भारताच्या गौरवशाली इतिहासातील लखलखता सोनेरी दिवस आज उजाडलाय. शतकांच्या यज्ञातून आज पन्हा एकदा केशरी ज्वाला उसळली आहे. दहा दिशांच्या हृदयातून पुन्हा एकदा अरुणोदय झालाय. पाचशे वर्षांच्या संघर्षा नंतर श्रीरामललांची स्थापना आज अय़ोध्येतील राम जन्मभूमीवर निर्मित एका भव्य मंदीरात झालेली आहे. हिंदू अस्मितेवर, शौर्यावर लागलेला डाग ६ डिसेंबर १९९२ रोजी पुसला गेला. आज त्याच ठिकाणी रामललांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सौगंध राम की खाते है, हम मंदीर वही बनाएंगे… अशी सिंहगर्जना हिंदू समाजाने काही दशकांपूर्वी केली होती. ही शपथ आज पूर्णत्वाला आलेली आहे. समस्त हिंदू समाजाला आनंदाचे भरते आले आहे, परंतु केवळ नावापुरते हिंदू उरलेल्या अस्तनीतील निखाऱ्यांना मात्र हा जल्लोष सहन होताना दिसत नाही. त्यांचे विव्हळणे सुरू आहे.
देश राममय झालेला आहे. आज २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार हे जाहीर झाल्यापासून देशात राम लहर निर्माण झालेली आहे. ठिकठिकाणी रोषणाई, श्रीरामांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज, भजन, पूजन, कीर्तन असा माहोल आहे. काल रात्री रामभक्तांनी दिवाळी साजरी केली. रात्रभर फटाके फुटत होते. आजच्या प्राणप्रतिष्ठेचे महत्व किती हे प्रत्येक हिंदू जाणून आहे. फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ, अमेरीका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशातील हिंदूंनी श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त जल्लोष केला आहे. जगभरातील हिंदू हा दिवस साजरा करतायत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले ११ दिवस या दिवसासाठी अनुष्ठान करीत आहेत. फक्त नारळ पाण्यावर राहून त्यांनी या दिवसांत कठोर यमनियमांचे पालन केले. त्यांना हे करायला कोणी सांगितले नव्हते. हे केले नसते तरी कोणी हरकत घेतली नसती. परंतु जे करायचे ते परीपूर्ण हा मोदींचा स्वभाव आहे. हा माणूस अंतर्बाह्य हिंदू आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत हिंदुत्व व्यक्त होत असते. हा पीळ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. कदाचित त्यामुळेच त्यांच्या हातून भव्यदिव्य कार्य घडतायत. मोदींच्या कार्यकाळात हिंदू समाजाने गेली पाच शकते पाहीलेले हे स्वप्न पूर्ण होते आहे, हा भाग्याचा क्षण आमच्या पिढीच्या नशीबी आला आहे. १२.२९ च्या शुभमुहूर्तावर श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा विधीवत सुरू झाली. पंतप्रधान मोदींच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ गर्भगृहात उपस्थित होते. देशभरातील रामभक्तांनी टीव्हीवरून श्रीरामांची काळ्या पाषणात घडवलेली चेहऱ्यावर स्मित हास्य असलेली तेजपूंज, बालमूर्ती डोळेभरून पाहिली. या मूर्तिकडे भावविभोर होऊन पाहणारा देशाच्या पंतप्रधानांचा चेहराही पाहिला.
या दिवसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी किंवा देशाच्या स्वातंत्र्य दिनाशीच होऊ शकते. कोट्यवधी हृदयात सुख, संतोष, समाधान, आनंदाच्या उर्मी उसळल्या. अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. देशात एक अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण असताना काही जणांच्या छातीवर साप लोटत होते. पोटात मळमळ होत होती, डोकं गरगरत होतं, मेंदू सुन्न झाल्याचा भास येऊन प्रचंड नैराश्य आलं होतं. कायम हिंदूविरोधाचे उकीरडे फुंकणाऱ्या निखील वागळे सारख्या पत्रकारांनी ही मळमळ जाहीरपणे व्यक्त केली. कलानगरचे सुलतान उद्धव ठाकरे यांनी सामनातून अपेक्षेप्रमाणे ओकाऱ्या काढल्या.
सुप्रिया सुळे यांनी आम्ही जय श्रीराम म्हणणार नाही, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून अशी बिनडोक विधाने केली. समजा काहीही म्हटलं नसतं आणि हा दिवस सुद्धा मटण खाऊन साजरा केला असता तर कोणाला फरक पडला असता? तुम्हाला, तुमच्या बाबरी समर्थक पिताश्रींना अय़ोध्येत श्रीराम विराजमान झाले याचा आनंद होणार नाही हे हिंदू समाजाने गृहीत धरलेले आहे. तुमचे काश्मीरातील स्नेही फारुख अब्दुल्ला यांनी लाजेखातर तर राम भजन म्हटले, तुम्ही तेवढेही करणार नाही, याची जनतेला खात्री होती.
इंडी आघाडीत सुतक पसरलंय. तळपलेले हिंदू तेज आपल्याला खाक करणार या विचाराने अनेक नेत्यांना हुडहुडी भरली आहे. भूत पिसाच निकट नही आवे… या हनुमान चालीसातील पंक्तीनुसार ही भूतं या राष्ट्रीय सोहळ्यापासून अंतर ठेवून आहेत. महाराष्ट्राच्या सुदैवाने दीड वर्षांपूर्वी तख्तापलट झाला आणि महायुतीचे सरकार आले. महा भकास आघाडीचे सरकार असते तर राज्यात दंगे होतील अशी भीती घालून सगळ्या उत्सवी वातावरणावर पाणी ओतण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांनी नक्कीच केले असते. जे तामिळनाडूमध्ये झाले तेच महाराष्ट्रात झाले असते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोणत्याही मंदिरात करण्यात येऊ नये असा फतवा द्रमुकच्या सरकारने काढला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या फतव्याच्या विरोधात एक्सवर घणाघात केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचा हिंदूद्रोही चेहरा उघड केला. तामिळनाडूमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रा, अन्नदान, भजन, किर्तनावर अघोषित बंदी लादण्यात आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कायद्याच्या चौकटीत काम करा, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारचे कान उपटले. तामिळनाडू सरकारचे मंत्री पी.के.सेकरबालू यांना अशी कोणतीही बंदी लादलेली नाही, असा खुलासा द्यावा लागला. तामिळनाडू सरकारने तोंड फोडून घेतले. स्टॅलिन स्वत:ला नास्तिक म्हणून घेतात. परंतु अनेक ख्रिस्ती धर्मसोहळ्यांमध्ये मी तुमच्यातील एक आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!
मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!
पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!
केवळ नावापुरते हिंदू राहिलेले लोक हिंदूंच्या धार्मिक सोहळ्यात लुडबुड करतात. हिंदू प्रथा, पंरपरांची निंदा नालस्ती करतात. देश अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या रंगात रंगला आहे. तामिळनाडूमध्येही त्याचे पडसाद उमटताना दिसतायत. अयोध्येत मोठ्या संख्येने जाणाऱ्या पर्यटकांमध्ये दक्षिणेतील लोकांची संख्या मोठी आहे. हिंदूविरोधाचे राजकारण करणाऱ्या द्रमुक सारख्या पक्षांचे नेते या धर्मजागरणामुळे हादरलेले आहेत. सरकारी वरवंटा फिरवून ही लाट रोखण्याचा प्रयत्न करतायत. शांतीदूत म्हणून आलेल्या श्रीकृष्णाला बंदी बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे त्यांच्या मेंदूलाही सूज आलेली आहे. पायावर कुऱ्हाड मारण्याची खुमखुमी ही अशीच असते.
एम.के.स्टॅलिन आणि शरद पवार यांची मानसिकता वेगळी नाही. ठाकरे आज अशाच लोकांच्या मांडीवर बसलेले आहेत. विकृताचार्य संजय राऊत यांची विधाने तर त्यांना मेंदू निकामी झालाय की काय अशी शंका निर्माण करणारी आहेत. अयोध्या आंदोलनाचे श्रेय त्यांना मुल्ला मुलायम यांनाही देण्याची सुरसुरी येते. अयोध्येतील मंदीर रामजन्मभूमीपासून चार किमी अंतरावर बांधल्याचा दावा ते करतात. प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यांना मोदी रामायण वाटतो. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रामभक्तांवर हल्ला करणारे नयानगरचे हिरवे गावगुंड आणि संजय राऊत यांच्यात फार फरक नाही. देशातील राममय वातावरणाला गालबोट लावणारे हे सगळे शिशुपाल आहेत. त्यांचे शंभर अपराध भरलेले आहेत. तरीही त्यांना चुका करण्याची मुभा आहे. परंतु या सगळ्यांचा हिशोब २०२४ मध्येच होणार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)