25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयविधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं...

विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…

एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही घोषणाच या निवडणुकीचे भाग्य निश्चित करणार आहे

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस. ही निवडणूक मविआला, मनोज जरांगेंना, सज्जाद नोमानीला ज्या दिशेने न्यायची होती त्या दिशेने जाताना दिसत नाही. ती जनतेने हाती घेतली आहे आणि योग्य दिशेला चालली आहे. ही दिशा नेमकी कोणती? हे काही वक्तव्यावरून अगदी स्पष्ट दिसते आहे. ही वक्तव्य मनोज जरांगे यांची आहेत, सुप्रिया सुळे यांची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवतीर्थावरील केलेल्या वक्तव्यानंतर ही वक्तव्य आलेली
आहेत. मोदींचे ते विधान ऐका, तुमच्या लक्षात येईल वारा कोणत्या दिशेने वाहतोय. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाते आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा मविआला असलेला छुपा पाठींबा निर्णायक ठरला. आंदोलनाच्या सुरूवातीपासून मनोज जरांगे यांनी हीच भूमिका रेटली आहे. ते भाजपाला गाडण्याची आणि पाडण्याची भाषा करत होते. तेच जरांगे नाशिकमध्ये म्हणाले की, मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, कधी जाईन माहीत नाही, शरीर आता साथ देत नाही. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जरांगेंचे हे विधान आलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात बुजुर्ग नेता म्हणजे शरद पवार. त्यांच्या जातवादी राजकारणाबाबत प्रचंड चीड असलेले महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने आढळतील. परंतु त्यांचे विरोधकही मान्य करतील की ८३ वयाचे, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणारे शरद पवार, शरीर साथ देत नाही, थोड्याच दिवसांचा पाहुणा या भाषेत कधीच बोलले नाहीत. कारण ही लढवय्यांची भाषा नाही. सरकार खाली खेचल्याशिवाय म्हातारा होत नाही, अशी आव्हान देणारी भाषा पवार करतात. समर्थकांना लढण्याची जिद्द देणारी ही भाषा आहे.

निम्म्या वयाचे पवारांचे चेले मनोज जरांगे वयाच्या ४२ व्या वर्षी जाण्याची भाषा करतायत. जरांगेंनी मोठ्या मेहनतीने निर्माण केलेला जातीचा विखार वितळतोय, हेच या भाषेमागचे कारण आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवण्याचा जणू विडा जरांगे यांनी उचलला होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील तमाम मराठे आपल्या पाठीशी उभे आहेत अशी हवा त्यांनी निर्माण केली होती. दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारे अनेकदा स्वत:च त्यात पडतात. जरांगेंचे तसेच झाले आहे. निरवानिरवीचे बोल बोलून त्यांनी ते सिद्ध केले आहे.

जरांगेंचे आंदोलन भरकटले. मराठा आरक्षण बाजूला ठेवून ते मुस्लीमांचे मसीहा बनायला निघाले. मुस्लीमांच्या वतीने भाजपाला दटावणी देण्याचे काम ते करत होते. मौलाना सज्जाद नोमानी आणि एमआयएमचे इम्प्तियाज जलील यांच्या चरणी लीन झाले. असे काही चाळे करून मुस्लीम आपल्या पाठीशी उभे राहीतील अशा गोड गैरसमजात ते वावरत होते. विधानसभा निवडणुकीबाबत सतत भूमिका बदलत राहिल्यामुळे त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली. त्यांचा मूळ हेतू उघड झाला. आता उरलो तुतारी पुरता एवढीच त्यांची ओळख राहिली. पांगलेल्या गर्दीला भावनिक करण्यासाठी जरांगे चाळीशीत
जाण्याची बात करीत आहेत.

महाराष्ट्रात गणोजी शिर्केही झाले आणि बाजी घोरपडेही. परंतु महाराष्ट्रातील मराठा दैवत मानतो ते छत्रपती शिवाजी महाराजांना. महाजांनी अठरा पगड जातींना जोडले. इस्लामी आक्रमकांशी लढा देऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे नाव घेऊन आंदोलन रेटायचे आणि दुसऱ्या बाजूला नोमानी याच्यासारख्या वोट जिहादींसमोर ओणवे व्हायचे हे जरांगेंचे वर्तन मराठ्यांना कधीही मान्य होणार नव्हते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी असलेली गर्दी हटली.  जरांगेंच्याही हे लक्षात आल्यामुळे ते केविलवाणे झाले आणि जाण्याच्या गोष्टी करून लागलेले आहेत. भावनिक आवाहन करून राजकारण रेटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याला अटक!

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

दुसरे वक्तव्य सुप्रिया सुळे यांचे आहे. पंढरपूरच्या दौऱ्यात मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमची लढाई राजकीय आहे, वैयक्तिक नाही. अनेक भाजपा नेत्यांच्या परिवाराशी आमचे उत्तम संबंध आहेत. हे संबंध खूप जुने आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती सरकारवर टिकेचे कोरडे ओढणाऱ्या सुप्रिया सुळे यांना अचानक सगेसोयरे आठवतायत ही चांगली गोष्ट आहे. दिल्लीत मला राज्यसभेचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. तेव्हा एका सेक्युलर महिला पत्रकाराचा एक किस्सा सुळे यांच्या वक्तव्यामुळे मला आठवला. आपले काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठेने काम
करतात हे सांगून आपल्या परिवाराचे संघाशी कसे संबंध आहेत, हे ठसवण्याचा ही पत्रकार प्रयत्न करत होती. कारण माझे संघाशी उत्तम संबंध आहेत, मी स्वयंसेवक आहे हे तिला ठाऊक होते. प्रत्यक्षात संघ किंवा संघ विचारांबाबत त्या महिला पत्रकाराला काडीचेही देणे घेणे नव्हते. केंद्रात भाजपाची सत्ता होती त्यामुळे तिला संघ आठवत होता एवढेच.

 

हे ठामपणे सांगण्याचे कारण एवढेच की पुढे ती पत्रकार महाराष्ट्रात गेली आणि सध्या एका काँग्रेस नेत्याचा मीडिया सांभाळण्याचे काम करते. जमेल तेव्हा संघावर तुटून पडते आहे. विरोधकांबाबत मृदू होणे हे असे स्थल, कालावर अवलंबून असते. सुळे यांच्या त्यांच्या या वक्तव्याचे टायमिंग पाहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा-दिशा मतदारांच्या लक्षात येऊ शकेल. निवडणुकीच्या वातावरणात सगळ्यात ठाम आणि सगळ्या ठोस वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.

शिवतीर्थावर झालेल्या मेळाव्यात मोदी म्हणाले होते की, राज्यात महायुतीचे सरकार आलेले आहे, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण द्यायला आलेलो आहे. जरांगे आणि सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य मोदींच्या वक्तव्यानंतर आलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही घोषणाच या निवडणुकीचे भाग्य निश्चित
करणार आहे, एवढाच या सगळ्या वक्तव्यांचा अर्थ आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा