महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो काय?

शिउबाठाला पूर्वीचा तोरा आणि अहंकार बाजूला ठेवून मन मोठे करून आघाडी करावी लागणार आहे.

महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो काय?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक झाली. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला. आता महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव करणार भीमगर्जना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर केली आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर या निवडणुकीत भाजपाचा पराभव अगदीच अशक्य नाही. परंतु त्याच्या काही पूर्व अटी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस १, एमआयएम १, अपक्ष १, असे होते. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात बरीच उलथापालथ झालेली आहे. त्यामुळे जागा वाटपाचे आकडे इकडचे तिकडे होणार हे निश्चित.

आज झालेल्या बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्वाधिक जागा शिउबाठाला मिळणार असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे गणित मांडण्यात आले आहे. अनुक्रमे २१, १९ आणि ८ असे जागावाटप होऊ शकते, अशी चर्चा पहिल्या फेरीत झाल्याचे वृत्त एका वाहिनेने दिले आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. काँग्रेस इतक्या कमी जागांमध्ये राजी होईल, अशी अजिबात शक्यता नाही.

तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांबाबत चर्चा झाली होती. शिउबाठा १८ आणि दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १५ जागांवर लढणार असे ठरले होते. ‘जिंकलेल्या जागांपेक्षा आम्ही एकही जागा कमी लढणार नाही, जर एकही जागा कमी लढलो तर मी कमजोर झालो आहे’, असा अर्थ काढला जाईल असे ठाकरे यांनी या बैठकीत निक्षून सांगितले. काँग्रेसने सुद्धा १५ पेक्षा कमी जागा लढणार नाही असे ठणकावून सांगितले. ही स्थिती तीन महिन्यांपूर्वी होती. कर्नाटक विजयानंतर पुन्हा काँग्रेस मोदीविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस नेते दुय्यम भूमिका घेतील अशी शक्यता कमी आहे.

उमेदवार चांगला दिला, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव होऊ शकतो, हे कसबा पोटनिवडणुकीने दाखवून दिले. भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने भाजपाचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात काही पेच आहेत. पक्षफुटीमुळे शिवसेना उबाठाची ताकद किती, हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिउबाठाला ज्या जागा दिल्या जातील त्याचा आधार ठरवणे कठीण होऊन बसले आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे बलाबल पाहीले तर शिउबाठा हा आज सगळ्यात कमजोर पक्ष आहे. लोकप्रतिनिधी सोडून गेले तरी जनता आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या सोबत आहेत, असा दावा आघाडीतील अन्य दोन मित्र पक्षांनी वारंवार केला आहे. हा दावा खरा होता की फक्त ठाकरेंना सांत्वन देण्यासाठी होता हे जागावाटप झाल्यानंतरच स्पष्ट होईल. जागा वाटप करताना आघाडीतील मित्र पक्षांनी पूर्वीची भावना कायम ठेवली तर शिउबाठाला सर्वाधिक जागा द्याव्या लागतील. परंतु या आभासी गृहितकावर शिउबाठाला सर्वाधिक जागा देण्याची इतर दोन पक्षांची तयारी असेल काय?

वस्तूस्थिती लक्षात घेतली तर सध्या शिउबाठाकडे १५ आमदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला अभय दिल्यानंतर या आमदारांमध्येही चलबिचल आहे. चिन्ह आणि नाव नसलेल्या पक्षातून निवडून येणे सोपे नाही. याच कारणामुळे सध्याच्या १५ तील आणखी काही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक जवळ येईपर्यंत शिउबाठाची परिस्थिती अधिकच तोळामासा झालेली असेल. अशा पक्षाला क्षमतेपेक्षा जास्त जागा दिल्या तरी मविआचे नुकसान होईल. कमी जागा दिल्या तर ठाकरे अस्वस्थ होतील, अशा पेचात मविआ अडकणार हे स्वाभाविक आहे.

काँग्रेसचा भावही कर्नाटक निवडणुकांनंतर वधारणार, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि शरद पवार यांना आघाडीचे गणित जुळवण्यासाठी कसरत करावी लागणार हे उघड आहे. मविआमध्ये आता या तीन पक्षांच्या सोबत अन्य काही घटक पक्ष सुद्धा आहेत. वंचित आघाडीशी शिउबाठाने युती केलेली आहे. वंचित आणि एमआयएमची आघाडी आहे. या पक्षांनाही आपआपल्या कोट्यातून जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आहेत तेवढ्या जागा मिळाल्या तरी तिढा सुटत नाही. वंचित आघाडीला त्यातूनच जागा द्याव्या लागणार आहेत.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!

सीबीआयप्रमुखांचे हिमाचल प्रदेश ‘कनेक्शन’

‘पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याची कहाणीही दाखवा’

कर्नाटकचा मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्ष खरगे ठरवणार

जागा वाटपाची चर्चा प्रत्यक्षात सुरू होण्याआधी शिउबाठाने मित्र पक्षांमध्ये वाटमारी सुरू झालेली आहे. खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम, महाडमध्ये काँग्रेसच्या स्नेहल जगताप आणि भाजपाचे अद्वैत हिरे यांनी नाशिकमध्ये शिउबाठात प्रवेश केला आहे. भाजपाशी जवळीक असलेले सोलापूरचे अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. येत्या काही दिवसांत एकमेकांचे लचके तोडून मविआतील प्रत्येक पक्ष आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करेल. त्यातून काही छुटपूट संघर्ष उद्भवल्यास ते अंगावर घेण्याची या नेत्यांची तयारी आहे.

परंतु एकूण चित्र पाहाता, शिउबाठाला पूर्वीचा तोरा आणि अहंकार बाजूला ठेवून मन मोठे करून आघाडी करावी लागणार आहे. मविआमध्ये असलेले विशेष स्थान आता ठाकरेंनी गमावले आहे, याची चुणूक सिल्व्हर ओकवर झालेल्या कालच्या बैठकीत दिसलीच. फक्त शरद पवार यांच्यासाठी स्वतंत्र खुर्ची होती. ठाकरेंची रवानगी अन्य नेत्यांसोबत सोफ्यावर झाली. ते नाना पटोले यांच्यासोबत सोफ्यावर बसले होते. बैठक पवारांनी घेतली. मविआच्या काळात शरद पवार आणि काँग्रेस नेते मातोश्री किंवा वर्षा निवासस्थानी हेलपाटे मारत असत. भविष्यात ठाकरेंनाच सिल्व्हर ओकचे हेलपाटे मारावे लागतील असे चित्र आहे. जागावाटपाचे चित्र कसे काय असू शकेल याची झलक दाखवणारी बैठकीतील ही आसन व्यवस्था. जागावाटपाचे सूत्र पवारच ठरवणार. ते मान्य करण्याशिवाय ठाकरेंकडे फार पर्याय उपलब्ध नाही.

अजित पवार हा या सगळ्या घडामोडीतील एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. ते कुठे असतील ही बाब मविआचे गणित घडवू-बिघडवू शकते. काँग्रेसने जागा वाटपाचे गणित जुळवले तर भाजपाचा पराभव शक्य आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version