घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!

भारत जोडो न्याय यात्रा निघण्याच्या मुहूर्तावरच इकडे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान असणाऱ्या देवरा घराण्यातील मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला

घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!

काँग्रेसच्या युवराजांची आजपासून काय ती भारत जोडो न्याय यात्रा निघण्याच्या मुहूर्तावरच इकडे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान असणाऱ्या देवरा घराण्यातील मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपली हक्काची, घरची माणसे टिकवता येईनात आणि काँग्रेसने जोडो यात्रेचा घाट घातला आहे. देवरा यांचा हा प्रवेश मुंबई आणि महाराष्ट्र इतका सीमित अर्थाने नाही तर जे इतके वर्ष काँग्रेसबरोबर राहिले, काँग्रेसच्या पडत्या काळातही राहिले त्यांनी आज हा निर्णय घेऊन काँग्रेसला चपराक दिली आहे.

जरी प्रवेश शिवसेनेत झाला असला तरी मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर जाणार असल्याचा संकल्प सोडून हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नकारात्मकतेला आता त्यांच्याच पक्षातले नेते कंटाळले आहेत तर ते असल्या भारत जोडो वगैरे यात्रा काढून काय साध्य करणार आहेत? हाच मोठा प्रश्न आहे.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी पत्रकार परिषदेत एक प्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली होती. दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जसा दावा सांगितला गेला आणि आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत सभा घेतली तेव्हापासून मिलिंद देवरा यांचा मूड बदलला होता. अर्थात हा तत्कालिक विषय असला तरी त्यांची काँग्रेस पक्षात कशी घुसमट होत होती आणि सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, नकारात्मकता पसरवणे याला ते किती कंटाळले होते ते त्यांनी आजच्या भाषणात बोलून दाखवले आहे. त्यांचे वडील स्व. मुरली देवरा असोत किंवा मिलिंद देवरा यांनी जेव्हापासून राजकारणाला सुरुवात केली तो काळ असेल त्या काँग्रेसमध्ये आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक झाला आहे असे म्हणत एक प्रकारे त्यांनी राहुल गांधी यांची जी राजकारणाची पद्धत आहे त्यावरच आपली नापसंती व्यक्त केली.

मिलिंद देवरा हे अत्यंत उच्च शिक्षित असे नेते आहेत. त्यांचे शिक्षण अमेरिकेतल्या विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे त्यांना देशाची होत असलेली प्रगती बदलत असणारा भारत माहिती आहे. केवळ पक्ष सांगतो म्हणून किती दिवस कोण खोटी टीका करेल? शेवटी ज्याला अंतरराष्ट्रीय पातळीवर आपण देश म्हणून कुठे आहोत हे बघायला येते त्याला अशा खोट्या टीका जास्त दिवस करता येणारच नाहीत. कारण त्याच्या अंतरआत्म्याला माहित आहे की आपण किती खोट बोलून लोकांची दिशाभूल करत आहोत. असाच प्रकार हा मिलिंद देवरा यांच्या बाबतीत झाला आहे. २०१४ पासून बदलणारा भारत जो काँग्रेस असेल किवा अन्य विरोधी पक्षातील नेते असोत यांना दिसतो आहे त्यांची अवस्था ही मिलिंद देवरा यांच्या सारखीच झाली असणार यात काडीमात्र शंका घेण्याचे काही एक कारण नाही. जो हा बदल डोळसपणे बघतो आहे, अनुभवतो आहे त्याला इतके मारून मुटकून बसता येणार नाही. त्यामुळेच मिलिंद देवरा यांनी आज त्यांच्या भाषणात गेन आणि पेन याचे उदाहरण दिले आहे.

तुम्हाला आठवत असेल की याआधी सुद्धा युवराजांनी अशीच भारत जोडो यात्रा काढली होती. ७ सप्टेंबर २०२२ पासून या यात्रेचा प्रारंभ झाला होता. त्याआधी असेच काँग्रेसचे एक जेष्ठ नेते आणि केंद्रात मंत्रिपद भूषवलेले गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेतृत्व अर्थातच राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती आणि काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावेळी यात्रेचा शुभारंभ होण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी झटका दिला होता आणि आज मिलिंद देवरा यांनी झटका दिला आहे. मिलिंद देवरा हे दोनवेळा खासदार आणि केंद्रात मंत्री सुद्धा होते त्यामुळे साहजिकच आजचा त्यांचा शिवसेना प्रवेश ही राष्ट्रीय पातळीवरील बातमी बनली आहे.

विषय जरी मुंबईचा किवा मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाचा असला तरी त्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे हा नक्कीच राष्ट्रीय विषय बनला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते गेले कारण आता त्यांना दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडून लढायची आहे हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. तिथे अरविंद सावंत यांना म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत मिलिंद देवरा हे मोदी लाटेत पराभूत झाले होते. महारष्ट्रात ही जी तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार झाली आहे त्यांचे त्रांगडे कसे होणार आहे याची एक झलक मिलिंद देवरा यांच्या भूमिकेमुळे स्पष्ट झाली आहे. ]

दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. विद्यमान खासदार अरविंद सावंत असले तरी तिथे काँग्रेसचे जे तयारी केलेले इच्छुक आहेत त्यांचे काय? हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मिलिंद देवरा यांनी ही भूमिका घ्यावी लागली आहे. याचा अर्थ असा आहे कि नकारात्मकतेच्या राजकारणाला कांटाळलेल्या नेत्यांना या परिस्थितीमुळे मनासारखा निर्णय घेण्यासाठी उत्तम संधी चालून येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ही झलक आहे अजूनही असे काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको. नाहीतरी बोलता बोलता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणवर पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितले आहे. त्यात भर टाकली आहे ती मंत्री गिरीश महाजन यांनी. ते तर म्हणालेत की कुणाला विश्वास बसणार नाही अशा नेत्यांचे पक्ष प्रवेश येणाऱ्या १५ दिवसांत झालेले दिसतील.

हे ही वाचा:

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

देशातील बहुतांश मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय हि नांदी आहे. अजून बरेच पाणी पुलाखालून जायचे आहे. हळूहळू ते दिसून येईलच. पण आजच्या भारत जोडो यातेच्या निमित्ताने गुलाम नबी आझाद यांच्या नंतर मिलिंद देवरा यांनी दिलेला झटका काँग्रेस आणि आता नव्याने तयार झालेल्या इंडी आघाडीला विचार करायला लावणार आहे.

Exit mobile version