बघ माझी आठवण येते का?
सिल्व्हर ओकवर जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होताना
थोडासा मागे जा, भूतकाळाची जळमटं दूर सार
बघ माझी आठवण येते का?
उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांना या ओळी ऐकवण्याची उर्मी भाजपाच्या नेत्यांना निश्चित होत असणार. भाजपा- शिवसेना युतीच्या काळात असलेला या दोघांचा तोरा आता पूर्णपणे उतरला आहे. तेव्हा थेट लालकृष्ण आडवाणींना फोन करण्याची सोय होती. आता नाना पटोले यांना चेपण्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्या दिवशी शब्द मागे घ्यावे लागत आहेत. मी असे काही म्हणालो असल्याचे मला आठवत नाही, अशी सारवासारव करावी लागते.
मविआचे जागावाटप अखेरच्या टप्प्यात असल्याचे तिन्ही मित्र पक्षांचे नेते वारंवार सांगत आहेत. जनता जनार्दन जागा वाटपाच्या आकड्यांची प्रतीक्षा करत असताना आघाडीतील बिघाडीच्या कथाच समोर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित असलेल्या बैठकीत येणार नाही, अशी भूमिका कालच प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतल्याच्या बातम्या दिवसभर चालत होत्या. आज राऊत म्हणतायत, मी असे काही बोलल्याचे स्मरत नाही. उबाठा शिवसेनेवर अशी परिस्थिती कधीही आलेली नव्हती. की काल बोललेले शब्द आज गिळावे लागतायत.
राऊतांना भाजपाची आठवण येवो न येवो उद्धव ठाकरेंना मात्र निश्चितपणे येत असणार… प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडे भाजपाची सूत्र असताना भाजपा नेते चर्चेसाठी मातोश्रीवर जायचे. किती ही वाटाघाटी, घासाघीस झाली तरी अखेरचा शब्द शिवसेनाप्रमुखांचाच असायचा. महाजन- मुंडेंनी एखाद्या जागेबाबत ताणून धरले असली की बाळासाहेब थेट लालकृष्ण आडवाणी यांना फोन करायचे. आडवाणी महाजनांना लगेचच सबुरीचा सल्ला द्यायचे, चार पावले मागे जाऊन पॅचअप व्हायचे. आता बदलेलेल्या दिल्लीश्वरांशी बोलणे इतके सोपे राहिलेले नाही. भाजपा- शिवसेना युतीच्या काळात घडणाऱ्या अनेक गोष्टी गेल्या पाच वर्षांच्या काळात घडताना दिसत नाहीत. त्या काळात गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात निवडणुका असल्या की शिवसेनेकडून भाजपाकडे जागांची मागणी व्हायची. या राज्यांत शिवसेनेची कणभर ताकद नसल्यामुळे ही मागणी कधी पूर्ण व्हायची नाही. मग शिवसेना त्यांचे उमेदवार मैदानात उतरवायची. हे उमेदवार भाजपाची मतं कापण्याचे काम करायचे. काँग्रेससोबत गेल्यानंतर हे सगळे बंद झाले आहे. गेल्या पाच वर्षात इतक्या निवडणुका झाल्या एकाही निवडणुकीत आम्हाला जागा द्या असे शब्द उबाठा शिवसेनेचे नेते तोंडातून बाहेर काढत नाहीत.
काँग्रेससोबत हात मिळवणी केल्यानंतर ठाकरेंचा पक्ष अन्य राज्यात लढणे विसरलेला आहे. काँग्रेसकडून जागा मागणे ही तर खूप दूरची गोष्ट. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी ही खंत बोलूनही दाखवली. मित्र पक्षांना जागा सोडल्या असत्या, तर काँग्रेसचा पराभव झाला नसता असे ते म्हणाले. परंतु, ही पश्चात बुद्धी होती. आम्हाला हरियाणात लढायचे आहे, असे ना ठाकरे कधी बोलल्याचे ऐकीवात आहे, ना राऊत. काँग्रेससोबत गेल्यानंतर उबाठा शिवसेने फणा काढायचे बंद केलेले आहे. चुकून माकून फणा काढलात तर काँग्रेसवाले पायाखाली चेपून टाकतात. नाना पटोले यांच्या उदाहरणावरून हे स्पष्ट झालेले आहे.
सध्या उबाठा आणि काँग्रेसमध्ये जी तणातणी सुरू आहे ती विदर्भातील जागांवरून सुरू आहे. विदर्भात उबाठा शिवसेनेची ताकदच नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिथे ठाकरेंच्या पक्षासाठी फार जागा सोडण्याची त्यांनी तयारी नाही. मविआच्या बैठकीत नाना पटोलेंनी हेच सत्य स्पष्ट शब्दात सुनावल्यामुळे राऊतांना झोंबले आणि त्याच तिरमीरीत त्यांनी नाना हजर असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशा बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या गेल्या. काँग्रेसवाले झुकतील असा विचार करून ही खेळी खेळण्यात आली. प्रत्यक्षात दिल्लीश्वर काँग्रेस नेतृत्वाने फार किंमत दिलेली दिसत नाही. काँग्रेसवाले अशा बातम्यांना भिक घालत नाहीत. उबाठा शिवसेने सध्या आपल्या दयेवर आहे, हे काँग्रेसला पूर्णपणे माहिती आहे.
हे ही वाचा..
एक धमकीचा संदेश आणि विमान कंपन्यांना करोडोंचे नुकसान
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट
इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांच्या खासगी निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट
शुटरच्या फोनमध्ये झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सरचिटणीस वेणूगोपाल, मुकुल वासनिक या नेत्यांशी चर्चा केली. राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. राऊत मुळचे पत्रकार आहेत. ते कुणाशीही बोलू शकतात. अगदी सोनिया गांधी यांच्याशी देखील. परंतु, समोरचे त्यांचे कितपत ऐकतात हा सवाल आहेत. जर ऐकत असते तर नाना पटोले यांच्याबाबत केलेले विधान गिळावे का लागले असते. आज जर ठाकरेंना व्यवस्थित चेपले नाही तर चुकून माकून सत्ता आलीच तर ते आपल्याला सुखाने सत्ता राबवू देणार नाही, याची पूर्ण कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपाशी ठाकरेंचे संबंध जवळून पाहिले आहे. ठाकरे भाजपावर रुसून आपल्याकडे आले आहे. मनासारखे झाले नाही तर रुसून आणि फुगून बसणे हा त्यांचा स्वभाव आहे, हे काँग्रेस नेतृत्वाला ठाऊक आहे. त्यामुळे भलत्या सलत्या मागण्या ते मान्य करणार नाहीत. नाना पटोले यांच्याशीच चर्चा करावी लागले, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केल्यामुळेच संजय राऊत यांनी काल पेरलेले विधान आज नाकारले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)