‘खोके’ सिझन-२ सुरू…

‘खोके’ सिझन-२ सुरू…

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray | PTI

खोक्यांच्या आरोपांचा आता सिझन-२ सुरू झालेला आहे. सुरूवात उबाठा शिवसेनेकडून झाली. अलीकडे ते शांत झाले होते. आता ही बोंब दुसऱ्या बाजूने ठोकली जाते आहे. ओम राजे निंबाळकर यांच्या खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी मी १० कोटी रुपये चेकने दिले असा दावा विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ठाकरेंच्या खोक्यांचा हिशोब आता बाहेर येऊ लागलेला आहे. पक्ष चालवायचा म्हणजे पैसा लागतो. निवडणुकीच्या काळात तर पैशाचे गटार वाहत असते. एकेका सभेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. हा पैसा अनेक मार्गाने येतो. तो लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा केला जातो. उद्योगपती, व्यावसायिक पक्षाला निवडणूक निधी म्हणून रक्कम देतात. छोटे मोठे पक्ष या भक्कम निधी देणाऱ्या उद्योगपतीला राज्यसभेवर पाठवतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या काळात वेणूगोपाळ धूत, प्रीतीश नंदी अशा अनेकांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. देशभरात अशी उदाहरणे आहेत. विजय मल्ल्या यांच्यासारखे लोक त्यामुळेच राज्यसभेवर जाऊ शकले. परंतु, हे सगळे सरधोपट मार्ग. मागील दाराने हा पैसा खंडणी आणि टक्केवारीच्या मार्गानेही येतो.

तानाजी सावंत यांनी केलेला आरोप वेगळा आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात तिकीटासाठीही पैसे मोजावे लागतात. ओम राजे निंबाळकर यांच्या तिकीटासाठी १० कोटी रुपये मोजल्याचा आरोप तानाजी सावंत यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी मूर्ख मंत्री म्हणून केला.

उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. ज्यांना सर्व दिले तेच पक्ष सोडून गेले. ते हे मात्र सांगत नाहीत की अमुक पद देण्यासाठी तुम्ही किती घेतलेत. तेही आता बाहेर येऊ लागले आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरेंना एक कोटी दिल्याचा दावा केला. तानाजी सावंत यांनी १० कोटीचा दावा केला.

शिवसेनेत तीन दशके काम केलेल्या एका नेत्याने तर शिवसेनेचे रेट कार्डच सांगितले आहे. उद्धव ठाकरेंचे जुन्या पब्लिक फोन सारखे आहे. नाणे टाकल्याशिवाय त्यांना आवाजच ऐकू येत नाही. इथे फक्त खासदारकीसाठी नाही तर प्रत्येक पदासाठी पैसे मोजावे लागतात. शाखाप्रमुख पद, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवक, विविध समित्यांचे अध्यक्ष पद, आमदार, खासदार, मंत्री पद. प्रत्येक पदासाठी इथे पैसे मोजावे लागतात. पोस्टिंगच्या एरिआ जितका मलईदार तितके पैसे जास्त. पैसे न देणाऱ्यांना कुजवले जाते. पद महापालिकेत समित्यांचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतरही नियमितपणे नैवैद्य दाखवावा लागतो. जे लोक नैवैद्य दाखवत नाही, त्यांना खुंटीला टांगून ठेवले जाते. हे मातोश्रीतूनच सुरू असल्यामुळे असे व्यवहार सर्वस्तरांत झिरपले आहेत. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी महापौर निधी देताना माजी महापौर किशोरी पेडणेकर १० टक्के कट घेत असत असा आरोप केलेला आहे. महापौर निधी मिळण्यापूर्वी हा कट द्यावा लागत असे. उद्धव ठाकरेंची शिवसेना किती धंदेवाईक झाली आहे, त्याचे असे किती तरी दाखले देता येतील.

तानाजी सावंत यांच्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकत नाहीत. कारण व्यवहार चेकने झालेला आहे. तिच बाब केसरकर यांनाही लागू आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि लोक प्रतिनिधींकडून पैसे घेतले जातात ही बाब उघड झाली आहे. मग जे लोक खोके घेऊन पदावर आले त्यांनी जाण्यासाठी खोके घेतलेही असतील तर त्यात गैर काय? फरक एवढाच आहे, की उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले याचे आरोप समोरचे लोक पुराव्यानिशी करतायत, उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र बोटभर पुरावाही नाही.

खोक्यांचे आरोप करताना उद्धव ठाकरे एक बाब विसरले की त्यांचे तीन स्थायी समिती अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. आता रवींद्र वायकर यांची त्यात भर पडल्यामुळे ही संख्या चार झालेली आहे. आता फक्त दोन-तीन नेते बोललेले आहेत. जेव्हा हे स्थायी समितीचे अध्यक्ष तोंड उघडतील तेव्हा ठाकरेंना पळता भूई थोडी होईल. एकनाथ शिंदे ज्या दिवशी बोलतील, त्या दिवसानंतर ठाकरेंना तोंड उघडण्याचीही सोय राहणार नाही.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आल्यानंतर वायकर यांनी नवा ट्रेंड सेट केला होता. तुम्हाला हवे तसे व्हावे, हवे त्या प्रमाणात व्हावे असे वाटत असेल तर मला सर्वाधिकार द्या. पूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष सभागृह नेत्याचे आदेश मानत होता. वायकर आल्यानंतर सभागृह नेते वायकर यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांचे आदेश घेऊ लागले. स्थायी समितीचे आजवर जे अध्यक्ष झाले त्यापैकी वायकर हे सगळ्यात हुशार अध्यक्ष होते. ते फक्त अध्यक्ष पदापर्यंत थांबले नाहीत, त्यांनी ठाकरेंशी थेट भागीदारीच केली. मविआची सत्ता आल्यानंतर सुनील प्रभू मंत्री का झाले नाहीत. ते तर स्थायी समितीचे अध्यक्ष होते, महापौर होते. तरीही त्यांना मंत्री पद मिळाले नाही, त्याचे कारण कळणे फार कठीण नाही.

हे ही वाचा..

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”

निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश

ऑस्कर अवॉर्ड २०२४: ओपेनहाइमर ठरला सर्वोत्कृष्ठ चित्रपट!

उद्धव ठाकरेंची संघटना पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली त्याचे कारण हेच आहे. सगळी संघटना धंदेवाईक झाली. ईडीच्या प्रयोगामुळे लोक सोडून गेले हा ठाकरेंचा दावा प्रमाण मानला तर मग प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची संघटना कशी शाबूत राहिली तिथेही ईडीच्या कारवाया झाल्या. मनिष सिसोदीया, संजय सिंह, आदी नेते तुरुंगात गेले. आता तर केजरीवाल तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तरीही लोक त्यांना सोडून गेलेले नाहीत. ठाकरेंच्या बाबतीत हे घडले कारण तिथे निष्ठा नव्हती फक्त धंदेवाईक पणा उरलेला. जिथे व्यवहार असतात तिथल्या निष्ठा पोकळ असतात.

खोके सिझन-२ प्रचंड गाजणार आहे. आता कुठे याची सुरूवात झालेली आहे. निवडणुकांचा माहोल जसा जसा गरम होईल तस सते फटाके फुटायला सुरूवात होणार आहे. खोक्यांची चर्चा आता मातोश्रीला जड जाईल, कारण उद्धव ठाकरे विसरले. कांच के घर मे रहनेवाले दुसरो पर पत्थर नही फेकते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version