दोन खेळीत राहुल गांधी, ठाकरेंना शह आणि मात…

पंतप्रधानपदाच्या ऑफरमुळे काँग्रेसच्या खरगे यांचा चेहरा साफ उतरला

दोन खेळीत राहुल गांधी, ठाकरेंना शह आणि मात…

इंडी आघाडीच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत एकाच वेळी अनेकांवर वरवंटा फिरला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सुरात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचवले. एका झटक्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा पत्ता कापला. नीतीश यांनी तात्काळ अशी परतफेड केली की इंडी आघाडीचे येत्या काळात पोतेरे होणार याचे संकेत मिळाले आहेत.

इंडी आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी खरगे यांच्यासाठी बॅटींग केली. इंडी आघाडीचे समन्वयक आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खरगे यांचे नाव जाहीर करावे असा प्रस्ताव मांडला. केजरीवाल यांनी त्यांना तात्काळ पाठिंबा दिला. खरगे यांच्या रुपाने देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळेल. निवडणुकीत याचा इंडी आघाडीला फायदा होईल, असे केजरीवाल म्हणाले.

 

ममता यांचा प्रस्ताव म्हणजे अचानक फुटलेला बॉम्ब किंवा डोक्यावर अचानक कोसळलेला कडा होता. हा प्रस्ताव अत्यंत अनपेक्षित होता. बैठकीत सहभागी असलेले शरद पवार, नीतीश कुमार यांच्यासारख्या अनेकांचे चेहरे या प्रस्तावानंतर पाहण्यासारखे झाले. ममता यांचा प्रस्ताव पंतप्रधान पदाचे मांडे खाणाऱ्या अनेकांना मानवणारा नव्हता हे स्पष्ट आहे.

 

सगळ्यात जास्त हडबडले खरगे. आपले नाव चालवून ममता आणि केजरीवाल हे राहुल गांधी यांचा गेम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इंडी आघाडी म्हणजे गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. ममता यांच्या प्रस्तावामुळे गांधी कृपेने जे काही हाती आहे, तेही गमावावे लागेल याची जाणीव झाल्यामुळे खरगेंना घाम फुटला. त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पंतप्रधान पदाचे निवडणुकीनंतर पाहू असे स्पष्ट करून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली.

 

ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावानंतर नीतीश कुमार यांनी पंतप्रधान पदाच्या दावेदारीबाबत अवाक्षरही न काढता चाणाक्षपणे विरोधाचे अत्यंत सूक्ष्म संकेत दिले. बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ आणि इव्हीएमच्या विरोधात मांडलेल्या प्रस्तावाचा त्यांनी उघड विरोध केला. बॅलेटची मागणी करण्यापेक्षा मतदान केल्यानंतर इव्हीएमवर मतदान केल्यानंतर मतदाराला पावती मिळण्याच्या मागणीचा पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले. राजदचे नेते जयंत चौधरी यांनी नीतीश कुमार यांचे समर्थन केले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंची अधिवेशनात तुफान फटकेबाजी; विरोधक क्लीन बोल्ड

इंडी आघाडीच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार

इव्हीएमच्या विरोधात सातत्याने कोण बोलतो आहे, हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या विषयात सर्वात आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी पाच राज्यातील निवडणुकीपूर्वी आणि नंतरही इव्हीएमचा मुद्दा वारंवार उपस्थित केला.

 

महाराष्ट्रातील त्यांची तैनाती फौज असलेल्या शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची री ओढली. ‘बॅलेटचा वापर करून निवडणूक घेऊन दाखवा’ असे बाष्कळ आव्हान त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिलेले आहे. संजय राऊत दर चार दिवसांनी या मुद्द्यावर बोलत असतात. ठाकरेंचे मूळ ज्या बिहारमध्ये आहे, त्याच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल आणि गँगने केलेल्या इव्हीएमविरोधी वातावरण निर्मितीवर बादलीभर पाणी ओतलेले आहे. राहुल गांधींना एक धक्का ममता आणि केजरीवाल यांनी दिला. दुसरा धक्का नीतीश यांनी.

 

पंतप्रधान पदावर डोळा ठेवून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेचा पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल आणि आपोआप त्यांचे नाव पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत येईल असा हिशोब होता. रघुराम राजन यांच्यासारखे चाटुकार अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांची झळाळी वाढवण्यासाठी यात्रेत सहभागी झाले. भारत जोडो यात्रेतील वक्तव्य काँग्रेसपेक्षा भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. मध्यप्रदेशमध्ये भाजपाने सत्ता टीकवली. राजस्थान आणि छत्तीसगढ काँग्रेसकडून खेचून घेतले. राहुल यांना हा मोठा झटका होता. लोक त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीत, हे अनेकदा स्पष्ट झाले. आता इंडी आघाडीतील मित्र पक्षही त्यांना मोजत नाहीत ही बाब उघड झाली आहे.

 

नीतीश कुमार फक्त एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी देशाची ओळख ‘भारत’ या नावानेच असायला हवी, असे मत व्यक्त केले. नीतीश कुमार हे पाच वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना बिहारच्या राजकारणात फारसे स्वारस्य राहिलेले नसून देशाचे पंतप्रधान होण्याची त्यांची मनिषा लपून राहिलेली नाही. इंडी आघाडीतील दोन महत्वाच्या पक्षांनी पंतप्रधान पदासाठी खरगेंचे नाव घेतल्यामुळे नीतीश यांचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान पद मिळत नसेल तर इंडी आघाडी जगली काय किंवा संपली काय. त्यामुळे इंडी आघाडीच्या बैठकीत नीतीश कुमार यांनी ‘भारत’ या नावाचा आग्रह धरणे हे वाटते तितके सरळ नाही.

त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाईन घेतलेली आहे. भारतात झालेल्या जी २० परिषदेत मोदींनी भारत या नावाचा आग्रहाने वापर केला. त्यावरून विरोधी पक्षांनी बराच गदारोळ सुद्धा माजवला होता. इंडी आघाडीच्या बैठकीत नीतीश यांनी त्याच नावाचा आग्रह धरणे या योगायोग नक्कीच नाही. नीतीश यांच्या या वक्तव्याचे टायमिंग आघाडीसाठी धोकादायक आहे.

खरगे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवल्यानंतर काय होईल याचा अंदाज ममता किंवा केजरीवाल यांना नव्हता, असे मानणे भाबडेपणाचे होईल. केजरीवाल आणि ममतांची त्यांच्या त्यांच्या राज्यात पकड आहे. त्यांना काँग्रेसची गरज नाही. किंबहुना काँग्रेसशी आघाडी त्यांच्यासाठी ब्याद ठरण्याची शक्यता आहे. परंतु भाजपाविरोधी आघाडीत एकत्र आलो नाही, तर भाजपाची ‘बी टीम’ असा शिक्का बसणार. त्यापेक्षा आघाडीत शिरून बत्ती लावावी असा विचार दोघांनी केला. इंडी आघाडीच्या बैठकीपूर्वी हे दोन्ही नेते भेटले होते. त्यांनी एकत्रितपणे खरगेंचे नाव पंतप्रधान पदासाठी रेटले. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. नीतीश यांनी पहिला बॉम्ब फोडला आहे. लवकरच राहुल आता खरगेंच्या बुडाखाली ब़ॉम्ब फोडतील अशी शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version