विरोधी पक्षाला टांग देऊन सत्ताधारी पक्षात कसे सामील होता येईल, अशी मानसिकता असलेले बरेच लोक आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते सभागृहात येत नसत. जेव्हा या मद्द्यावर त्यांना चुकून माकून कोणी छेडले, तर मोदी तरी संसदेत पूर्णवेळ कुठे असतात? असा सवाल विचारून समोरच्याला गप्प करण्याचा प्रकार होत असे. कुठे १८ तास काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुठे घराच्या बाहेर न पडणारे, मला अर्थसंकल्पातले काही कळत नाही म्हणणारे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदालाही मिरवायचे पद बनवून टाकल्यामुळे त्यांचे चिरंजीव विरोधी पक्षनेते बनून मिरवू इच्छित होते. तेही संख्याबळ नसताना. अधिवेशनातील कामगिरीमुळे त्यांचे पितळे उघडे पडले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version