टक्केवारीवाले यजमान चोरांचे स्नेहसंमेलन…

शिवतीर्थावर जमा झालेली ही टोळी स्वत:चे बूड वाचवायला एकत्र झालेली आहे

टक्केवारीवाले यजमान चोरांचे स्नेहसंमेलन…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल शिवतीर्थावर सांगता सभा झाली. इंडी आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी या काल या सभेला हजेरी लावली होती. देशातील विविध घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना एकाच ठिकाणी पाहण्याचे भाग्य या निमित्ताने भारतीय जनतेला लाभले. राजा की जान ईव्हीएम मे है… असे विधान करून सभेचे केंद्र बिंदू राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची कबुली दिली. विश्वप्रवक्ते संजय राऊत तर भाजपाला फूलटॉस देण्यासाठीच आज काल बोलतात की काय असे वाटू लागले आहे.

निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते प्रचंड आकांडतांडाव करत असताना न्याय यात्रेच्या सांगता सभेत रोखे सोडून ईव्हीएमवर राहुल गांधी बोलले. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीवारावर घसरले. तेजस्वी यादव मोदींना खोटेपणाचे होलसेलर म्हणाले याचा नेमका अर्थ काय? निवडणूक रोख्यांचा विषय अचानक बाजूला कसा पडला?

मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लावलेल्या सापळ्यात विरोधी पक्ष अलगद सापडले आहेत. निवडणूक रोख्यांच्या विषयावर विरोधकांनी ओरडा करावा, नंतर त्याच मुद्द्यांचा उपयोग करून मोदी-शहा जोडीने त्यांना जोड्याने मारावे अशीच मूळात योजना होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक रक्कम देणारी कंपनी फ्युचर गेमिंग एण्ड हॉटेल सर्व्हीसेस. या कंपनीने भाजपाला ४५० कोटी रुपये दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केलाय. भाजपा ऑनलाईन लॉटरीवाल्या कंपनीकडून पैसे घेते म्हणून तरुणांचे आय़ुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाई होत नाही, अशी बडबड संजय राऊत यांनी केली. एक्सवर ही पोस्ट त्यांनी अपलोड केलेली आहे.
प्रत्यक्षात शिवतीर्थावरील सभेत ठाकरेंसोबत बसून गप्पा मारणारे इंडी आघाडीतील त्यांचेच यार दोस्त फ्युचर गेमिंगच्या रोख्यांचे लाभार्थी आहेत.

द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना हेच या कंपनीचे मोठे लाभार्थी आहेत. फ्युचर गेमिंगच्या लोण्याचा सगळ्यात मोठा वाटा द्रमुकलाच मिळालेला आहे. बरं ही माहिती उघड करणारा तथाकथित गोदी मीडिया नव्हता बरं का? दोन दशकं ज्यांनी निष्ठा सोनिया चरणी अर्पण केलेले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर पोस्ट अपलोड करून ही माहिती उघड केली. कधी काळी शरद पवारांचे नेतृत्व असलेला राष्ट्रवादी काँगेस पार्टी हा पक्षही लाभार्थ्यांच्या यादीत आहे. नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी हे उबाठा गटाचे तमाम चट्टेबट्टेही या कंपनीचे लाभार्थी आहेत. फक्त संजय राऊत यांनी ज्या भाजपाचे नाव या प्रकरणात घेतले आहे, त्याचा उल्लेख राजदीप यांनी केलेला नाही.

संजय राऊत हे निडर व्यक्तिमत्व आहे. खोटं बोलायला, शिव्या द्यायला ते अजिबात घाबरत नाहीत. फार फार तर काय न्यायालयाने कान उपटले ते माफी मागायची आणि मोकळे व्हायचे. भीतीही नाही आणि लाजही नाही.
ऑनलाईन लॉटरीप्रकरणातही त्यांनी बिनबुडाचे दावे केलेले आहेत. या लॉटरीचे तारणहार म्हणून संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोट दाखवलेले असताना शिवतीर्थावर जमलेल्या चोरांच्या टोळीतील अनेक नेते ऑनलाईन लॉटरीवाल्यांच्या कृपेचा तीर्थ-प्रसाद घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

त्यामुळे राऊतांची टीका या टोळीलाच जास्त लागू होते. ही सगळी मंडळी शिवतीर्थावर ठाकरेंच्या गळ्यात गळे घालून बसली होती. राजदीप यांनी ही भानगड उघड केली, त्यांचे हे कृत्य म्हणजे संजय राऊत यांच्या भाषेत निव्वळ गद्दारी आहे.
कधी कधी संशय येतो की संजय राऊत हे डबल एजण्ट आहेत की काय? शिवसेनेत असताना शरद पवारांसाठी राबतात. शरद पवारांचे निष्ठावान असून राहुल गांधी यांची जी-हुजूरी करतात. एका बाजूला राहुलना मिठ्या मारत असताना भाजपाच्या हाती कोलीत देण्याचे कामही करतात.

राजकीय भाषेत याला उडता तीर अंगावर घेणे, असे म्हणतात. राऊतांनी भाजपावर हल्ला केला नसता, तर भाजपा नेत्यांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडावे लागले नसते. द्रमुकला मिळालेल्या घसघशीत देणगीची राजदीप यांची पोस्ट काल भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टिप्पणीसह पुन्हा पोस्ट केली होती. ती वाचली असती तरी राऊत यांना भाजपावर आरोप करण्यापूर्वी मामला काय ते लक्षात आले असते. की लक्षात आले होते तरी इंडी आघाडीच्या नेत्यांचे बरबटलेले चेहरे दाखवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला हे कळायला मार्ग नाही. शिवतीर्थावर जमा झालेली ही टोळी स्वत:चे बूड वाचवायला एकत्र झालेली आहे. ईडीने एकाला अटक केली की भाजपाच्या विरोधात ओरडा करायला सगळे एकत्र तरी हवेत म्हणून हा आटापिटा. थोडक्यात ही रुदाली गँग मोदींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आलेली नसून कोणी तुरुंगात गेला तर रडण्यासाठी एकत्र आलेली आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या पीएसएलचे बक्षीस महिला आयपीएलपेक्षाही कमी

रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून मुंबई इंडियन्स प्रशिक्षकाची बोलती बंद

गरिबांचे धर्मांतर करण्याचा गाझियाबादमध्ये प्रकार

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

 

निवडणूक रोख्यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर निर्भय बनो वाले विश्वंभर चौधरी मीम्स टाकतायत. मुलगी बापाला म्हणतेय, बाहेर तोंड दाखवण्याची जागा उरलेली नाही. तो बाप अर्थातच भाजपाचा नेता आहे. निवडणूक रोखे प्रकरण बाहेर आल्यामुळे बदनाम झालेला. वस्तूस्थिती उघड झाली तरी चौधरी त्यांच्या मीम्समध्ये स्टॅलिन आणि पवारांची खिल्ली उडवणार नाहीत. कारण ते प्रामाणिक आहेत. एकदा सुपारी घेतली की खरं खोट पाहायचं नाही, सुपारीला जागायचे.

 

जस्टीस विश्वंभर आणि विश्वप्रवक्ते यांच्यात बकवास करण्याची स्पर्धा लागलेली आहे. दोघेही भ्रष्टाचाराचे मेरूमणी असलेल्या शरद पवार आणि टक्केवारीवाल्या ठाकरेंची पालखी खांद्यावर घेऊन मोदींच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत. देशातील लोकशाही वाचवतायत. शिवतीर्थावर एकत्र झालेली गँग राहुल गांधी यांना नेता मानते की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. परंतु ठाकरे मात्र राहुलना आपला मालक मानतात. जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी बांधवांनो भगिनींना म्हणत त्यांनी भाषणाची सुरूवात केली. हिंदू बांधवांनो म्हटल्यावर राहुल बाबा पेटायचा, असा विचार त्यांनी केलेला असावा. ज्यांना राहुल गांधींसमोर मान वर करता येत नाही, मोदींना भिडायला चालले आहेत. केचवे का मंत्र जानते नही और चले कोब्रा से पंगा लेने.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version