लवासाचे तपशील सुप्रिया सुळेंच्या डायरीमध्ये आहेत का ?

भुजबळांच्या नव्या दाव्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पित्त खवळले आहे

लवासाचे तपशील सुप्रिया सुळेंच्या डायरीमध्ये आहेत का ?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर दीड वर्षांपूर्वी पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्यात एक डायरी सापडली होती. त्या डायरीत मातोश्रीशी संबंधित व्यवहारांचे काही खळबळजनक तपशील बाहेरही आला होता. राजकीय नेत्यांच्या डायऱ्या खास असतात. त्यामुळे तिजोरीत कुलूपबंद असतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची डायरी हाती लागली तर किती धमाके होतील कल्पना करा. अशी डायरी अस्तित्वात असल्याचा गौप्यस्फोट खुद्द सुप्रिया सुळे यांनीच केलेला आहे.

 

टीव्ही-9 चे संपादक उमेश कुमावत यांनी काल छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. भुजबळ हे आक्रमक नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. ते कायम तिखट बोलतात. अलिकडे ते सातत्याने त्यांचे गुरू शरद पवार यांच्यावर प्रहार करताय. शरद पवारांच्या धरसोड राजकारणावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वारंवार बोललेले आहेत. अजित पवार बोलले आहेत. काल छगन भुजबळ पुन्हा एकदा बोलले.

 

पहाटेच्या शपशविधीबाबत जे आजवर फडणवीस आणि अजित पवारांनी सांगितले, त्याची पुनरोक्ती भुजबळांनी केली. पहाटेच्या शपथविधीचे प्रकरण किती वेळा उकरले गेले आहे, परंतु लोकांना याबद्दल ऐकायला आवडते, पत्रकारांना प्रश्न विचारायला आवडतात. अजून या प्रकरणाची शिळी कढी झालेली नाही. लोक मुरलेल्या लोणच्यासारखी याची चव घेत असतात. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राजीनामा दिला कारण त्यांना सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे होते. त्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत जायचे असे ठरले होते, असा नवा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

हे ही वाचा:

सुप्रियाताईंना १०० कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल!

टीसींना चकवण्यासाठी फुकट्या प्रवाशांची नवी शक्कल

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

भारत – पाकिस्तान सामना कव्हर करायला ६० पाकिस्तानी पत्रकार येणार

भुजबळांच्या या नव्या दाव्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पित्त खवळले. त्यांना उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या. पाच दशकापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात-देशात राजकारण करणाऱ्या शरद पवारांचे दुर्दैव असे की, त्यांचा बचाव करण्यासाठी एखादा नेता पुढे येत नाही, त्यांच्या कन्येला समोर यावं लागते. त्यांनी काही ठोस मुद्दे मांडले.
‘शरद पवारांची भाजपासोबत चर्चा होत होती, परंतु त्यांनी कधी भाजपासोबत जाण्यासाठी होकार दिलेला नव्हता. ते काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम असल्यामुळे भाजपासोबत गेले नाहीत. त्यांची भाजपासोबत जाण्याची तयारी नव्हती, म्हणून माझी अध्यक्षपदी नियुक्ती करून राष्ट्रवादीने भाजपासोबत जावं असा पर्याय काढण्यात आला. परंतु मला माझ्या वडिलांशी आणि विचारांशी प्रतारणा करायची नव्हती म्हणून मी ते स्वीकारले नाही’.

 

सुप्रिया सुळे यांनी भाजपालाही सवाल केला आहे. एकीकडे आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला सोबत घेण्यासाठी चर्चा करायची हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल भाजपाकडून त्यांनी माफीची मागणी केली. सुप्रिया सुळे यांचा प्रतिवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी राजा हरिश्चंद्राचा अवतार शिल्लक असेल तर तो शरद पवार आहे, असा एखाद्याचा समज होऊ शकतो. जयप्रकाश नारायण यांच्या नंतर पवारच, असा विचार मनात येऊ शकतो. या भाजपाच्या पूर्वावतार असलेल्या जनसंघाला सोबत घेऊन पवारांनी पुलोदचा प्रयोग केला होता ना? तेव्हा विचार आड आला नाही. जेव्हा विषय सत्तेचा असतो तेव्हा पवारांना काहीच आड येत नाही, याचा अनुभव भाजपापासून सोनिया गांधींपर्यंत अनेकांनी घेतला आहे.

 

कधी पवारांना शिवसेनेची एलर्जी असते कधी भाजपाची. इतकी एलर्जी होती तर पवारांनी २०१४ मध्ये एकतर्फी पाठिंबा का जाहीर केला होता? याचे उत्तर सुळे यांनी द्यायला हवे. भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवार यांनी कधीच होकार दिला नव्हता, ही बाबही खरी नाही. भाजपाची चर्चा थेट शरद पवारांशी झाली होती असे फडणवीसांनी सांगितले आहे. भुजबळ सुद्धा तेच सांगतायत. कोणाला कोणती खाती द्यायची, कोणती महामंडळे द्यायची इथपर्यंत तपशीलाची चर्चा थोरल्या पवारांच्या होकाराशिवाय शक्यच नव्हती. पवारांनी भाजपाला शब्द दिला होता, परंत तो पाळला नाही, म्हणून अजित पवार फक्त तो शब्द पाळण्यासाठी पहाटेच्या शपथविधीला गेले, हेच फडणवीस म्हणाले होते. तेच भुजबळ म्हणतायत. वैचारिक बांधिलकी काँग्रेससोबत असल्यामुळे जर शरद पवार भाजपासोबत गेले नाहीत, हे सत्य असेल तर मग भाजपासोबत २०१४, २०१९ आणि २०२२ मध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या वेळ जात नाही म्हणून केल्या होत्या का? आणि जर एकाच वेळी भाजपाला आणि अजित पवारांना झुलवत ठेवण्याचे राजकारण पवारांनी केले असेल तर भाजपाने त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले तर त्यात चूक काय?

 

 

आपण शाळकरी वयापासून डायरी लिहितो. त्या डायरीत दिवसभरात जे जे काही घडले त्याची नोंद ठेवण्याची आपली सवय आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याच डायरीतील संदर्भाचा हवाला देऊन सुप्रिया सुळे यांनी भुजबळांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्या डायरीत काहीच खळबळजनक नाही. आपलं आय़ुष्य खूप बोअरींग आहे’, असेही त्या म्हणाल्या. थरार जर रोज घडत असेल त्यातली रोमांच संपून जातो. सुप्रिया सुळे यांच्यासोबत असंच काही घडले असण्याची शक्यता नाही. अन्यथा त्यांच्या डायरीत लवासासारख्या बऱ्याच रंजक नोंदी सापडू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणाल्यामुळे त्या प्रचंड चिडलेल्या आहेत. अशी चिडचिड खरे तर त्यांनी न्यायालयावरही करायला हवी, कारण लवासा प्रकरणात न्यायालयाने थेट ताशेरे ओढले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version