शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांनी उबाठा गटावर घणाघात करताना पक्षाचे बहुतेक उमेदवार उपरे असल्याचा आरोप केला आहे. पावसकर यांचे आरोप पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय करणारे आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा सगळा पक्ष धुवून पुसून नेल्यानंतर ठाकरेंकडे पर्यायच उरलेला नाही. ठाकरेंच्या पक्षाची अवस्था मूठ आणि पातं बदललेल्या खानदानी वस्तऱ्यासारखी झाली आहे. या नव्या वस्तऱ्याला धार नसल्यामुळे तो ठाकरेंसाठी फारसा उपयोगी नाही. ठाकरेंच्या समोर उभे ठाकलेल्या नेत्यांकडे मात्र धारधार तलवारीही आहेत आणि ठाकरेंना शांत करणारी विशेष जडीबुटी सुद्धा.
मातोश्रीशी घटट् संबंध असलेल्या नेत्यांमध्ये पावसकर यांचीही गणना होते. कारण पावसकरांनी कधी काळी शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश मोरे यांच्यासोबत भारतीय कामगार सेनेचे काम पाहिलेले आहे. भाजपा नेते नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मातोश्रीवर जाताना आम्ही कधी रिकाम्या हाताने गेलो नाही. प्रत्येक वेळी प्रसाद घेऊन गेलो आहे.
मातोश्रीवर नियमितपणे प्रसाद नेणाऱ्यांमध्ये पावसकर यांचाही समावेश होता. कारण उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कंपन्यांच्या सुपाऱ्या वाजवण्याचे काम भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून व्हायचे. त्यातल्या फक्त सहारा स्टार हॉटेलचे प्रकरण नारायण राणे यांनी उघड केले आहे.
इथे मराठी कामगारांची सुपारी कशी वाजवण्यात आली ते तपशीलवार सांगितले आहे. अशी बरीच प्रकरणं आहेत. कंबाटा एअरवेजच्या कामगारांचा कसा बळी घेण्यात आला, यावर लवकरच आम्ही बोलणार आहोत.
लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलेले अनेक उमेदवार दुसऱ्या पक्षातून आल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे. कल्याणमधून लढणाऱ्या वैशाली दरेकर या मनसेमधून आल्या, जळगावमधून उमेदवारी दिलेले करण पवार, सांगलीचे चंद्रहार पाटील, मावळचे उमेदवार संजोग पाटील, शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे, इशान्य मुंबईतून उमेदवारी मिळालेले संजय दिना पाटील हे सगळे उमेदवार ऐन निवडणुकीच्या आधी पक्षात दाखल झालेले आहेत.
ठाकरेंच्या पक्षात उमेदवारी देण्याचा निकष काय याचे गुपितही नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही प्रमाणात उलगडले आहे. ठाकरेंच्या पक्षात तिकीटाची बोली लागते. पैसे दिल्यानंतरच तिकीट मिळते असा आरोप नारायण राणे यांनी केला. ज्यांनी पैसे देऊन तिकीट मिळवले अशा सगळ्या नेत्यांच्या तोंडून आपण ही बाब वदवून घेऊ असा दावाही केला.
उबाठा गटात पैसे घेऊन तिकीट दिले जाते हा आरोप नवा नाही. निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आमची निम्मी ताकद खर्ची झालेली असते, असे खाजगीत सांगणारे अनेक नेते आहेत.
अलिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओरीजिनल शिवसेनेचे नेते चिमुटभूर माहीती उघड करतात आणि बाकीची माहीती योग्य वेळी जाहीर करू असे सांगून विषय संपवतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा याला अपवाद नाहीत. अनेकांच्या बाबतीत ती योग्य वेळ येतच नाही. कारण बातम्या आणि गॉसिप फक्त आपल्याच कडे आहे, असा या मंडळींचा गैरसमज असतो. पडून राहिलेली बातमी, उघडलेल्या सोडा वॉटरच्या बाटली सारखी किंवा दिवाळीत शिल्लक ठेवलेल्या आदल्या वर्षीच्या फटाक्यांसारखी असते. वेळ आल्यावर असे फटाके फुस्स… होतात.
हे ही वाचा:
भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!
अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा
शिवसेना सोडल्यानंतर मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की, उद्धवचे नुकसान होईल असे मी काही बोलणार नाही, करणार नाही. नारायण राणे यांनी त्यांच्या ताज्या पत्रकार परिषदेत उघड केलेली ही माहिती. यापूर्वी अनेकदा ते याबाबत बोलले आहेत.
नारायण राणे असत्य बोलत असण्याची शक्यता कमी, कारण राणेंनी केलेल्या कोणत्याही आरोपाला उद्धव ठाकरे यांनी आजवर उत्तर दिलेले नाही. राणेंनी मालवणात मेडिकल कॉलेज सुरू केले, त्याला मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. त्यासाठी नारायण राणे यांनी एक फोन करावा अशी त्यांची अपेक्षा होती. नारायण राणे यांनी फोन केला. उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. याचा अर्थ स्पष्ट आहे. नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंना गप्प करणारी काही तरी संमोहन बुटी आहे.
अशी अनेक गुपितं पावसकरांनाही माहिती आहेत. कारण त्यांनी भारतीय कामगार सेनेचे काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी असा शब्द पावसकर यांच्याकडून घेतला होता का, याचा उलगडा पावसकरच करू शकतील.
ठाकरे यांचे फक्त उमेदवार उपरे नाहीत, त्यांचे मतदार सुद्धा नवखे आहेत. ठाकरेंनी अजान स्पर्धावाला हिंदुत्ववाद स्वीकारल्यापासून हा चमत्कार झालेला आहे. नवा विचार, नवा मतदार, उपरा उमेदवार, नवा पक्ष, नवे चिन्ह अशी ठाकरेंची नवझळाळी आहे. समस्या ही आहे की ही नव झळाळी ठाकरेंना सारे काही नवे नवे, सारे काही हवे हवे… अशी उभारी देऊ शकत नाही. कारण राणे, पावसकर, शिंदे, फडणवीस यांच्यासारख्या अनेकांकडे असलेली जडीबुटी. महाराष्ट्राची जनता ते किस्से ऐकण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहातायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)