हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज…

शिंदेंच्या राजकारणाची चमक कायम आहे, तोपर्यंत ठाकरेंना हा त्रास

हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज…

मविआचे सरकार गेल्यापासून तोल ढळलेल्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता काही कमी होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंना आपले मुख्यमंत्रीपद गेल्याची सल जात नाही, आदित्यना मंत्रीपद आणि इतर नेत्यांना सत्ता गेल्याची सल जात नाही. पक्ष फुटल्यापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाणउतारा करण्याचा कार्यक्रम आजही जारी आहे. शिवसैनिकांची साथ सुटल्यामुळे कामरा सारख्या भाडोत्र्यांच्या जीवावर राजकारण रेटण्याची वेळ ठाकरेंवर आलेली आहे. हनुमानाची फजिती करण्यासाठी त्याच्या शेपटाला आग लावण्याचा परिणाम काय झाला सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून ज्यांना लंकेची काळजी आहे, त्यांनी हनुमानाच्या शेपटाला आग लावू नये. हा धडा काही जणांना त्यांची लंका जळेपर्यंत लक्षात येत नाही.

कुणाला कामरा नावाचा पोपट जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात विठू विठू करू लागला, तेव्हा पासून त्याला संजय राऊतांनी पाळला आहे. पाळलेला पोपट अनेकदा मालकाची नक्कल करू लागतो. तेव्हा तो अनेकदा मालकाची भाषाही शिकतो. मालक शिवराळ असेल तर शिव्या घालायला शिकतो. मालक टोमणे मारत असेल तर टोमणे मारायला शिकतो. कुणाल कामराच्या कवितेचे शब्द त्याच्या राजकीय मालकांचे आहेत. जिथे ही कविता प्रसवली तो स्टुडीयो शिवसैनिकांनी फोडला आहे. अशा फोडाफोडीचा ज्यांचा इतिहास आहे, त्या ठाकरे सैनिकांना आता अभिव्यक्ति स्वातंत्र्य सुचते आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या नावाने ही मंडळी आता कंठशोष करतायत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आद्य गद्दार हे शरद पवार आहेत. २०१९ मध्ये त्यांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांनी जनादेशावर लाथ मारली आणि मतदारांशी गद्दारी केली. ही साठा उत्तरीची कहाणी… एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये ठाकरेंची साथ सोडून सुफळ संपूर्ण केली. खरे गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध केले. उबाठा शिवसेनेला उचलून आपटले. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च असते. जनतेने या निवडणुकीत खरी शिवसेना
कोणाची आहे, हे स्पष्ट केले. शिंदेंना जनतेचा कौल मिळाल्यानंतर तरी उद्धव आणि एकनाथ शिंदे यांना मिंधे म्हणणे बंद केले पाहिजे होते. शिंदेंच्या निम्म्या वयाचे आदित्य यांनी तर ही भाषा वापरायलाच नको होती. मुखपत्रातून नित्यनियमाने शिंदेंचा उद्धार करणे बंद केले पाहीजे होते. विधानसभा निवडणुकीत केवळ २० जागांवर ज्यांचा कारभार आटोपल्यानंतरही त्यांची टीव-टीव बंद झाली नाही.

हे ही वाचा:

इम्युनिटी मजबुतीसाठी तुळशीचा काढा घ्या!

नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!

…म्हणे राणा सांगाने बाबरला भारतात आमंत्रित केले होते! काय आहे सत्य?

युनिफाइड पेन्शन योजना १ एप्रिलपासून

कुणाल कामरासारख्या भाडोत्र्याला स्क्रीप्ट देऊन त्याच्या तोंडून पुन्हा एकदा तेच वदवून घेण्यात आले आहे. ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये…’ या शब्दात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना हिणवण्यात आले. ही ओळ एकही शब्द न बदलता, उद्धव ठाकरे यांनाही फिट्ट बसते. कामरासारखा एखादा भाडोत्री उभा करण्याचा प्रयोग एकनाथ शिंदेही करू शकतात. उद्धव ठाकरे हेच हिंदुत्वाचे, महाराष्ट्राच्या जनतेचे खरे गद्दार आहेत, असे सांगणारी एखादी कविता पेश करू शकतात. अशी ट ला ट जोडलेली कविता सादर करायला फार अक्कल कुठे लागते?

मागे सोनू तुला बीएमसीवर भरवसा नाय काय… हे गाणे खूप गाजले होते. तेव्हा ठाकरेंचा प्रचंड तीळपापड झाला होता. संतापाने ते नुसते थडथड उडत होते. त्या महिला रेडीयो जॉकीला दमदाटी करण्याचे, जोर दाखवण्याचे प्रकार सुरू होते. तेच ठाकरे आता कुणाल कामराला खांद्यावर घेऊन नाचतायत. जणू हा कामरा त्यांचे बंद झालेले राजकीय दुकान सुरू करणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत भरभरून यश मिळवून देणार आहे. कामरा त्यांच्या पक्षाची गळती बंद करणारा मसीहा असता तर त्याच्यावर ऊतू जाणारे प्रेम ठीक होते. कामराची ती औकात नाही. तो सध्या केवळ भुंकणाऱ्या कुत्र्याच्या भूमिकेत आहे. अशी कुत्री पाय चाटून घ्यायला, दुसऱ्यावर भुंकायला ठिक असतात, त्यांच्यामुळे निवडणुकांमध्ये यश मिळत नसते.

पक्ष फुटल्यानंतर जनता आणि संघटनेला पाठीशी उभे करण्यासाठी एखाद्या नेत्याने घाम गाळला असता, महाराष्ट्र पिंजून काढला असता, लोकांना जोडले असते, पक्षाची बांधणी केली असती. परंतु ठाकरे आणि त्यांच्या कंपूने केवळ शिव्या घालण्याचे काम केले. शिव्या घालून आपले अच्छे दिन येतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे कामरासारख्या विदूषकांची त्यांच्याभोवती गर्दी होते आहे. महाराष्ट्राच्या जनतेला याचा किती वीट आला आहे हे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट दिसले आहे. तरीही ठाकरेंना बुद्धी येत नाही. संजय राऊत या एका माणसाने पक्षाला भिकेला लावले. सत्ता गेली, पक्ष गेला, माणसं गेली, पाठीशी असलेली मराठी माणसाची ताकद गेली. आता हिरव्या मतपेढीच्या जीवावर पक्ष चालवण्याची वेळ यांच्यावर आली आहे. चिता कॅम्पमध्ये जाऊन हिंदीमध्ये भाषण ठोकण्याचे दिवस आले आहेत. तरीही मेंदू
गहाण ठेवून राऊत यांच्या पाठीशी चालत राहण्याची वेळ ठाकरेंवर आली आहे.

राऊत यांच्या तालावर नाचण्यापेक्षा शिंदेंच्या तालावर नाचणे काय वाईट होते. त्यांचे किमान शिवसेनेच्या बांधणीत काही योगदान तरी होते. पक्षासाठी त्यांनी वेळ दिला, घाम गाळला, पैसा खर्च केला, पक्षासाठी पंगे घेतले. राऊतांनी फक्त
पोपटपंची केली. दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले. अचानक हा विषय गरम झाला, हा ज्यांना निव्वळ योगायोग वाटतो, ते मूर्खांच्या जगात वावरतायत. जगात योगायोग नावाची चीज अस्तित्वात नाही. राजकारणात नाहीच नाही. जे काही घडतेय त्याच्या मागे असलेला कार्यकारण भाव आपल्याला ठाऊक नसतो, म्हणून आपल्याला तो योगायोग वाटतो. ठाकरेंच्या लखनौ ते लंडनच्या मालमत्तेचा तपशील माझ्याकडे
आहे, वेळ आल्यावर मी तो उघड करेन असे शिंदे कधी काळी म्हणाले होते. ती वेळ लवकर यावी यासाठी ठाकरे कष्ट घेताना दिसतायत.

एकनाथ शिंदे यांनी पक्षात असताना बरेच काही सहन केले. आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेंबड्या नेतृत्वाकडून अपमान सोसला, त्यामुळे ते पक्षाच्या बाहेर पडले. पक्षातील ४० आमदार त्यांनी सोबत नेले एवढ्यावरून तरी
एकनाथ शिंदे यांची क्षमता ठाकरेंनी लक्षात घेतली पाहिजे होती. शिंदेंचा चेहरा पाहिल्यावर त्यांच्या पोटात प्रचंड मुरडा उठतो, असे आपण गृहीत धरले तरी त्यांना शिव्या घालून तो बरा होण्याची शक्यता नाही. शिंदेंच्या राजकारणाची
चमक जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत ठाकरेंना हा त्रास होणार आहे. जोपर्यंत ठाकरेंची भिस्त कामरा सारख्या मनोरुग्णांवर आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचे राजकारण त्यांच्या पेक्षा सरस राहणारच. कारण त्यांचा भरोसा आजही शिवसैनिकांवर आणि हिंदुत्वावर आहे. शिंदेंवर वचपा काढण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे, परंतु आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची सवय असलेल्या ठाकरेंना मेहनत करण्याची सवय नाही. केवळ वाफांचे बाण सोडत राहणार आणि अधिकाधिक खड्ड्यात जात राहणार.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version