एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

मराठ्यांना मुस्लीमांच्या दावणीला बांधण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यात जरांगे हा मोहरा बनला आहे.

एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रम सुरू आहे. तो विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. जाहीर केलेल्या मुहूर्तानुसार त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. ते पुन्हा एकदा गोधडीत शिरलेले आहेत. या उपोषण नाट्याबाबत महाष्ट्रातील जनतेला दोन कोडी पडलेली आहेत. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास राज्यातील एकही राजकीय पक्ष तयार नाही. ज्यांच्या ऊर्जेचे जरांगेंना प्रचंड कौतूक आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवारही नाहीत. मग जरांगे या निवडणुकीत पाडणार कोणाला ? दुसरं कोडं उपोषणासाठी जरांगेंना गोधडी का लागते ?

महाराष्ट्रात गोधडी घेऊन उपोषण करण्याचा ट्रेण्ड जरांगेनी सुरू केला. भर उन्हाळ्यात उपोषण करतानाही ते गोधडी सोडत नव्हते. त्या अर्थाने ते ट्रेण्ड सेटर आहेत. असे अनेक ट्रेण्ड त्यांनी गेल्या काही महीन्यात स्थापित केलेले आहेत. जरांगेना गोधडी शिवाय करमत का नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. महाराष्ट्रात यापूर्वी एकाही नेत्याने, उपोषणकर्त्याने गोधडी वापरलेली नाही, लोक झोपताना गोधडी वापरतात, जरांगे दिवसाही गोधडीत असतात. जणू गोधडी हेच त्यांचे कवच बनले आहे.

गोधडीच्या उबेमुळे बहुधा त्यांना भूक लागत नसावी. विरोधकांना शिव्या घालण्याची, शेलक्या भाषेत त्यांचा उद्धार करण्याची ताकद हिच गोधडी देते. कितीही दिवस उपोषण लांबवण्याची क्षमता या उबेत आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर खापर फोडण्याची ताकद जरांगेंना ही गोधडीच देते. ते खरोखर इतके दिवस उपाशी आहेत, असा कोणाला संशय सुद्धा येत नाही. जरांगेंनी ही गोधडी महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर केलेली आहे. महात्मा गांधींचा चष्मा, पंचा तशी जरांगेंची गोधडी. जरांगे हे आजच्या युगातील महात्मा गांधी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणत असते. जरांगेंना ते शिवराळ गांधी म्हणाले असते. जरांगेंच्या गोधडीने इतिहास रचला आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. राज्यात पेटलेला वणवा शांत करण्याची विनंती त्यांनी पवारांना केली. तेव्हाच आम्ही म्हणालो होतो की, पवार ही विनंती मनावर घेणार नाहीत. दोन दिवसांनी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे पवार म्हणाले होते. त्यांनी ते ही केली नाही. प्रत्यक्ष भेट होत नसली तर फोन करणे शक्य होते. पवार आरक्षणाच्या मुद्द्या प्रकरणी चर्चा करू इच्छितात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळले असते तर हे दोघेही नेते पवारांना भेटायला सिल्व्हर ओकवर आले असते. महाराष्ट्र शांत करण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक तेव्हा विरोधकांची भेट घेणे, हे सत्ताधारी म्हणून त्यांचे कामच आहे.

शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. तरीही मराठ्यांनी त्यांच्याविरोधात कधीही आंदोलन केले नाही. साधा आवाज उठवला नाही. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या शालीनी पाटील यांना त्यांनी पक्षातून काढून टाकले. त्याच शरद पवारांच्या जरांगे आरत्या ओवाळत असतात. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असे पवारांनी ठामपणे सांगितले आहे. हेच मत काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलेले आहे. कोणालाही मराठा समाजाला खुष करण्यासाठी ओबीसींना दुखवायचे नाही.

ओबीसींची मते सर्वांना हवी आहेत. त्यामुळे पवारांना सुद्धा ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे मान्य नाही. त्यांना हेही माहीती आहे, की असे मत व्यक्त केले तरीही, जरांगे त्यांच्या विरोधात शिव्या घालणार नाहीत, तोंड उघडणार नाहीत. कारण शरद पवार हे काही जरांगेंचे टार्गेट नाही. त्यांना मविआच्या नेत्यांना पाडण्यात रस नाही. जरांगे यांची एकाग्रता अर्जुनाच्या तोडीची आहे. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतात. जरांगेंना फक्त त्यांच्यावर बाण चालवण्यात रस आहे.

हे ही वाचा:

ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२ लाखांची फसवणूक

बांगलादेश हिंसाचार; ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’

जरांगेंचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू !

न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !

देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालणे. त्यांच्या डोक्यावर खापर फोडणे, भाजपाचे उमेदवार पाडणे. हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे फक्त त्यांच्या विरोधात घाणेरडी भाषा वापरली जाते. ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट सांगणाऱ्या मराठा नेत्यांना शिव्या न घालता त्यांच्या चुका पोटात घातल्या पाहीजे, अशी भाषा जरांगे करतात. मविआच्या नेत्यांचाही ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध असल्यामुळे कोणालाही पाडले तरी जरांगेंची मागणी पूर्ण होत नाही. तरीही जरांगे हे सरकार घालवण्याची भाषा करतात कारण त्यांचा अजेंडा तेवढाच आहे.

प्रश्न फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रात अठरा पगड जातींची वज्रमूठ बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी आक्रमणाला पराभूत केले. आज मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात उभे करण्याचे आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांना मुस्लीमांच्या दावणीला बांधण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यात जरांगे हा मोहरा बनला आहे. जरांगे मधेमधे मुस्लीम आरक्षणाची बांग देतात ती याच कारणासाठी. जरांगे गोधडीत शिरून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. ज्यांना त्यांचा अजेंडा लक्षात आला ते त्यांच्यापासून दूरावले. विरोधात गेलेल्या सहकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणे, त्यांच्या गाड्या जाळणे असे प्रकार त्यांचे समर्थक करत आहेत. अंतरवाली सराटीच्या लोकांनी त्यांचा विरोध सुरू केलेला आहे. जिथे त्यांचे आंदोलन सुरू झाले तिथूनच त्यांना ओहोटी लागायला सुरूवात झालेली आहे. जरांगेंचे खतरनाक मनसुबे आणि त्यांच्या उपोषणाचे सत्य ज्या दिवशी मराठा समाजाच्या लक्षात येईल त्या दिवशी तेच त्यांची गोधडी हिसकावूनही घेतील आणि भिरकावूनही देतील. कारण जरांगे जरी शरद पवार, रोहित पवारांच्या ऊर्जेने भारावले असले तरी मराठा समाजातील बहुसंख्य आजही छत्रपती शिवरायांच्या ऊर्जेने भारावलेले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version