नंदूरबार लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या आवाहनाबाबत उलट सुलट चर्चा होतेय. मोदींना निरर्थक विधाने करण्याची सवय नाही. त्यांनी जे काही सांगितले त्याचा अर्थ एकतर पवारांच्या लक्षात आलेला नाही किंवा लक्षात येऊन सुद्धा ते भलतीच प्रतिक्रिया देतायत. मोदींसोबत जाणार नाही, असा दावा पवारांनी केलेला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्यापासून शरद पवार नव्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. ४ जून नंतर काय करायचे हा त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एक तर काँग्रेसच्या अधिक जवळ जातील किंवा विलिन होतील, असे विधान त्यांनी केलेले आहे.
त्यावर मोदींनी त्यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आहे. माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे मोदींनी पवारांना ऑफर वगैरे दिलेली नाही. ऑफर अशा प्रकारची असू शकत नाही. भाजपामध्ये या असे मोदी म्हणाले असते तर ती ऑफर झाली असती. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा नकली राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांसोबत जावे आणि नकली शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासोबत. ही ऑफर नाही. काँग्रेसच्या वळचणीला जाण्यापेक्षा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जा असे मोदी म्हणाले आहेत.
कुठे खड्ड्यात पडतोयस, त्या पेक्षा घरी जा, अशा प्रकारचे हे विधान आहे. ती पवारांना आणि मराठी माध्यमांना ऑफर का वाटली कोण जाणे?
आता यावर पवारांचे उत्तर लोकशाही न मानणाऱ्यांच्या सोबत जाणार नाही. कधी काळी शिवसेनेबाबतही पवार असे म्हणाले होते. भाजपासोबत जाण्याच्या वाटाघाटी सुरू असताना शिवसेनेला बाजूला ठेवा, आम्ही तुमच्या सोबत येतो ही पवारांची ऑफर होती. भाजपाने पवारांची ऑफर धुडकावली होती. तेव्हा ज्या शिवसेनेचे पवारांना वावडे होते, त्यांच्यासोबत त्यांनी २०१९ मध्ये सत्ता स्थापन केली. त्यामुळे पवारांनी उगाच लोकशाहीच्या बाता करू नये. लोकशाहीला टाळे ठोकण्याचा इरादा ठेवून इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. त्या काँग्रेससोबत पवार गेले. सोनियांच्या विदेशी नेतृत्वावर त्यांना विश्वास नव्हता तरीही ते सोनियांच्या पक्षासोबत गेले. मोदींना पवारांची ही धरसोड माहीती आहे. अस्तित्व टीकवण्यासाठी पवार कोणासोबतही जाऊ शकतात. त्यांची विश्वासघातकी वृत्ती ठाऊक असूनही उपयुक्तेतेच्या कारणामुळे राजकीय पक्षांनी त्यांची आजवर साथसोबत केलेली आहे.
४ जूननंतर पवारांच्या पक्षाच्या पडझडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा परीस्थितीत जर ते आडोसा शोधत असतील तर त्यांना चांगला आडोसा मिळावा या उद्देशाने मोदींनी त्यांना चांगला पर्याय सुचवलेला आहे. मोदींच्या शब्दातली खोच माध्यमांना कळलेलीच नाही. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा तिथे जा असे मोदी म्हणतायत ती राजकीय दयाबुद्धी आहे.
मोदींनी ठाकरेंना नकली संतान म्हटले त्याचा ठाकरेंनाही प्रचंड राग आलेला दिसतोय. आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिलेले आहे. मुळात काँग्रेससमोर नाक रगडून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचा अपमान केला आहे, तेवढा अपमान दुसरा कोणीही करू शकत नाही.
हे ही वाचा:
‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’
नांदेडमध्ये आयकर विभागाची पाच ते सात ठिकाणी छापेमारी!
मुख्यमंत्री केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण, २ जूनला आत्मसमर्पण
नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे, अजितदादांसोबत यावे!
उद्धव ठाकरे आणि त्यांचे वाचाळ प्रवक्ते दुसऱ्यांच्या आई वडिलांचा अपमान मात्र करू शकतात. जणू आई-वडिलांचा अपमान करण्याचे सर्व हक्क या दोघांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत. घोडा मैदान दूर नाही. मोदींनी गोड शब्दात सांगितले आहे की अजितदादा आणि शिंदे यांच्या पक्षांमध्ये विलीन होण्याची तुमची औकात राहिलेली आहे. मराठी याला जागा दाखवणे असे म्हणतात. पवारांना हे लक्षात आले तरी मान्य कसे करणार. संभ्रम निर्माण करणारी विधाने करणे हा त्यांचा हातखंडा आहे. अजितदादांनी नेमके हेच विधान केल्यावर पवारांना इतके झोंबेल की हे बालबुद्धी लोकांचे विधान असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. पवार चिडलेले आहेत, त्यांना मोदींकडून सल्ला नकोय ऑफर हवी आहे. पवार बहुधा त्या ऑफरच्या प्रतीक्षेत आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)