22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीयकरून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव...

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरबशा कारभारामुळे मविआचे सरकार कोसळले

Google News Follow

Related

महाविकास आघाडीचे सरकार कोसळून सात महिने उलटल्यानंतर या अपयशाचे खापर फोडण्यासाठी माणूस अखेर सापडलाय. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरबशा कारभारामुळे मविआचे सरकार कोसळले, हे अवघा महाराष्ट्र जाणतो. परंतु शिउबाठाने हा ठपका नाना पटोले यांच्यावर ठेवण्याचे निश्चित केले आहे. आज मुखपत्रातून तशी जाहीर घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात जुंपली असल्यामुळे मविआलाही त्याचे हादरे बसू लागलेत. सामनातून आज पटोले यांच्यावर ठेवलेला ठपका या हादऱ्यांचे कंपन वाढवणारा आहे. ज्या वेगाने या घडामोडी घडतायत ते पाहीले तर मविआचे विसर्जन अगदी जवळ असल्याचे दिसते. विसर्जन टळले तर जे काही मविआ म्हणून जे काही उरेल तो फक्त सांगाडा असण्याची शक्यता जास्त आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसमधील दिग्गजांनी नाना पटोले यांची बाजू घेतल्यामुळे बाळासाहेब थोरात एकाकी पडल्याचे चित्र असताना शिउबाठाने थेट नाना पटोले यांना अंगावर घेतले आहे. नाना पटोले हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुणालाच जुमानत नाहीत, त्या तुलनेत बाळासाहेब थोरात परवडले हा शिउबाठाचा सरळ हिशोब आहे. पटोले यांचा वाद थोरात यांनी दिल्ली दरबारी नेला असताना शिउबाठाने आपले दान थोरातांच्या पारड्यात टाकले आहे. सामनाच्या अग्रलेखात पटोले यांना लक्ष्य करून थोरांतांची बाजू घेण्यात आली आहे. सामना वाचत नाही, अशा शब्दात यापूर्वी पटोले यांनी हाणल्याचा हा खुन्नस आहे बहुदा.

यशाचे अनेक बाप असतात, अपयशाला मात्र वाली नसतो, असे म्हणतात. मविआचे सरकार कोणामुळे कोसळले हे उघड गुपित आहे. जनतेत त्याची उघड चर्चाही झालेली आहे. परंतु आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून हे शिउबाठाचे पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांचे धोरण असल्यामुळे त्यांनी सरकार कोसळण्याची जबाबदारी स्वीकारणे कायम टाळले. ते कायम एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नावाने ठणाणा करत राहिले. दुसऱ्यांकडे बोट दाखवत राहिले.
मविआचे सरकार कोसळण्याची अनेक कारणे आहेत, परंतु नाना पटोले यांनी तडकाफडकी दिलेला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण आहे, असे सामनाच्या संपादकीयात म्हटले आहे. पटोले यांच्यावर ठपका म्हणजे उद्धव ठाकरे यांना क्लीनचिट आहे.

हे म्हणजे ज्याच्यावर ठपका आहे, त्यानेच न्यायदान करून स्वत:ची सुटका करून घेण्यासारखे आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत, नानांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच उभाच राहीला नसता. मुळात सरकार कोसळण्याची रडकथा शिवसेनेतील धुसफुशीपासून सुरू झाली. शिवसेनेत फुट पडली नसती तर सरकार कसे कोसळले असते? उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहिले असते मग, युवराजांना रोज उठून सरकारला, मुख्यमंत्र्यांना इथून माझ्यासमोर लढा, तिथून लढा, निवडणुका घेऊन दाखवा अशी नवनवी आव्हाने द्यावी लागली नसती. एकसंध शिवसेनेत जो पेच निर्माण झाला ते सर्वस्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कर्तृत्व. त्याचा नाना पटोले यांच्याशी काय संबंध.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

कॉन्स्टेबलने वरिष्ठाच्या डोक्यात घातली काठी आणि…

गोदरेजची याचिका फेटाळली .. बुलेट ट्रेन सुस्साट

टाईम्स स्क्वेअरवर झळकले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे बॅनर

उद्धव ठाकरे घरी बसून होते, ते कुणाला भेटायचे नाहीत, कुणाचा फोन घ्यायचे नाहीत, आमदार सोडा मंत्र्यांनाही त्यांचे दर्शन व्हायचे नाही. कारण मंत्रालयात जाणार नाही आणि मातोश्री किंवा वर्षावर भेटणार नाही, असा ठाकरेंचा बाणा होता. युवराज आदित्य ठाकरे नाईट लाईफच्या मुद्यामुळे व्यस्त होते. त्यामुळे आमदारांमध्ये खदखद होती. घरी बसून फक्त नेत्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू होते. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयात वरूण सरदेसाई यांच्या मार्फत आदित्य ठाकरे यांची शिरजोरी सुरू होती. त्यांना कितीही दुखावले तरी ते जाणार कुठे, असा ठाम विश्वास असल्यामुळे शिवसेना फुटली.
परंतु उद्धव यांची सरकार कोसळण्याच्या पापातून निर्दोष मुक्तता करण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणे गरजेचे होते. त्यामुळे नानांच्या राजीनाम्याशी याचा संबंध जोडण्यात आला आहे.

कुणाच्या राजीनाम्याशी याचा संबध असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याशी आहे. उद्धव यांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता, तर हे सरकार पडले नसते, तर पाडावे लागले असते. परंतु कामाची सवय नाही, राजकारणाची समज नाही, त्यातून राजीनामा देऊन उद्धव यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रय़त्न केला. सत्ताही गेली, सहानुभूतीही मिळाली नाही. त्यामुळे आता नाना पटोले यांच्यावर खापर फोडण्याची वेळ आलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा