सत्तेचे च्यवनप्राश अदभूत असते. सत्ता हाती असताना माजलेल्या बैलासारखे भासणारे, सत्ता गमावल्यानंतर अचानक बेडकीच्या आकाराचे होतात ते त्यामुळेच. कधी काळी देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रात दरारा असलेली शिवसेना आता दिसेनाशी होत चालली आहे. बैलाची बेडकी होण्याची कारणे आणि दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची भाषा, देहबोली यात कमालीचे साम्य आहे. ‘आम्ही तुम्हाला भरभरून दिलं’, या मानसिकतेत असलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला, सगळी पद घरी ठेवता आली असती का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजस्थानचे सोनियानिष्ठ मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची अपेक्षित प्रतिक्रिया आली. ‘ज्यांना पक्षाने भरभरून दिले ते आज वाईट काळात पक्ष सोडून चालले आहेत.’ गेहलोत यांची ही भाषा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली होती. ‘ज्यांना सर्व काही दिलं ते पक्ष सोडून गेले, ज्यांना काहीच मिळालं नाही ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत.’
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना मुलाखत देताना नेमक्या याच मानसिकतेवर हल्लाबोल केला. ‘आम्ही दिलं म्हणजे काय? मुघल रियासत आहे का ही? लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत, म्हणून नेमणूका झाल्या. आता तुम्हाला दिलं, मग त्यावर तुम्ही समाधानी असलं पाहिजे, ही मानसिकता कसली? म्हणून नेमणूका नको निवडणुका हव्या’, असे मत त्यांनी मांडले.
काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे आणि शिवसेना हा प्रादेशिक पक्ष परंतु दोन्ही पक्षांच्या पडझडीचा विचार केला तर अनेक साम्यस्थळे आपल्याला दिसतील. दोन्ही बाजूला सत्ता घरातच ठेवण्याची धडपड आहे, पुत्रमोह आहे. क्षमता नसलेल्या युवराजांच्या हाती केवळ वारशाने नेतृत्व देण्याची मानसिकता आहे. क्षमता नसलेल्या युवराजांमध्ये ‘अहम् ब्रह्मास्मी’चा भाव आहे. भोवती हा गैरसमज जपणाऱ्या चाटुकारांचे कोंडाळे आहे. हे चाटुकार ‘तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो’, अशा आरत्या ओवाळत असल्यामुळे त्यांना महत्व आहे. चाटुकारांचे प्रस्थ वाढल्यामुळे अनुभवी आणि सक्षम नेते दुय्यम भूमिकेत गेले आहेत. तिथे जी-२३ आहे, इथे एकनाथ चालिसा आहे.
न्यूज एंकर अंजना ओम कश्यप हिने ‘ये शिवसेना का पप्पू होगा’, हे भाकीत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलं होतं. राहुल आणि आदित्य या दोघांच्या क्षमता सारख्या आहेत. दोघांना पक्षातील जाणत्यांचे वावडे होते, कारण ते प्रश्न विचारतात. म्हणून त्यांना मोडीत काढून पक्ष ताब्यात घेण्यासाठी दोघेही प्रयत्न करीत होते. त्यातूनच त्यांचे कोंडाळे निर्माण झाले. पक्षातले महत्वाचे निर्णय राहुल यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक घेतात हा गुलामनबी यांच्या आरोप त्यातूनच झाला. इथे महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर वरूण सरदेसाई यांचे नेतृत्व पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे उगवले. एकनाथ शिंदे यांनी केल्या बंडामागे वरूण सरदेसाई यांचा नगरविकास खात्यातील प्रछन्न हस्तक्षेप होता, हे आता उघड झाले आहे.
दोन्ही पक्षात असे चित्र असल्यामुळे ज्यांच्यात धमक आहे, ते नेते बाजूला झाले. काँग्रेसमध्ये हिमंता विस्वसर्मा, कॅप्टन अमरींदरसिंह, ज्योतिरादित्य, गुलाम नबी, कपिल सिब्बल असे अनेक नेते पक्षातून बाजूला झाले. ही गळती अजून सुरू आहे. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाहीची मागणी उचलून धरणाऱा जी २३ गटातील आणखी किती कमी होतील ते सांगता येत नाही. पृथ्वीराज यांनी जो मुघल रियासतीचा, सरंजामी मानसिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता महत्वाचा आहे. आम्ही दिलं ही भावना मुळात येते कुठून?
हे ही वाचा:
राममंदिरातून लालबागच्या राजाची दिसली पहिली झलक
लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले
एव्हरेस्ट सर करणारे अरुणाचलचे पहिले गिर्यारोहक बेपत्ता
पक्ष चालवायचा असेल तर दुसऱ्याला पदं द्यावीच लागतात. सगळीत पद कुटुंबाकडे कशी ठेवता येतील? एखादा नेता जेव्हा पक्षासाठी दोन-तीन दशकं घाम गाळतो, तेव्हा त्याला समाजात ओळख मिळते. त्याच्या जनसंपर्काचा वापर पक्षासाठी होईल असा विचार करून त्याला पक्षात मोठं केलं जाते. जर कार्यकर्ताच नसेल तर नेत्याचे अस्तित्व राहणार कसे हा मुद्दा आहे. सर्वोच्च नेतृत्वाने कितीही प्रयत्न केला तरी सगळी पदं घरातल्यांना देणे अशक्य आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांना पदं दिली, एकाच मंत्रिमंडळात बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री हा चमत्कार देशाने पाहिला. भाच्याला पक्षात पद दिले.
राज ठाकरे, जयदेव ठाकरे, दिवंगत बिंदा ठाकरे यांचा परिवार आदी नातेवाईकांशी उद्धव ठाकरे यांचे वाकडे नसते आणि ते उद्धव शरण नसल्यामुळे त्यांना पदं दिली नाहीत. उद्धव यांची कितीही इच्छा असली तरी ते मविआच्या काळात सर्व मंत्री पदं घरी ठेवू शकले नसते. त्यामुळे जे दिले ते घरातून आणि खिशातून असा जो आव शिवसेना आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व आणते आहे तो गैरलागू आहे. पक्ष ही आपली वडिलोपार्जित मालमत्ता आहे, क्षमता असो वा नसो त्यावर आपला हक्क आहे, ही मानसिकता पक्षाच्या सद्यस्थितीला जबाबदार आहे. दोन्ही पक्षाचे नेतृत्व त्यातून धडा घेण्याच्या मानसिकतेत नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)