त्या ईव्हीएमची शपथ तुला…

जनतेला उचकावून रस्त्यावर उतरविण्याचा कट मविआ आखत आहे

आरडाओरडा करून संसदेचे काम ठप्प करण्याची परंपरा काँग्रेसने सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना त्याची लागण लागलेली दिसते. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी आजपासून तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली. सत्ताधारी सदस्यांनी शपथ घेतली, परंतु ईव्हीएमवर बोंब ठोकत विरोधी पक्षांनी मात्र शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु ते शपथ घेणारच नाहीत, असा काही मामला नाही. कारण बहिष्कार फक्त
एकाच दिवसाचा आहे. यातून काय साधणार? विरोधक ईव्हीएमवर अविश्वास दाखवून आमदारकीचा राजीनामा देणार, असे वाटत असताना उद्या शपथ घेणार असे सांगून विरोधकांनी जनतेचा अपेक्षाभंग केलेला आहे.

पराभवाच्या धक्काने मविआचे जहाज फुटणार, अशी अटकळ बांधण्यात येत होती. त्याची सुरूवात झालेली आहे. मविआच्या नेत्यांनी आज शपथविधीवर बहिष्कार घातलेला असताना समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबु आजमी मात्र शपथ घेऊन मोकळे झाले. उबाठा शिवसेनेचे आमदार अर्धवेळ मातोश्री निवासी मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी पतानाचा फोटो एक्सवर अपलोड केल्यामुळे ते चिडले असावेत. कारण महापालिका निवडणुकीपुरती हिरवी चादर बाजूला करून उबाठा शिवसेनेने पुन्हा भगवा हाती घेतला आहे. यामुळे आजमी चिडले. परंतु उबाठा शिवसेनेला मविआतून हाकलावे म्हणून जाणीवपूर्वक हा घाट घातला गेलेला असेल याची शक्यता जास्त आहे.

हे ही वाचा:

लातूरमधील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

मालेगाव मनी लाँडरिंग प्रकरण: ईडीकडून १३.५ कोटी रुपये जप्त

उद्धव ठाकरेंसाठीही आता मविआचे ओझे जड झालेले आहे. काँग्रेसच्या मिठीत आता त्यांना दुर्गधी येऊ लागलेली आहे.
जहाज बुडायला लागल्यावर आधी उंदीर उडी मारतात असे ऐकले होते. मविआला टाटा, बाय बाय करून आजमींनी त्याची झलक दाखवली. वस्तूस्थिती ही आहे की, मविआच्या जहाजावर आता फक्त उंदीरच उरलेले आहेत. काही आता उड्या मारतील काही नंतर ही बाब वेगळी. मारकडवाडीतील नौटंकी राज्यभर कऱण्याचा मानस विरोध बोलून दाखवतायत. देशभरात त्यांना ईव्हीएमच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पेटवण्याचे सुतोवाच विरोधकांनी केले
आहे. मारकडवाडीतल्या मतदारांना बॅलेटवर वोटींग करायचे होते तर त्यात सरकारचे काय जात होते? त्यांना पोलिसांनी का रोखले? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड विचारतायत.

आव्हाड लक्षात घेत नाहीत, मारकडवाडीतल्या लुटुपुटुच्या मतदानात जिंकलेल्या आमदाराचे काय करणार? त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी निवडणूक अधिकारी लागणार, त्यासाठी लुटुपुटूचा निवडणूक आय़ोग बनवावा लागले. विजयी आमदारासाठी एक अभिरुप विधानसभेची निर्मिती करावी लागले. प्रकरण जर न्यायालयात गेले तर अभिरुप न्यायालयही स्थापन करावे लागले. विजय तेंडूलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे…मध्ये होते तसेच. हा खर्च कोण करणार ?
यावरून मविआचे नेते एकमेकांच्या उरावर बसू नयेत म्हणून आधीच, मारकडवाडीतील मर्कट लीलांवर सरकारने चाप लावला. विरोधकांची नौटंकी फक्त शपथविधीवर एका दिवसांच्या बहिष्काराने आटोपली. आमदारकीवर पाणी सोडून सरकारच्या विरोधात आंदोलन कऱण्याची संधी मात्र विरोधकांनी गमावली. म्हणजे आज शपथ घेतली नसेल तर ती उद्या ही मंडळी घेणारच आहेत. ज्या ईव्हीएमच्या नावाने बोटं मोडतांयत, त्याच ईव्हीएमचा निर्णय मान्य करत आमदार म्हणून मिरवणार आहेत, मग आंदोलनाचा प्रश्न येतोच कुठे?

कोणताही चटका- फटका न बसता यांना सरकारला चेपायचे आहे. बरं निर्लज्जपणा इतका की आज शपथविधीवर बहिष्कार घालणाऱे उबाठा शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विरोधकांना उपाध्यक्ष पद मिळावे, अशी मागणी केलेली आहे. इतके तर्कहीन वागणे जमण्यासाठी पार रिकाम्या डोक्याची आवश्यकता आहे. थोडा फार मेंदू असलेला माणूसही एवढा उफराटा तर्क करणार नाही. आधी म्हणायचे तुमच्या मुलीचे बाहरे लफडे आहे, म्हणून लग्न करणार नाही. पण आज करणार नसलो तरी उद्या मात्र नक्की करेन. लग्नात हुंडा म्हणून मला नवी कोरी इनोव्हा द्या म्हणजे झाले. इतकी टुकार विनोदी स्क्रीप्ट कादरखानने सुद्धा लिहीलेली नसेल, भास्करराव!

युवराज आदित्य ठाकरे म्हणतायत, मॉकपोल होऊ द्यायला हवा होता. त्यांना सांगायला हवे. महापालिकेत असाही तुमचा बाजार उठण्याची चिन्ह आहेत. आपसांत निवडणुकीचा दिवस ठरवा, मारकडवाडी होऊ न शकलेला मॉक पोल घेऊन टाका. जिंकलो असे घोषित करून उद्धव ठाकरेंना महापौर घोषित करा. दारुण पराभवाने कोमात गेलेले विरोधक तोंडाला येईल ते बरळतायत. मनाला येईल ते करतायत. यातून जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. जनतेला उचकावून रस्त्यावर उतरवण्याचा हा कट आहे. परंतु ज्या मतदारांनी महायुतीला इतका जबरदस्त जनादेश दिलाआहे, विरोधकांची तोंडे काळी केली आहेत, त्यांच्यासाठी ती रस्त्यावर का उतरले ? जनादेशाचा असा अपमान होत राहिला तर विरोधकांचे तोंड फोडण्यासाठी मात्र जनता नक्कीच रस्त्यावर उतरले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version