अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. कमला हॅरीस विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशा सामन्यात ट्रम्प यांचा दणदणीत विजय झाला. हेच घडणार होते. जनतेत ट्रम्प यांचीच लाट होती. परंतु अमेरिकन चाय-बिस्कुट मीडियाने मात्र लाट कमला हॅरीस यांचीच आहे, असे वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला. भारतातील काही चाय-बिस्कुट त्यांना सामील झाले होते. सगळा लिबरल, डावा, हिरवा मेन स्ट्रीम मीडिया हॅरीस यांच्या विजयासाठी घाम गाळत होता. उद्योगपती जॉर्ज
सोरोस त्यांचे चिरंजीव अलेक्स यांच्यासोबत हॅरीसबाईंसाठी मैदानात उतरले होते. अमेरिकी राष्ट्रवाद्यांनी या सगळ्यांना चांगलाच धडा शिकवत डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य विजयाचा मार्ग प्रशस्त केला. हा विजय भारतातील सोरोसच्या बगलबच्च्यांना आणि डाव्या मीडियालाही सणसणीत चपराक आहे.
भारता पाठोपाठ अमेरिकी निवडणुकांमध्येही लिब्रांडू कंपूचे तोंड काळे झाले. तिथेही सोरोस तंत्राचा जोरदार पराभव झाला. हा पराभव भारतातील राजकीय स्थैर्य आणि अखंडतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेटीव्ह सेट करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत होता. डावी लिबरल मंडळी आपापल्या एअर कंडीशन केबिनमध्ये बसून हे काम करत होती. तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार येऊ नये. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कडबोळे सरकार देशाच्या माथी मारता आले तर पाहावे, असा जोरदार प्रयत्न होता.
दुकाने बंद झालेले पत्रकार, धंदा मंदावलेले मीडिया हाऊस आणि सरकारने ताळ्यावर आणलेले एनजीओवाले मोदींच्या विरोधात एकवटले होते. परंतु मोदीच येणार असे चित्र त्यांनाही दिसत होते. जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या पिलावळीची स्क्रीप्ट राहुल गांधी यांनी वापरून पाहीली, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपाच्या खासदारांची संख्या घटली, परंतु मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्याचीच सुधारीत पुनरावृत्ती अमेरिकेत झाली, ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवून
सोरोस गॅंगच्या पेकाटात लाथच घातली.
अमेरिकेतला तमाम प्रतिष्ठीत आणि शक्तिशाली मीडिया सोरोस यांच्या इशाऱ्यावर नाचत होता. कमला हॅरीस जिंकल्यात जमा आहेत, अशा प्रकारच्या बातम्या लेख वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, रॉयटर्स, एबीसी न्यूज, पॉलिटीको अशी अनेक माध्यमे हॅरीस यांच्यासाठी लेखण्या झिजवत होती. कमला हॅरीस यांची वाढती लोकप्रियता, ट्रम्प यांचे वादग्रस्त व्यक्तिमत्व, रिपब्लिकन्सच्या तुलनेत डेमोक्रॅट्सचा वाढता जोर हेच विषय केंद्र स्थानी राहतील, असा प्रयत्न मीडियाने सातत्याने केला. न्यूयॉर्क टाईम्सने भाकीत केले होते की पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन या महत्वाच्या स्विंग स्टेट्समध्ये हॅरीस यांना बढत मिळेल. हे भाकीत तोंडावर आपटले.
सीएनएनचे राजकीय पंडीत वारंवार सांगत होते की, ट्रम्प अनेक कोर्टकज्जात अडकले असल्यामुळे विचारी मतदार त्यांच्या पाठीशी फारसा उभा राहणार नाही. परंतु अर्थकारण आणि घुसखोरी या विषयावर ट्रम्प यांनी मांडलेले विचार जनतेला जास्त भावले असे चित्र निकालांनंतर स्पष्ट झाले. अचूक निदानासाठी ओळखली जाणारी फाईव्ह थर्टी एट या वेबसाईटवरील ओपिनिअन पोलमध्ये वारंवार कमला हॅरीस यांना झुकते माप देण्यात येत होते. ट्रम्प यांच्या जागी एखादा कच्च्या गुरुचा चेला असता तर तो गर्भगळीत झाला असता. परंतु इलॉन मस्क आणि ट्रम्प ही जोडगोळी विजयाबाबत सुरूवातीपासून आश्वस्त होती. मीडीयातून तोडले जाणारे अकलेचे तारे सफेद झूठ सिद्ध झाले.
वॉशिंग्टन पोस्टमध्ये हॅरीस यांची निवडणुकीत कशी आगेकूच सुरू आहे, याबाबत लेखांच्या मालिकाच सुरू होत्या. हॅरीस यांची प्रतिमा संयमी, विचारी आणि सुसंस्कृत तर ट्रम्प कसे आक्रस्ताळे, आक्रमक आहेत, हे वाचकांच्या मनात रुजवण्यासाठी पद्धतशीर मोहीम सुरू होती. हेच कमी अधिक प्रमाणात एबीसी न्यूज, ऱॉयटर्स, पोलिटीको या माध्यमांनी केले. डेमोक्रॅट्सना बढत मिळते आहे, मतदारांचा कल हॅऱीस यांच्या बाजूने आहे. ट्रम्प यांना त्यांचा आक्रमक प्रचार नडणार, अशा प्रकारचे विविध नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. ट्रम्प यांनी हा प्रचार फाट्यावर मारत कडवट राष्ट्रवादाचा विषय आक्रमकपणे मांडला. लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन… ही त्यांची घोषणा अमेरिकन नागरिकांनी डोक्यावर घेतली. परंतु माध्यमांनी मात्र धुक्याची चादर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीपूर्वीच हॅरीस याच अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष होणार हे जाहीर केले होते.
हे ही वाचा:
हिंदू समाज एकत्र येऊ नये म्हणून काम करणारा संत म्हणजे शरद पवार!
आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!
५० लाख रुपये दे नाहीतर… शाहरुख खानला धमकी!
दिल्लीतील प्रदूषण; पेंढा जाळणाऱ्याला दुप्पट दंड
प्रत्यक्षात या प्रचाराचा सूत्रधार होता, अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस. त्याने आणि त्याचा पुत्र अलेक्स यांनी हॅरीस यांना जाहीर पाठींबा दिला होता. सोरोस यांचे एनजीओंचे जाळे, त्यांचा पैसा त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम हॅरीस यांच्यासाठी राबत होती. ट्रम्प यांच्या विरोधात सोशल मीडियावरून मोठी मोहीम या मंडळींनी हाती घेतली होती. हॅरीस आणि सोरोस यांच्या भूमिकेत मोठे साम्य होते. जगभरात वाढत असलेल्या कट्टरतावाद आणि जिहादी मानसिकतेबाबत हॅरीस बोटचेपी भूमिका घेत होत्या. भारतीय वंशाच्या असल्याचा दावा करून भारतीयांची मते घेण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी त्यांची धोरणे सोरोस यांच्याप्रमाणे भारतासाठी कोणत्याही प्रकारे अनुकूल नव्हती. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्या मौन राहिल्या. इस्त्रायलबाबतही हेच म्हणावे लागले. ट्रम्प यांनी मात्र बांगलादेशी हिंदूंबाबत ठाम भूमिका घेतली. त्यांच्यासाठी आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी संपूर्ण प्रचारादरम्यान भरभरून प्रशंसा केली आणि भारतीयांची मते आपल्यालाच मिळतील याची तजवीज केली.
ट्रम्प यांची धोरणे कठोर असतील, परंतु ती देशहिताची आहेत. देश आणि देशाची अर्थव्यवस्था टिकवायची असेल, अमेरीकेचे मोठेपण टिकवायचे असेल तर असाच माणूस सत्तेवर हवा, हा अमेरिकी जनतेचा स्पष्ट कौल होता. तिथल्या भारतीयांनीही किरकोळ विषयांना महत्व न देता ट्रम्प यांची धोरणे भारत आणि भारतीयांसाठी अनुकूल आहेत, या
विश्वासाने त्यांच्या बाजूने कौल दिला. एकाच वेळी हॅरीसबाई आणि सोरोस यांच्या चेल्याचपाट्यांचा पराभव केला.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)