चमत्कार… यासिन मलिक झाला गांधीभक्त, शिवभक्त झाले राहुल गांधी

चमत्कार… यासिन मलिक झाला गांधीभक्त, शिवभक्त झाले राहुल गांधी

सरड्यासारखा रंग केवळ राजकारणी बदलतात असे नाही, दहशतवादी सुद्धा यात मागे नाहीत. गेली ३० वर्षे आपण गांधीवादी आहोत, स्वतंत्र काश्मीरसाठी याच मार्गाने आपण आंदोलन करीत आहोत, असा दावा UAPA अंतर्गत तिहार तुरुंगात सजा भोगत असलेला खतरनाक दहशतवादी यासिन मलिक याने केला आहे. UAPA न्यायालयासमोर बाजू मांडताना त्याने हा युक्तिवाद केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मेरा देश बदल रहा है, असा दावा मोदी समर्थकांकडून वारंवार करण्यात येतो. त्यात बरेच तथ्यही आहे. आता हेच पाहा ना, मलिक गांधीवादी असल्याचा दावा करतोय, राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतायत. उद्धव ठाकरेंचा पक्ष टीपू जयंती साजरी करतो आहे. सगळीकडेच हे आमुलाग्र परिवर्तन दिसू लागले आहे.

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा हा म्होरक्या. १९८८ मध्ये यासिनने ही संघटना स्थापन केली. १९९० पासून त्याने काश्मीर खोऱ्यात रक्तपात सुरू केला.

हम महकूमो के पाओ तले

जब धरती धड धड धडकेगी

और अहल ए हकम के सर उपर

जब बिजली कड कड कडकेगी

जब अर्ज ए खुदा के काबे से

सब बुत उठाए जाएंजे

हम देखेंगे

लाजीम है की हम भी देखेंगे…

ही फैजची कविता तो मोठ्या जोशात म्हणायचा. अर्ज ए खुदा के काबे से सब बुत उठाए जाय़ेंगे, ही तर उघड उघड हिंदूंच्या विरोधात चिथावणी होती. सरकारला तर होतीच. मलिकने रक्तपाताची सुरूवात केली वायुदलातील चार जवानांच्या हत्येपासून. १९९० मध्ये काश्मीर खोरे हिंदू मुक्त करण्याची मोहीम दहशतवादी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या अभद्र युतीने सुरू केली, त्यातही मलिकची महत्त्वाची भूमिका होती. १९९४ पासून म्हणे याने गांधीवादाच्या मार्गावर चालण्यास सुरूवात केली. त्याकाळी काँग्रेसवाले दहशतवाद्यांशी चर्चा करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा जोरदार प्रयत्न करायचे. पाकिस्तानची दलाली करणारी हुरीयन कॉन्फरन्स नावाची संघटना काँग्रेसने पोसली होती. त्या काळात हुरीयतचे नेते दिल्लीत आले तर एखाद्या विदेशी मुत्सद्यासारखी त्यांची बडदास्त ठेवली जायची. याच काळात २००६ मध्ये यासिन मलिक पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भेटला. या भेटीत दोघांनी गांधीवादाबाबत चर्चा केल्याची दाट शक्यता आहे. मोदी सत्तेवर आल्यानंतर दहशतवाद्यांची चोळेगिरी बंद झाली. त्यांना दंडूक्यांचा वेळ प्रसंगी काडतुसांचा प्रसाद मिळायला लागला. मलिक सारख्यांची वेगळ्याप्रकारे खातिरदारी सुरू झाली.

सध्या हा आजीवन जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. तुरुंगात गांधीवादाची पारायणे करतो आहे. यासिन मलिक याने स्वीकारलेला गांधी वाद हा नेमका महात्मा गांधी यांचा गांधीवाद आहे की सोनिया किंवा राहुल गांधी यांचा गांधीवाद आहे हे कळायला मार्ग नाही. जसे राहुल गांधी आज कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार का करीत होते, तसाच मलिकही गांधींचा उदोउदो का करतोय? हे ही कळायला मार्ग नाही. या वैचारीक निष्ठा अचानक निर्माण झालेल्या आहेत. मलिकने यापूर्वी कधीही गांधींचे नाव घेतले नाही. तसेच २०२४ पूर्वी राहुल गांधी यांनी किंवा त्यांच्या मातोश्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केल्याचे कुणाच्या ऐकिवात नाही. सोनिया गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सोडा, साधे नाव घेतल्याचा व्हीडीओ कुणी दाखवावा.

मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राहुल गांधींनी छत्रपतींचे नाव घेणे सुरू केले, कारण ते राजकीय सोयीचे होते. राहुल गांधी छत्रपतींच्या काळात नव्हते हे बरे झाले. नाही तर ज्या शिवछत्रपतींनी अठरा पगड जातींचे लोक सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली त्या काळात राहुल गांधी प्रत्येकाच्या जाती विचारत फिरताना कसे वाटले असते? अष्टप्रधान मंडळात दलित आणि ओबीसी किती? असा बिनडोक सवाल त्यांनी केला असता तर महाराजांच्या मावळ्यांनी त्यांचे नेमके काय केले असते? अष्टप्रधान मंडळात पेशवे मोरोपंत पिंगळे, सेनापती हंबीरराव मोहीते, अमात्य रामचंद्र नीलकंठ, सचिव अनाजी दत्तो, सुमंत जनार्दन पंडीत, मंत्री दत्तो त्रिमल, न्यायाधीश बाळाजी पंडीत, छांदोगामात्य रघुनाथ पंडीत अशा दिग्गजांचा समावेश होता. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात जातीपातींचे स्तोम नव्हते. जातीची ना लाज होती, ना माज होता. चर्चा होती ती ध्येयाची आणि त्यासाठी ज्याच्या त्याच्या क्षमतेने जो तो योगदान देत होता. वेळ पडल्यास बलिदानही करत होता. सगळ्या जाती एकवटून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आततायी धर्मांध अशा इस्लामी सत्तेच्या विरोधात लढत होत्या.

हे ही वाचा..

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्द्ल भाविकांकडून समाधान

राहुल गांधी यांची भाषा ‘हू किल्ड करकरे’ हे प्रचारकी पुस्तक (की कादंबरी) लिहीणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या सारखी आहे. त्यांनी दावा केला होता की आयबी आणि रिसर्च एण्ड एनालिसिस विंगचे सगळे प्रमुख हे ब्राह्मण होते. काँग्रेसने नियुक्त केलेले हे सगळे प्रमुख आरएसएसला सामील होते. हा तर्क तर इतका उफराटा होता की मेंदू गहाण ठेवलेला माणूसही त्यावर विश्वास ठेवणार नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी संघवाल्यांच्या हाती गुप्तचर यंत्रणांची धुरा देतील असा दावा एखादा मूर्खच करू शकतो. मुश्रीफ यांचा सगळा खटाटोप हिंदू समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी होता. त्यांनाही संघाला टार्गेट करायचे होते, राहुल गांधीही तेच करीत आहेत.

काँग्रेस जी विचारधारा मानते ती गांधी- नेहरुंची विचारधारा आहे. त्या विचारधारेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेशी काडीचाही संबंध नाही. आक्रमक धर्म- संस्कृती बुडवत असेल तर त्याला फाडा, त्याची बोटे छाटा, त्याला नेस्तनाबूत करा ही छत्रपतींची विचारधारा होती. तर धर्म- संस्कृती नष्ट करणारा दांडगाई करणारा असेल तर त्याच्याशी जुळवून घ्या, वेळप्रसंगी नाक रगडून जुळवून घ्या, ही गांधींची विचारधारा होती. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिहीदी मुस्लीम नेत्यांच्या दांडगाई समोर वाकून देशाची फाळणी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी छत्रपतींचे नाव न घेतलेले बरे. काँग्रेस हा मुस्लीमांचा पक्ष आहे, असे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी तर अजिबात घेऊ नये. छत्रपतींचे नाव त्यांना पेलवणार नाही आणि पुन्हा मुस्लीम मतदार नाराज होण्याची भीतीही आहेच.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version