बरे दिवस असताना, चलती असताना तोंडावर नियंत्रण ठेवून बोलणे ज्यांना जमते, त्यांना उतरणीच्या काळात फार भोगावे लागत नाही. मनोज जरांगे सध्या याचा अनुभव घेतायत. तूर्तास ते सगे-सोयऱ्यांमुळे अडचणीत आलेले आहेत. मेहुणा तडीपार झाल्यामुळे त्यांचा तीळपापड होतोय. थोडक्यात त्यांचे अच्छे दिन सरले आहेत. जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याला बेकायदा वाळू तस्करी, जाळपोळ प्रकरणात जालना, बीड, परभणी या चार जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे.
मेहुण्यापेक्षा मोठा सगासोयरा कोण? तडीपारीच्या कारवाईमुळे जरांगे यांना मिर्ची लागली. खेडेकर हा एकटा नाही. अशा अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. आपला मेहुणा बेकायदा कारवायांमुळे अडचणीत आलाय, हे लक्षात न घेता जरांगे फडणवीसांनाच दमबाजी करतायत. वाळू तस्करी, जाळपोळ मेहुण्याने केली नसून फडणवीसांनी केली की काय, असा प्रश्न पडवा अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
‘तुमची मस्ती जायला तयार नाही, मी सोडणार नाही, तुमचा कार्यक्रम करायला मला वेळ लागणार नाही. वेळीच चूक सुधारा…’ असा दम त्यांनी फडणवीसांना दिलाय. काही लोकांना कुऱ्हाडीवर पाय मारण्याची खुमखुमी असते. वाळू तस्करी केली म्हणून काय झाले?बस जाळली म्हणून काय झाले? खेडकर हा आपला मेहुणा आहे, आणि मी ब्रह्मदेवाचा बाप आहे, अशा थाटात जरांगे बोलतायत. जणू जरांगेंचा मेहुणा मुख्यमंत्र्यापेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठा आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही जरांगेनी चालवलेले आंदोलन म्हणजे निव्वळ दुकान होते. त्या काळात जरांगे आणि त्यांचे आंदोलन ही काही राजकारण्यांची गरज होती. त्यात सत्तेतील काही राजकारणी होते, काही विरोधी बाकांवरील होते.
जरांगे यांच्या फुग्यात हवा भरल्यामुळे देवेंद्र फडणवीस नावाचा नेता अडचणीत येईल, असा त्यांचा होरा होता. त्या काळात जरांगेंचा फुगलेला फुगा हवेत उंचच उंच उडत होता. आता टाचणी लागून हवा निघालेली आहे, हे त्या फुग्याच्या अजून लक्षातच येत नाही.ज्याला अडचणीत आणायचे होते ते फडणवीस मुख्यमंत्री झालेत. बदल्याचे राजकारण करणार नाही, बदलासाठी राजकारण करणार असे फडणवीसांनी जाहीर केले आहे. तरीही विरोधक मात्र सूड सूड… असा घोषा बंद करताना दिसत नाही. उद्धव ठाकरे तर जाहीरपणे बोलले.
जरांगेंची फुरफुर बंद होण्याचे चिन्ह नाही. उपोषणाची नौटंकी बंद झाली, आता मी मैदानात उरणार अशी हाळी त्यांनी
दिली. साखळी उपोषणाचा नवा खुळखुळा वाजवायला सुरूवात केली. मराठा समाजाला हा अतिरेक कधीच मान्य नव्हता. आजही नाही. आपला एजेंडा नाकारून जनतेने भाजपाला भरभरून दिले हे जरांगेंनी लक्षात घेण्याची गरज आहे. निवडणुकीत जरांगेंनी ज्यांना पाठिंबा दिला, कोणाला पाडायचे त्यांच्या सुपाऱ्या घेतल्या. ज्यांच्यासाठी रात्री – रात्री गुप्त बैठका घेतल्या. त्यांचा बाजार उठला आहे. नवे सरकार मजबूत जनादेश घेऊन सत्तेत बसले आहे. हे सरकार आता पाच वर्षे काही हलत नाही.
हे ही वाचा:
‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ अभियानाचा प्रारंभ
गोवंश हत्येसंदर्भात पीआय बांगर यांच्यावर कारवाईसाठी निवेदन, कधी होणार कारवाई?
जीवन म्हणजे परीक्षा नाही, अपयशी ठरलात तरी संधी मिळेल!
बांगलादेशातील हिंसाचारानंतर युनूस सरकारला आठवण झाली कारवाईची!
दुसऱ्या बाजूला जरांगे यांच्याकडे येणारी नेत्यांची गर्दी आता साफ आटलेली आहे. किंबहुना बंद झालेली आहे. फक्त जरांगेंची बडबड सुरू आहे. या बडबडीची दहशत आहे, असा त्यांचा गैरसमज आजही कायम आहे. जरांगेंची ही बडबड आणि दमबाजी नवी नाही. अगदी त्यांच्या चुकांच्या विरोधात बोलणाऱ्याच्या तोंडाला घरात घुसून काळे फास, त्याला धमकाव, त्याच्या गाड्यांची तोडफोड कर असे दहशतीचे सगळे प्रयोग त्यांच्या समर्थकांनी केलेले आहेत. आता थेट ते मुख्यमंत्र्यांना धमकावण्याचे काम करतायत. आपण काहीही केले तरी काहीही होणार नाही, असे त्यांना वाटत आले आहे.
आजही तसे वाटते आहे. खेडेकरच्या विरोधात कारवाई हा शेवट नाही. खणता येईल अशी अनेक प्रकरणे आहेत. ती खणण्याचीही गरज नाही. जरांगे यांच्यावर विशेष लोभ असलेले लोक आता त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली जमवलेल्या
मायेबद्दल भरभरून बोलतायत. त्याची चौकशी सुरू केली तरी आंदोलनाच्या नावाखाली जरांगेंचे काय धंदे सुरू होते, ते उघड होऊ शकेल.
जरांगेंची अडचण वेगळी आहे. मेहुण्याला अटक केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात केलेल्या बाता म्हणजे केवळ सुके दम होते, हे त्यांच्या घरातल्यांच्याही लक्षात आले आहे. फुगा फुटला आहे, ही बातमी घरपर्यंत आल्यामुळे जरांगे वैतागले आहेत. राहीला मुद्दा फडणवीसांचा, ते एक सज्जन नेते आहेत. कधीही वावगा शब्द त्यांच्या तोंडून निघत नाही. जरांगेंना आमचा एक प्रेमाचा सल्ला आहे. कितीही चिथावणी दिली तरी, जे लोक कधीही चिडत नाहीत, डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखे शांत राहतात, कधीही तोंड वाजवत नाहीत, अशा लोकांचा मेंदू जर तल्लख असेल तर त्यांच्यापासून जरा जपून राहायला शिका. ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत नसून फक्त वाट पाहात असतात. मारीयो पुझोच्या गॉडफादर या कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे. Revenge is a dish best served cold जरांगेंनी गॉडफादर वाचली असण्याची शक्यता नाही. त्यांना हे वाक्य माहीत असण्याची शक्यता नाही. परंतु आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी जर त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या तरी त्यांचे बरेचसे कष्ट कमी होऊ शकतील.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)