25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयअकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले... मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!

अकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले… मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!

जरांगेंनी पलटी मारलेली आहे. जनतेच्याही हे लक्षात आले आहे

Google News Follow

Related

गाडीतो, पाडीतो, सुट्टी देत नाय… अशी भरपूर डायलॉगबाजी करून मनोज जरांगे पाटील यांनी वातावरण निर्मिती तर केली. परंतु अखेरच्या क्षणी बहुधा मालकाने माघारीचे आदेश दिल्यामुळे जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केलेले आहे. मुस्लिम आणि दलित समाजाने ऐन वेळी उमेदवार दिले नसल्यामुळे आपण माघार घेत आहोत, असे कारण त्यांनी दिले असले तरी ते पोकळ आहे. जरांगेच्या एकूणच राजकारणासारखे. काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी, आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली होती. अनेकांना वाटले मराठा आंदोलन चालवणारे जरांगे आता सेक्युलर मसिहा बनण्याच्या तयारीत आहेत काय?

मननोहन देसाई यांच्या गाजलेल्या अमर, अकबर, एन्थनीचा दुसरा भाग बनवतायत का? त्यासाठी ते बरेच दिवस वातावरण निर्मिती करत होते. कबरींवर जाऊन वाकत होते, चादरी चढवत होते. भाजपा मुस्लिमांना संपवायला निघालेला आहे, अशा प्रकारचे फोकनाड दावे करत होते. मुस्लिमांनीही त्याला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. उपोषणाच्या काळात त्यांच्या तोळामासा परिस्थितीकडे पाहून डोळे पाणावलेले, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारे मुस्लीम वारंवार न्यूज चॅनलच्या कॅमेरासमोर झळकत होते. त्यांची अमर, अकबर, एन्थनीवाली पत्रकार परिषद म्हणजे सगळ्याचा जणू क्लायमॅक्स होता. नोमानी यांनी महात्मा गांधी आणि एपीजे अब्दुल कलाम यांची थेट जरांगेंशी तुलना केली. जरांगेंच्या अंगावर मूठभर मांस चढले. इतके दिवस मुस्लिमांच्या पाठिंब्यासाठी केलेली चाटुकारिता कामी आली, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ही चाटुकारिता करणारे एकाच वेळी हमास आणि औंरगजेबाचा भक्त आहेत, याची त्यांना अजिबातच फिकीर नव्हती.

मुस्लीम मतं आणि दलित मतं आपल्या खिशात आल्यासारखा त्यांचा आव होता. ऐनवेळी नोमानी आणि आंबेडकर यांनी गचांडी दिली. जरांगेंचे १४ उमेदवार तयार होते. परंतु यांनी ना एकही मुस्लीम उमेदवार दिला, ना दलित. मुळात ना नोमानी हा मुस्लीमांचा नेता आणि ना आनंदराज आंबेडकर दलितांचा. त्यामुळे जरांगेंच्या सोबत दोन पोकळ वासे होते. मुस्लीम नेते फक्त जरांगेंच्या फुग्यात हवा भरण्याचे काम करत होते. हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जरांगेंच्या उचापती मुस्लीम मुल्ला मौलवींना आणि अन्य कट्टरवाद्यांना हव्याहव्याशा वाटत होत्या. आपण मुस्लीमांचे नेते झालो हा जरांगेंचा केवळ भ्रम होता. ते फक्त मजा घेत होते. नेतेपणाचा त्यांचा भ्रम मुस्लिमांनी योग्यवेळी दूर केला.

एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही, याची उपरती जरांगेंना झाली. त्यांनी ते मान्य केले. परंतु त्यांनी दिलेली बाकीची कारणे मात्र अत्यंत तकलादू आहेत. हा गनिमी कावा असल्याचा दावा जरांगे करतायत. तोंड काळे झाल्यावर तोंड काळे झाले असे मान्य करणे हे राजकारणाच्या नियमाविरुद्ध आहे. मी चेहरा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी चारकोल फेसपॅक लावलाय, असे सारवासारव करावी लागते. जरांगे तीच करतायत.

जरांगेंची लढाई मुळातच मराठ्यांसाठी नव्हती. ते फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पाडण्यासाठी आणि गाडण्यासाठी लढत होते. त्यांनी अनेकदा ते मान्यही केले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अधिकच चेव आला होता. याच काळात ते अधिक भरकटले. जास्त ताकदीने शिवीगाळ करू लागले. त्यांचे चेलेचपाटे त्यांना थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान करायला निघाले होते. स्वत:ला राजे म्हणवणारे संभाजीही त्यात होते. जरांगेंच्या वाहत्या पाण्यात आपलेही काही भले होईल यासाठी संभाजीपासून मंबाजीपर्यंत सगळे या भाटगिरीत लागले होते. या सगळ्यांच्या अपेक्षेला टाचणी लावण्याचे काम जरांगे यांनी केले. कारण त्यांना त्यांच्या हायकमांडचा आदेश आला असावा.

हे ही वाचा:

कलम ३७० रद्द करणाऱ्या ठरावावरून विधानसभेत गोंधळ

प्रवासी खचाखच भरले, उत्तराखंडमध्ये बस कोसळून ३६ ठार!

कॅनडाने आता अधिकृतपणे भारताला ‘राज्य शत्रू’ म्हणून संबोधले

जम्मू-काश्मीर: श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेडचा स्फोट, १० जण जखमी!

जरांगे सुरूवातीला २८८ जागा लढण्याच्या बाता करत होते. त्यांना २८ जागांवर उमेदवार देता आले नाहीत. निवडणूक लढवणार नाही, असे थेट सांगितले असते तर तोंड काळे झाले असते, म्हणून त्यांनी लढणार असा आव आणत माघार घेतली. ते ज्या काही जागा लढवतील तिथे तुतारीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त होती. ज्यांच्यामुळे आपल्या सभांना गर्दी जमली, आपल्यावर फुलं उधळली गेली, त्यांच्या वाकड्यात गेलो तर तेच लोक उद्या शेणगोळ्यांचा मारा करतील याची जाणीव झाल्यामुळे जरांगे मागे हटले.

मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले असे फडणवीसांना वारंवार सांगणारे जरांगे माघार घेताना म्हणाले की एका जातीवर निवडणूक लढता येत नाही. जरांगेंनी पलटी मारलेली आहे. जनतेच्याही हे लक्षात आले आहे. प्रश्न फक्त एका जातीचा नव्हता. ती एक जातही जरांगेंच्या पाठीशी धड उभी नव्हती. मराठ्यांनी त्यांचे विद्वेषाचे राजकारण नाकारले, मुस्लिमांचे तुष्टीकरण नाकारले, औरंगजेबाच्या समर्थकांशी गळ्यात गळे घालणारी त्यांची चाटुकारिता नाकारली. मराठ्यांसाठी आपण जीवाची बाजी लावायला तयार आहे, असे फाजील दावे करणारा माणूस केवळ पराभवाच्या भीतीने मैदानातून पळाला. फडणवीसांचे तोंड काळे करता करता, जरांगे यांनी स्वत:चा जोकर बनवून टाकला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा