मतलबी वारे सुस्साट… काँग्रेस फुटणार, मविआ बुडणार?

निवडणुका एकदा जाहीर झाल्या की स्वबळाचा नारा देत सगळे पक्ष वेगळा संसार थाटतील

मतलबी वारे सुस्साट… काँग्रेस फुटणार, मविआ बुडणार?

महाविकास आघाडी ही सत्ता मिळवण्यासाठी करण्यात आलेली जुळवाजुळव होती. हिंदुत्ववादी शिवसेनेची सेक्युलर सुंता करून त्यांना सोबत घेण्यात आले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा शेंदूर फासण्यात आला. २०२२ मध्ये मविआची सत्ता गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता बदल होईल, इंडी आघाडीची सत्ता येईल अशी आशा होती. तसे काही घडले नाही. आता विधानसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव हाती लागला. पुढची पाच वर्षे ना केंद्रात सत्ता मिळणार ना, राज्यात. त्यामुळे सोबत राहून फायदा काय हा विचार तिन्ही पक्षांत जोर धरतोय. जोरात वाहणारे हे मतलबी वारे लवकरच मविआचे तारु बुडवणार असे संकेत मिळू लागले आहेत. आधी हे पक्ष फुटणार की मविआ एवढाच प्रश्न आहे.

काँग्रेसमध्ये अतंर्गत संघर्षाने कळस गाठलेला आहे. जिंकलेले १६ आमदार काँग्रेससोबत राहतील याची सुतराम शक्यता नाही. जिंकलेल्यांचा विषय सोडा, हरलेल्या दिग्गज नेत्यांमध्येही चलबिचल सुरू आहे. जिंकलेले-हरलेल्यापैकी काही भाजपाकडे काही, अजित पवारांकडे आशेने बघतायत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होत होती, ते बाळासाहेब थोरात भाजपामध्ये जातील अशी जोरदार चर्चा आहे. खरे तर ही चर्चा राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये आले तेव्हाच सुरू होती. त्यावेळी थोरात भाजपामध्ये येणार अशी चर्चा सुरू असताना विखेंनी वेळीच निर्णय घेतला आणि बाळासाहेब थोरात विचार करत बसले. विखे आणि थोरात यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. विखे भाजपामध्ये गेल्यामुळे तिथे जाण्यात अर्थ नाही, असा विचार थोरातांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

थोरात हे विचारी नेते आहेत. ते ज्या संगमनेरमधून विजयी होतात तो त्यांचा गड मानला जातो. परंतु महायुतीच्या लाटेत तेही यंदा वाहून गेले. संगमनेरमध्ये थोरातांच्या विविध सहकार संस्थांचा पसारा आहे. सरकारच्या मदतीशिवाय त्यांचा कारभार चालवणे सोपे नसते. ही फक्त थोरातांची समस्या नाही. काँग्रेसमधील अनेकांची आहे. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेवर येऊ नये म्हणून महाराष्ट्रात इतकी उलथापालथ का घडवण्यात आली. त्याचे कारण स्पष्ट आहे. फडणवीस आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीवर बुलडोजर चालवतील. काँग्रेसला संपवूनच टाकतील अशी भीती होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत ही भीती बोलूनही दाखवली होती. मविआच्या प्रयोगामुळे २०१९ मध्ये येणारे मरण पाच वर्षे पुढे ढकलण्यात काँग्रेसला यश आले. २०२२ मध्ये महायुतीची सत्ता आली होती, परंतु, सत्तेची सूत्र फडणवीसांच्या हातात नव्हती.

हे ही वाचा:

अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला होणार उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना धुतले

जन्मशताब्दी ‘चित्रसृष्टीनाथा’ची

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?

गेली पाच वर्षे जे टाळण्यात आले होते ते वादळ आता पुन्हा घोंघावते आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची सतत घसरगुंडी उडते आहे. पक्षाची प्रतिमा हिंदूविरोधी पक्ष अशा प्रकारची झालेली आहे. राहुल गांधी यांच्यावर तर आता भाजपाने थेट देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. पक्ष म्हणून गेल्या काही वर्षात रस्त्यावर उतरून लढण्याची काँग्रेसची क्षमता संपलेली आहे. जर ती असती तर दिसलीही असती. लोकांच्या समस्या घेऊन सरकारला भिडण्यापेक्षा भारत जोडो यात्रा सारखे इव्हेंट करून चमकत राहणे हे राहुल गांधी यांचे धोरण आहे. ते त्यातच खूष असतात. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी जोरात होती. एक है तो सेफ है… हे बहुधा त्यांनाही पटू लागले आहे.

शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले. तर मविआच्या शवपेटीला ठोकलेला तो अखेरचा खिळा ठरेल.उबाठा शिवसेनेने पुन्हा भगवी शाल पांघरण्याची तयारी सुरू केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मविआसाठी राबणाऱ्या काही यूट्युबर्सचे आभार मानले होते. त्यापैकीच एक असलेल्या निखिल वागळे यांनी ठाकरेंवर तोफ डागली आहे. ठाकरे जर हिंदुत्वाकडे वळणार असेल तर ती फसवणूक ठरेल. कारण ती मक्तेदारी भाजपाकडे आहे. ठाकरेंनी मविआची पालखी खांद्यावर घेतली तेव्हाही हिंदुत्ववादी मतदारांची, भाजपा-शिवसेनेला युती म्हणून मतदान करणाऱ्या मतदारांची फसवणूक होती. यावेळी मात्र ते त्यांना मतदान करणाऱ्या मुस्लीम मतदारांची फसवणूक करतायत. कारण हिंदुत्ववादी भाजपाला विरोध करण्याचा आव आणून ठाकरेंनी ही मतं पदरात पाडून घेतलेली आहेत.

ठाकरेंना हिंदुत्वाचे सर्टीफिकेट देऊन अबू आजमी यांनी मविआतून आधीच काढता पाय घेतलेला आहे. काँग्रेस नेते सुद्धा ठाकरेंची ही नवी भूमिका स्वीकारतील याची सुतराम शक्यता नाही. काँग्रेस समर्थक राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला जाहीरपणे म्हणाले होते. की उद्धव ठाकरे यांनी फक्त पक्ष आणि चिन्ह गमावलेले नाही. मतदार सुद्धा गमावला आहे. त्यांना जी मते मिळाली आहेत ती काँग्रेसची मते आहेत. जर ठाकरे काँग्रेसच्या मतांवर पक्ष चालवत असतील तर त्यांना काँग्रेसच्या भूमिके पलिकडे जाताच येणार नाही. हे ठाकरेंनाही माहिती आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाता करण्यापूर्वी त्यांनी याचा
निश्चितपणे विचार केलेला असणार. महापालिका निवडणुका एकदा जाहीर झाल्या की स्वबळाचा नारा देत सगळे पक्ष वेगळा संसार थाटतील अशी दाट शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version