वारीशेंमुळे ठाकरे सरकारच्या कद्रूपणाची आठवण झाली…

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ठाकरे सरकारने काय केले?

वारीशेंमुळे ठाकरे सरकारच्या कद्रूपणाची आठवण झाली…

राजापूरचे पत्रकार शशिकांते वारीशे यांचा एका दुर्दैवी अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा आरोप वारीशे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा सरकारी खून असल्याचा दावा करत वारीशेंच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

राऊतांच्या या मागणीमुळे आम्हाला पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ठाकरे सरकारने दाखवलेल्या कद्रूपणाची आठवण मात्र झाली. पत्रकार वारीशे यांची दुचाकी जीपच्या खाली येऊन झालेल्या अपघातात त्यांच्या मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप वारीशे यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जीप चालक पंढरीनाथ आंबेकर यांना अटक केली आहे.

पंढरीनाथ आंबेकर हे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात होते. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांची चांगली आर्थिक भरभराट झाली होती. जमिनीच्या व्यवसायात असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबध होते. महानगरी टाईम्स या वर्तमानपत्रासाठी वार्तांकन करणाऱ्या शशिकांत वारीशे यांनी आंबेकर यांच्याविरोधात बातमीही लिहीली होती. त्यामुळे व्यक्तिगत वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वारीशे यांच्या कुटुंबियांना याप्रकरणात घातपाताचा संशय येणे स्वाभाविक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यातून याप्रकरणातील खलनायक कोण हे उघड होईलच. परंतु या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा जो प्रयत्न संजय राऊत करतायत तो शिसारी आणणारा आहे.

हे ही वाचा:

फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

दिल्ली अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस खासदाराच्या मुलाला अटक

राजमौलींचा RRR स्पीलबर्गना वाटला भन्नाट

पत्रकार वारिसे यांच्या हत्येची होणार एसआयटी मार्फत चौकशी

संजय राऊत यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे का? असा सवाल केला आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही केलेली आहे. वारीशे यांची हत्या सरकारच्या बेफीकीरीमुळे झाली असून हा सरकारी खून आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून वारीशे यांच्या कुटुंबियांना किमान ५० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत हे पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात मुक्काम करून आले असले तरी कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा त्यांचा अधिकार संपत नाही. परंतु त्यांची मागणी त्यांच्या इतिहासाशी सुसंगत मात्र नाही. तुमचा वारीशे करू अशा धमक्या आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कधी काळी माफीया डॉन दाऊद ईब्राहीमशी माझ्या गाठीभेटी होत होत्या, वेळप्रसंगी मी त्याला फटकारायचो असा दावा करणारे संजय राऊत अलिकडे अशा धमक्यांनी अस्वस्थ का होतात, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे.

सौ दाऊद और एक राऊत अशी घोषणा देणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. तुरुंगाच्या उंच भिंतींमध्ये शंभर दिवस काढल्यानंतर व्यक्तिमत्वात घडलेला हा बदल असावा. महाविकास आघाडीचे सरकार असताना पत्रकार पांडुरंग रायकरचा सरकारी खून करणारे आता शिंदे-फडणवीस सरकारवर तोच ठपका ठेवतायत. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हीसेस या कोणतीही अनुभव नसलेल्या बोगस कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात संजय राऊत यांची महत्वाची भूमिका होती. कारण ही कंपनी त्यांचा मित्र सुजीत पाटकरची होती. याच कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पांडुरंग रायकरचा बळी गेला.

परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कद्रू महाविकास आघाडी सरकारने रायकर कुटुंबियांना फुटकी कवडीही दिली नाही. त्याला सर्वप्रथम तातडीची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केली, त्यानंतर भाजपाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी रायकर कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केली. प्रसिद्धी मिळवली. परंतु प्रत्यक्षात मदत केलीच नाही. अखेर रायकर यांच्या पत्नीला पत्र लिहून या मदतीची आठवण करून द्यावी लागली. तेव्हा कुठे वर्षभराने ही मदत देण्यात आली.

मविआचे चाणक्य म्हणवणाऱ्या संजय राऊतांना मित्राच्या कोविड सेंटरमध्ये झालेल्या पांडुरंग रायकर यांच्या सरकारी खूनाचा विसर पडलेला दिसतो. वारीशे यांच्या कुटुंबियांना मदत मिळायलाच हवी. किती मदत द्यावी हे सरकार निश्चित करेल. परंतु संजय राऊत यांना ही मागणी करण्याचा नैतिक हक्क आहे का? अशी मागणी करताना त्यांना लाज कशी वाटली नाही का, हा आमचा सवाल आहे.

मनसुख हिरेनचा तर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी खून पाडला. तो तर उघडपणे सरकारी खून होता. अशा व्यक्तिने केलेल्या खून ज्याची मुख्यमंत्री पाठराखण करत होते. अशा घटना ज्यांच्या कार्यकाळात झाल्या त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला अक्कल शिकवण्यापूर्वी स्वत:च्या चेहऱ्यावर पडलेले निर्दोषांच्या खूनाचे शिंतोडे तरी पुसायला हवे.

वारीशे यांच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून किमान ५० लाखांची मागणी करणाऱ्या राऊतांनी अशी मदत करण्यासाठी कधी स्वत:च्या आणि पक्षाच्या खिशात हात घातल्याचे कोणाला आठवते आहे का? याबाबतीत राऊत आणि त्यांचे पक्षप्रमुख सारखेच कद्रू आहेत. त्यांना फक्त घेण्याची कला साधली आहे. देण्यासाठी त्यांचा हात कधी वर झालेला दिसलेला नाही. वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहीजे यात दुमत होण्याचे कारण नाही, परंतु ज्यांच्या समर्थकांनी हत्या करून मुंब्र्याच्या खाडीत मृत देह फेकले अशा मेलेल्यांच्या टाळूवर लोणी खाणाऱ्यांनी उगाच सरकारकडे बोट दाखवून दिलदार पणाचा आव न आणलेला बरा.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version