मस्साजोगमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी छेडलेले अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहील्याच दिवशी आंदोलनात सहभागी झालेल्या गावकऱ्यांना भेटायला आलेल्या मनोज जरांगेंना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण आली. ‘ते आज मुख्यमंत्री असते तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला असता’, अशा भावना त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. जरांगे यांच्या त्या विधानात अनेक अर्थ दडलेले आहेत. या विधानाला अनेक जुने संदर्भही आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अनेक दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यांना सहआरोपी केल्याशिवाय याप्रकरणात न्याय होणार नाही, असे देशमुख कुटुंबिय आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देशमुख हत्याप्रकरणात
न्याय झाला पाहिजे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते ते तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
बीडमध्ये आतापर्यंत सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापि फरार आहे. त्याच्या अटकेसह आणखी काही मागण्यांबाबत ग्रामस्थ आग्रही आहेत. महायुती सरकारने
याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. ही ग्रामस्थांच्या मागणीतील एक प्रमुख मागणी होती. या मागणीची पूर्तता झाल्यानंतर उर्वरीत मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला १०
दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी मस्साजोगला भेट दिली. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते, तंगड्या धरून आपटले असते’, असे विधान केले आहे. ते सरकारमध्ये आहेत, याची जरांगेंना आठवण करून दिली तेव्हा, ‘ते मुख्यमंत्री असतानाही त्यांचे चालू दिले नाही, आता कुठे चालू देणार’, असा सवाल त्यांनी केला. जरांगेंची ही दोन्ही विधाने, एकमेकांना छेद देणारी आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी कठोर कारवाई करत नाहीत, असा जरांगेंच्या विधानाचा अर्थ आहे, म्हणूनच त्यांना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली. ते असते तर खपाखप कारवाई झाली असती असेही ते म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असताना त्यांचे काही चालत नव्हते, असेही ते म्हणतात.
हे ही वाचा:
कर्नाटक: इडली बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी, ‘हे’ कारण आले समोर !
दिल्ली दारू धोरणानंतर उद्या दुसरा कॅग अहवाल सादर होण्याची शक्यता!
मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?
महाकुंभमध्ये आलेल्या ६६ कोटी भाविकांची गणना कशी केली?
जरांगेंची ही दोन्ही विधाने फडणवीसांना उद्देशून करण्यात आली आहेत, हे उघड. मागच्या सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंना काम करू देत नव्हते, आता ते स्वत: मुख्यमंत्री आहेत, तेव्हा कठोर कारावाई करत नाहीत, असा
जरांगेंच्या विधानाचा अर्थ आहे. जरांगेंचे आंदोलन जेव्हा तापलेले. त्यांच्या सभांना, मोठ्या संख्येने गर्दी उसळायची तेव्हा, जरांगेंच्या मागे कोण आहे, असा सवाल सातत्याने उपस्थित केला जायचा. महायुतीचे पहीले सरकार आले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तरीही टार्गेट मात्र फडणवीस यांनाच केले जायचे, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ना कधी शेलक्या शब्दांचा वापर झाला, ना त्यांना कधी टार्गेट करण्यात आले.
तेव्हाही लोकांना याबाबत आश्चर्य वाटायचे. जरांगेंच्या ताज्या विधानामुळे जरांगे हे शिंदेंबाबात फक्त मवाळ नाही, तर
प्रशंसकही असल्याचे उघड झाले आहे. त्यावेळी ज्या नेत्यांनी जरांगेंना बळ दिले, त्यात एकनाथ शिंदे यांचाही सहभाग होता का, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. एका बाजूला एकानाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये शीतयुद्ध चालल्याच्या
बातम्या आहेत. दुसऱ्या बाजूला जरांगे माजी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा करतायत, हे फडणवीसांसाठी सुचिन्ह नाही. बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे भाजपा आमदार सुरेश धस वारंवार सांगतायत की फडणवीस
माझ्या पाठीशी आहेत. धनंजय देशमुख यांनीही कधी फडणवीसांवर टीका केलेली नाही. ही त्यातल्या त्यात फडणवीस यांच्यासाठी जमेची बाब.
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस बीडमधील घडामोडींवर बारीक नजर ठेऊन आहेत. १० टक्के आर्थिक आरक्षण दिल्यानंतर खरे तर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आदोंलन थांबले पाहिजे होते. जरांगेंनी ते विनाकारण ताणले. अगदी तुटेपर्यंत. लोकांना आता त्यातला फोलपणा समजला आहे. जरांगेंच्या पाठी असलेली गर्दीही पार आटली आहे. परंतु मुळ मुद्दा संपलेला नाही. दोन समाज गटांमध्ये विखार निर्माण करणारे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत राखेत दडलेल्या निखाऱ्या समाज धुमसत राहणार. फक्त कारणे बदलत जातील. जरांगे नावाचा मोहरा बाद झाला तर दुसरा मोहरा उभा करायला किती वेळ लागतो? दुसरा मुद्दा पुढे सरकवायला किती वेळ लागतो? त्याचे प्रयत्नही सुरू झालेले आहेत. छावाच्या निमित्ताने याचा प्रत्यय येतो आहे. ब्रिगेडी इतिहासकार बिनबुडाचे तर्क देऊन छावामुळे निर्माण झालेला प्रभाव पुसण्याचा प्रयत्न करतायत. यानिमित्ताने जाती जातीतला विखार पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करतायत. यापार्श्वभूमीवर जरांगेंच्या प्रशंसेचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)