जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

या मोर्चाने राजकीय वारा कोणत्या दिशेने वाहतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट केले

जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

मुंबईत गेल्या दोन महिन्यात मोठे मोर्चे निघाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मिळून १७ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. सरकार गमावल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. काल २९ जानेवारी रोजी सकल हिंदू समाजाने लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी मोर्चा काढला. हा मोर्चा महाविकास आघाडीची मळमळ वाढवणारा होता. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याशिवाय निघालेल्या या मोर्चाने राजकीय वारा कोणत्या दिशेने वाहतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

रविवारच्या दिवशी थोडं नेहमीपेक्षा उशीरा उठून, निवांत नाश्ता आणि त्यानंतर साग्रसंगीत जेवण असा सुशेगात कार्यक्रम बाजूला ठेवून मुंबईकर मोठ्या संख्येने हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी रस्त्यावर उतरले होते. राज्यात १९ ठिकाणी असे मोर्चे यापूर्वी निघाले आहेत. सर्वच ठिकाणी प्रचंड संख्येने जनतेने गर्दी केली होती. त्यामुळे मुंबईचा मोर्चा अर्थातच मुंबई पुरता मर्यादित होता. तरीही मविआच्या मोर्चाशी तुलना करता मोर्चात मोठ्या संख्येने लोक आले होते.

महाविकास आघाडीने १७ डिसेंबर रोजी काढलेला मोर्चा हा राज्याचा होता. तीन पक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात राज्यभरातून संख्या आणण्यासाठी तीनही पक्षांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली होती. मोर्चाच्या यशासाठी भरपूर बॅनरबाजी करण्यात आली. पैसा ओतण्यात आला. परंतु इतके श्रम करून सुद्धा मोर्चा पडला. मोर्चाचे यश दाखवण्यासाठी शिउबाठाचे नेते संजय राऊत यांना मराठी क्रांती मोर्चाचा फोटो वापरावा लागला होता. सोशल मीडियाच्या काळात कोणाचेही पाप आणि कुणाची थाप फार काळ लपून राहात नाही. त्यामुळे संजय राऊतांची ही कुरापतही लपून राहीली नाही. ते प्रचंड ट्रोल झाले. संजय राऊत यांना दुसऱ्या यशस्वी मोर्चाचा फोटा वापरावा लागला कारण, महाविकास आघाडीच्या मोर्चात राज्यभरातील ताकद लावून सुद्धा फारशी गर्दी जमलेली नव्हती.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख पक्ष. बाकी डावे, समाजवादी अशी राखीव कुमक असताना मोर्चा उताणा पडला.

या उलट चित्र हिंदू जनआक्रोश मोर्चात पाहायला मिळाले. सकल हिंदू समाजाने या मोर्चाची हाक दिली होती. फक्त शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांचे नेते, संघ परीवारातील संस्था, अन्य हिंदुत्ववादी संस्था या मोर्चात उतरल्या होत्या. तरीही मोर्चा प्रचंड गर्दीचा झाला. शिउबाठाचा सहभाग नसताना शिवसेना भवनच्या समोरून निघालेल्या या मोर्चाची गर्दी पाहून झालेली मळमळ संजय राऊत यांनी आज सामनातून व्यक्त केलेली आहे.

शिउबाठाला सातत्याने येणारी हिंदूविरोधी उबळ जशी आता लोकांच्याही सवयीची झाली आहे, हिंदूविरोधकांनाही ती लक्षात आलेली आहे. त्यामुळेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची एमआयएमसोबत आधीच आघाडी आहे. त्यामुळे अग अग म्हशी मला कुठे नेशी म्हणत एमआयएम सुद्धा भविष्या महाविकास आघाडीचा घटक बनणार हे स्पष्ट आहे. ज्यांनी सपाचे अबू असीम आजमी यांना मांडीवर घेतले, ते कोणता तर्क देऊन एमआयएमला बाजूला ठेवणार हा मुद्दा आहेच.

वेलकम या गाजलेल्या सिनेमात खानदानी प्रामाणिक कुटुंबात मुलाचं लग्न करायचे आहे, म्हणून एका माफीयाच्या मुलीला नकार देणारे कुटुंबिय, त्याच्यापेक्षा मोठ्या माफीयाच्या मुलीशी आपल्या मुलाचा विवाह लावतात, तेव्हा हम क्या बुरे थे यार असा सवाल आधीचा माफीया विचारतो. अबू आझमीबाबत हाच सवाल जलील उद्या शिउबाठाला विचारू शकतात. कारण बाकीचे दोन्ही पक्ष त्यांना मिठी मारायला तयारच आहेत. भविष्यात जे एमआयएमसोबत जाणार आहेत, ते हिंदू जनआक्रोश मोर्चात कसे काय सामील होतील? सकल हिंदू समाजाने आय़ोजित केलेल्या या मोर्चात शिउबाठा सामील न होण्याचे कारण हेच आहे.

हे ही वाचा:

अंदमान-निकोबर भूकंपाने हादरले

सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,

घरातच सापडलेल्या मुलचंदानीला अखेर अटक

मंदीचे सावट तरी विकास दर ६.५ % राहण्याचा अंदाज

 

बाकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला हिंदुत्वाबाबत असलेली पोटदुखी सर्वश्रुत असल्यामुळे ते आणि त्यांचे डावे-लिबलर साथीदार मोर्चात सहभागी झाले नाही आणि ते अपेक्षित सुद्धा होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या लव जिहादवर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणे मला लव माहीती आहे, जिहाद बाबत सुद्धा माहिती आहे. परंतु लव जिहाद काय आहे, हे मात्र माहिती नाही. सुप्रिया सुळेंचे म्हणणे जनता समजून घेऊ शकते. त्यांना संकष्टीच्या दिवशी ज्यांना मटण गोड लागेत, पिताश्रींना ट्रीपल तलाक हा कुराणाचा आदेश आहे असे वाटते, त्यांना लव जिहाद हे काय आहे, हे माहीत नसणे स्वाभाविकच नाही का?

जेवढी संख्या महाविकास आघाडीला एका मोर्चात आणता आली नाही, त्यापेक्षा भव्य असे २० मोर्चे हिंदू समाजाने राज्यभरात काढले. ही हिंदुत्वाची ताकद आहे. हिंदूंना सतत जातीचा तुकड्यांमध्ये विभागून मतांची पोळी भाजणाऱ्यांना मुंबईसह राज्यभरात निघालेल्या मोर्चामुळे हुडहुडी भरली आहे. लव जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी उद्या शिंदे-फडणवीस सरकारने कायदा केला तर त्यामध्ये अडथळे आणण्याचे कामही ही मंडळी करणार आहेत. कारण माणूस असो किंवा पक्ष एकदा का घसरायला लागला की कुठे थांबायचे हे त्यांच्या हातात राहात नाही. तुष्टीकरणाचे राजकारण ज्यांच्या नसानसात भिनले आहे, त्यांचा कडेलोट झाल्याशिवाय हे राजकारण थांबणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version