बकरे की अम्मा कब तर खैर मनायेगी?

मविआ सरकार कोसळले ते महिलांची हाय लागल्यामुळे !

बकरे की अम्मा कब तर खैर मनायेगी?

महिलांची हाय कधी घेऊ नये असे म्हणतात. देर सवेर अशा लोकांची खाट पडतेच. उद्धव ठाकरेंनी याचा अनुभव घेतलेला आहे. धनंजय मुंडे यांना हा अनुभव लवकरच येणार अशी शक्यता आहे. करुणा मुंडे नावाच्या महिलेने धनंजय यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. गेली काही वर्षे ही महिला आपण मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा करते आहे. मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिलेली आहे. आपल्या पहिल्या पत्नीचा तपशील
लपवलेला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आलेला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून मुंडे यांचा शनी वक्री झाला आहे. हत्या प्रकरणात सुरूवातीपासून ज्याचे नाव घेतले जाते आहे, अशा वाल्मिक कराडशी मुंडे यांच्या आर्थिक आणि राजकीय संबंधांवरून उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रमोद महाजन यांची हत्या करणारे त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी सुद्धा मुंडे यांनी आपली जमीन लाटल्याचा आरोप केलेला आहे. करुणा मुंडे यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरण्याची शक्यता आहे.

करुणा मुंडे यांच्या नावाची २०२१ पासून चर्चा सुरू आहे. करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या बहिणीवर बलात्कार कऱण्यात आल्याचा दावा केला होता. धनंजय मुंडे हे आपले पती असून त्यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याचा दावा केला होता. त्यावेळी राज्यात मविआची सत्ता होती. शरद पवारांसह मविआचे सगळे नेते मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले. पोलिसांनी सुद्धा मुंडे यांची चौकशी करण्याचे सोडून करुणा मुंडे यांच्या बहिणीच्या मागे चौकशीचा लकडा लावला. इतके गंभीर आरोप असून सुद्धा त्यांना साध्या चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नाही. हे प्रकरण थंड झाले. त्यानंतर कधीही करुणा मुंडे यांच्या बहिणीचे दर्शन कुणाला झाले नाही.

मुंडे हे विवाहित आहेत, करुणा शर्मा या कदाचित त्यांच्या दुसऱ्या पत्नी असाव्यात असा लोकांचा ग्रह झाला होता. परंतु आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुले आहेत, असा दावा जेव्हा करूणा मुंडे यांनी केला तेव्हा प्रचंड गदारोळ झाला. आश्चर्य म्हणजे करुणा मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुले आहेत, हे तर मुंडे यांनी मान्य केले, परंतु करुणा मुंडे यांच्याशी पत्नीचे नाते नाकारले. आपण करुणा यांच्यासोबत रिलेशनमध्ये होतो, असा दावा धनंजय मुंडे करतात.

असे म्हणतात की, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना धनंजय आणि करुणा यांच्या विवाहाबाबत माहिती होती. त्यांचा या विवाहाला पाठिंबाही होता. परंतु त्यांचे बंधू आणि धनंजय यांचे वडील पंडीत अण्णा मुंडे यांचा मात्र विरोध होता. कारण गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा मुंडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजाचा प्रचंड ताप सहन करावा लागला. त्यामुळे पंडीत अण्णा यांनी धनंजय यांचा जातीत विवाह करून दिला. या विवाहानंतर करुणा आणि धनंजय यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. करुणा यांनी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल
केलेली आहे, ती धनंजय मुंडे यांची निवडणूक रद्द कऱण्यापेक्षा पहिली पत्नी हे हिरावून घेतलेले स्टेटस आपल्याला परत मिळावे यासाठी आहे.

हे ही वाचा:

प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!

राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!

स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी महाकुंभाच्या संगममध्ये करणार ‘अमृतस्नान’

दिल्लीतील शाळांना १२ वीच्या विद्यार्थ्याकडून बॉम्बची धमकी, चौकशीत मोठा खुलासा!

मुंडे हे राज्यातील महत्वाचे नेते आहेत. करुणा यांच्या मागे त्या तुलनेत कोणाचेही पाठबळ नाही. त्यांना धनंजय यांच्या विरोधात निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांचा फॉर्म रद्द झाला. त्यांच्या कारमध्ये रिव्हॉल्व्हर सापडल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धनंजय मुंडे आणि करुणा यांचे जे काही संबंध आहेत, त्या वैयक्तिक संबंधांमध्ये जाण्याचे काही कारण नाही. करुणा शर्मा जे काही बोलतात त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता येईल अशी आजची परिस्थितीही नाही. परंतु धनंजय मुंडे यांचा बाजार उठवण्यासाठी त्या इतक्या त्वेषाने कामाला का लागल्या आहेत, याचा विचार करण्याची गरज मात्र नक्की आहे.

राजकीय नेते धुतल्या तांदळासारखे नसतात हे सत्य आहे. त्यातले बरेच बाहरेख्याली असतात. असे नेते कायम भानगडी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. लोकलाज हे त्याचे प्रमुख कारण आहे. मुंडे यांच्या दुर्दैवाने त्यांची भानगड किंवा भानगडी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. करुणा मुंडे यांच्या बहिणीचे प्रकरण बाहेर आले तेव्हाच खरे तर त्यांनी मंत्रिमंडळातून तोंड काळे केले पाहिजे होते. त्यांच्यावर झालेले आरोप खरे किंवा खोटे हा तपासाचा भाग आहे. परंत करुणा यांच्या बहिणीच्या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली नाही. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक प्रकारचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होतायत. हे आरोप खरे की खोटे हे परमेश्वरालाच माहीत, परंतु लोकांचा त्या आरोपांवर विश्वास बसतो आहे, कारण मुंडे यांचा ट्रॅक रेकॉर्ड तसा आहे.

विवाह झाल्यानंतर पुरुषांचा छळ करणाऱ्या, घटस्फोट घेताना पुरुषांना लुटणाऱ्या महिलांची बरीच प्रकरणे अलिकडे बाहेर येत आहेत. परंतु म्हणून महिला पुरुषांवर अत्याचार करतात आणि पुरुष हेच महिलांच्या अत्याचाराचे बळी आहेत, असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? ज्या स्त्रीपासून मुंडे यांना दोन अपत्य आहेत, अशी महिला आज त्यांच्यावर आरोप करते आहे. याच महिलेने मुंडे यांच्यावर बहिणीचा बलात्कार केल्याचा आरोप केला होता, हे कसे विसरता येईल? राजकीय ताकद हाताशी असल्यामुळे कायदा आपला घरगडी आहे, अशी मानसिकता असलेले अनेक नेते आपल्या आजूबाजूला वावरत असतात. याच मानसिकतेतून मविआच्या सत्ता काळात डॉ.स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, कंगना राणावत अशा अनेक महिलांचा छळ करण्यात आला. त्यांच्यावर सत्तेचा वरवंटा चालवण्यात आला. मविआचे सरकार जेव्हा कोसळले तेव्हा लोक म्हणाले की, या सरकारला महिलांची हाय लागली. मुंडे यांच्यावर ज्या प्रकारे आरोप होतायत, ज्या प्रमाणात त्यांच्याविरोधात जनक्षोभ आहे ते पाहाता त्यांनाही जावे लागेल हे निश्चित. बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी…

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version