सलाईन घेऊन उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मराठे कोण याचे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात केलेली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभा राहणारा मराठा हा २४ कॅरेट नाही, असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मते एमआयएमचे नेते इम्प्तियाज जलील यांच्या गळ्यात गळे घालणारा, मुस्लीम आरक्षणाच्या बाता करणाराच २४ कॅरेट असावा. या २४ कॅरेटचे निकष, लक्षणे नेमकी काय हे त्यांनी अजून जाहीर केलेले नाही. परंतु ती लक्षणे काय असू शकतील याची आपण सगळे कल्पना करू शकतो.
काळाचा महीमा खूप मोठा आहे. कालपर्यंत मनोज जरांगे कोण हे कोणालाही विचारले असते तर सांगता आले नसते. ते जरांगे आज २४ कॅरेट मराठे कोण याचा निर्णय घेत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, सत्तेवर कोण बसणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात फिरकावे की नाही, कोणाला पाडायचे, कोणाला गाडायचे, कोणाला सुटी द्यायची
कोणाला नाही, कोणाचा हिशोब करायचा, याबाबत निर्णय घेत आहेत. यांना ठाऊक नाही, महाराष्ट्रात पुन्हा जर महायुतीची सत्ता आली तर पुरेशी पेटवापेटवी करता आली नाही, असा ठपका ठेवून यांचे चालक, मालक, पालक यांना नोकरीवरून काढून टाकलीत.
मनोज जरांगे ज्या २४ कॅरेटची भाषा करतायत तो मराठा काही महाराष्ट्राला नवीन नाही. जरांगे स्वत: २४ कॅरेट आहेत असे धरून चला, म्हणजे तुम्हाला नेमकी लक्षणे समजू शकतील. अन्य जातींचा द्वेष करता आला पाहिजे, ब्राह्मण द्वेष आत्यंतिक असायला हवा. मुलाबाळांच्या डोक्यात लहानपणापासून जातीपातीचे हे विष भिनवता आले पाहिजे. म्हणजे लहान वयापासून ती देखील अन्य जातीतील लोकांना शिव्या घालायला शिकतील. राज्यात मूठभर असलेल्या ब्राह्मणांना नसलेले दंड थोपटून आव्हान देता यायला हवे. ही सगळी लक्षणे असून जर कट्टरतावादी मुस्लिमांच्या तुम्ही प्रेमात नसाल तर तुमचे २४ कॅरेटपण पूर्ण होत नाही. तुम्ही भले ब्राह्मणांना शिव्या घाला, ओबीसींनी शिव्या घाला, परंतु मुस्लिम नेता कितीही हिंदूद्वेष्टा असला तरी तुम्हाला त्याच्या गळ्यागळे घालण्याची इच्छा व्हायलाच हवी.
ही लक्षणे रोगट असल्यामुळे अनेकांना ती मान्य नाही. जातीपेक्षा धर्म मोठा, धर्मापेक्षा देश मोठा असे जे मराठे मानतात ते २४ कॅरेट नाहीत. जरांगे ज्यांना २४ कॅरेट मानतात ती जमात इतिहास काळापासून महाराष्ट्राताल माहिती आहे. शहाजी राजांना गाफील ठेवून कैद करणारे जे टोळके आदीलशाहीत होते त्यात अफझल खानासोबत बाजी घोरपडेही होता, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नातेवाईकच. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते, माझ्या आयुष्यात जर बाजी घोरपडेचा वचपा काढता आला तर ठिकच अन्यथा तुम्ही त्याचा खात्मा करा. ताठ कणा असलेले शहाजी राजे या घोरपड्याला खूपायचे, कारण आदील शाहीसमोर सरपटणे हेच त्याच्या आयुष्याचे लक्ष्य होते. धर्मवीर संभाजी महाराजांची खबर औरंगजेबाला देणारा गणोजी शिर्के हाही २४ कॅरेटच होता.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात रशियाला जाणार
सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
बहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!
‘शिवरायांचा आठवावा प्रताप’… ‘न्यूज डंका’च्या दसरा दिवाळी अंकाचे रायगडावर थाटात प्रकाशन
आज जसे जरांगे इम्तियाज जलीलला मिठ्या मारतायत, तसे त्या काळी घोरपडे आदीलशाहाला आणि शिर्के औरंगजेबाला मिठ्या मारत होते. जिहादी मुस्लीम नेत्यांसमोर असे सरपटणे ज्यांना मान्य नाही ते जरांगेंच्या निकषानुसार २४ कॅरेट नाहीत. राष्ट्र प्रथम ही भूमिका घेऊन भाजपा मतदान करणारा मराठा २४ कॅरेट नाही, सातारचे छत्रपती उदयन राजे, शिवेंद्र राजे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार अमित साटम, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सगळे २४ कॅरेट नाहीत कारण ते भाजपाचे आहेत. यातले बरेच नेते हे निवडणूका लढवून लोकांमधून निवडून आलेले आहेत. कोणी तरी पैसा पुरवला, कोणी तरी गर्दी जमवली, कोणी तरी फुलं उधळायला डंपरची सोय केली, कोणी तरी सभेसाठी शेत उपलब्ध करून दिले म्हणून हे नेते झालेले नाहीत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा महाराष्ट्रात कमी झाल्या म्हणून जरांगे यांचे विमान हवेत गेले. १९८४ च्या निवडणुकीत भाजपाच्या फक्त २ जागा निवडून आल्या होत्या. पुढच्या तीन दशकांत भाजपा देशाच्या सत्तेवर आला. तोही पूर्ण बहुमताने. त्यामुळे बुडवितो, पाडितो, तुडवितो, सुट्टी देत नाही अशी बकवास करण्यापूर्वी जरांगे यांनी आपली उंची तपासून पाहावी. मराठ्यांना मुस्लिमांच्या दावणीला बांधणारा नेता अजून जन्माला यायचा आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून तो प्रयत्न करतायत. त्यांना जे झेपले नाही ते त्यांची तुतारी फुंकणाऱ्या जरांगेंना झेपेल या गैरसमजात त्यांनी राहू नये. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळवून देऊन ज्यांनी न्याय दिला असा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना शिव्या घालून जरांगे आपली लायकी जगाला दाखवतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)