निलाजरा खेडेकर, अस्वस्थ साहेब…

अस्वस्थ तरुणाई, आश्वस्त साहेब या कार्यक्रमात कार्यक्रमात खेडेकर यांनी ही अक्कल पाजळली

निलाजरा खेडेकर, अस्वस्थ साहेब…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदुस्तानचे महादेव छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी करण्याचा निलाजरेपणा, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेला आहे. पवार हे आज छत्रपती शिवाजी आणि आम्ही त्यांचे मावळे असे खेडेकर यांचे विधान आहे. खेडेकरांच्या या चाटुकारीतेचा धिक्कार करावा तितका कमी आहे. या निलाजरेपणाला शरद पवारांनीही मूकसंमती आहे असे दिसते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरामध्ये आयोजित केलेल्या अस्वस्थ तरुणाई, आश्वस्त साहेब या कार्यक्रमात कार्यक्रमात खेडेकर यांनी ही अक्कल पाजळली आहे.

पवार आश्वस्त असल्याचा साक्षात्कार पवारांना कधी झाला? पक्ष फुटल्यानंतर पक्षातील सगळे आमदार, पदाधिकारी बाहेर पडल्यानंतर पवार जर आश्वस्त असतील तर ही अवस्था त्यांना चिरकाल प्राप्त होवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
पक्षाचे बारा वाजल्यापासून पवारांचे समर्थक बिथरलेले आणि गोंधळलेले दिसतात. म्हणूनच पवार हे अझीम ओ शान शहंशाह असल्याचा त्यांना विसर पडला. खेडेकरांना हे कोणी तरी सांगायला हवे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात शरद पवारांच्या एण्ट्रीच्या वेळी अझीम ओ शान शहंशहा हे गाणे वाजवण्यात आले होते. पवारांचा कल असाही छत्रपतींपेक्षा औरंगजेबाच्या खानदानाकडे जास्त आहे. नाही तर पक्षाच्या अधिवेशनात वेडात मराठे वीर दौडले सात… किंवा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत वाजवलं असतं. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत पवारांना झेपणारे नाही.

 

नरसिंहरुप धारण करून अफजल खानाला फाडणाऱ्या शिवाजी महाराजांची आठवण सुद्धा पवारांना नको वाटत असणार. कारण इतिहासापेक्षा व्होटबँक महत्वाची. २०१९ मध्ये आडवाटेने सत्ता मिळवल्यानंतर अलिबागमध्ये झालेल्या मेळाव्यात मुस्लिमांच्या मतामुळे सत्तेवर आलो, असे म्हणणाऱ्या शरद पवारांनी कायम मुस्लीम मतांवर डोळा ठेवून राजकारण केलेले आहे. याच व्होटबँकसाठी पिवळा इतिहास लिहिण्याचा पराक्रम त्यांच्या ब्रिगेडच्या नावावर आहे.

खेडेकरांसारख्या चाटुकारांना अझीम ओ शान शहंशहा बाजूला ठेवून पवारांना छत्रपती म्हणण्याची दुर्बुद्धी सुचते त्याचे कारण सध्याच्या बदललेल्या वातावरणात आहे. सातत्याने शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असा धोषा करणारे शरद पवार त्यांच्या पक्षाला मिळालेली तुतारी वाजवायला कोल्हापूरात छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीवर गेले नाहीत. ते रायगडावर गेले. पक्षाच्या चिन्हाचे मार्केटींग करण्यासाठी तीस वर्षांनी पवारांना रायगड आठवला. तिथेही त्यांनी छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतले नाही, असा आक्षेप काही लोकांनी घेतला. तो बहुसंख्य लोकांना पटलाही.

इच्छा असो नसो हिंदुत्वाची प्रतिके आणि श्रद्धास्थाने मस्तकी धरल्याशिवाय लोक तुम्हाला उभे करणार नाहीत. काँग्रेस हा मुस्लीमांचा पक्ष आहे, असे जाहीरपणे सांगणारे राहुल गांधी निवडणुकीच्या काळात का होईना भस्म लावून मंदिरात जातात. त्यामुळे शरद पवार ३० वर्षांनी रायगडावर गेले तर त्यात फारसे कुणाला नवल वाटण्याचे कारण नाही. पवारांचा उल्लेख एकेकाळी इंग्रजी वर्तमानपत्र कायम मराठा स्ट्राँग मॅन अशी करत आली आहेत. पवारांनीही यावर कधी आक्षेप घेतला नाही. जातीवरून ओळखला जाणारा दुसरा नेता देशात नाही. जाती पातीचे राजकारण करणाऱ्या उत्तरेतील मुलायम आणि लालू या यादव नेत्यांच्या नावा मागेही जातीचे बिरुद लावले जात नाही.

महाराष्ट्रीय लढवय्यांनी स्थापन केलेले साम्राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला मराठा साम्राज्य म्हणून संबोधण्यात आले. तिथे ज्या अर्थाने मराठा या शब्दाचा वापर झाला आहे, तो अर्थ जर इंग्रजी माध्यमांना अपेक्षित असेल तर त्या मराठा या शब्दात ब्राह्मणांसह महाराष्ट्रातील १८ पगड जाती अपेक्षित आहेत. पवारांच्या समर्थकांना मात्र हा अर्थ अपेक्षित नसावा, नाही तर त्यांच्या प्रेरणेने खेडेकरांसारख्या लोकांनी चालवलेल्या संभाजी ब्रिगेडने ब्राह्मणांना लक्ष्य कशाला केले असते?

पवारांच्या समर्थकांनी वाजवा तुतारी, हटवा वंजारी… अशा हलकट घोषणा दिल्या नसत्या. हिंदवी स्वराज्य बुडवायला आलेल्या अफजलखानाची आणि औरंगजेबाची वकीली जितेंद्र आव्हाडांसारख्या पवार समर्थक नेत्यांनी केली नसती.
खेडेकरांना पवारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसावे, असे कोणते कर्तृत्व पवारांनी गाजवलेले आहे. शिवरायांचा कोणता विचार जगण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे. महाराष्ट्रातील अठरापगड जातींची मोट बांधून हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि छत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरण करून महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये विष कालवणारे शरद पवार कुठे?

हे ही वाचा:

हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!

निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू

‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!

४१ दिवस शांततेचे…

पवारांना गोब्राह्मण प्रतिपालक असलेले महाराज मान्य नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपतींना कुळवाडी भूषण म्हटलेले आहे. कुळवाडी म्हणजे कुणबी, म्हणजे शेतकरी हा अर्थ पवारांना मान्य आहे, असे गृहीत धरले तरी त्यांच्या कुटुंबियांवर लवासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे.

शरद पवारांनी खेडेकरांच्या विधानासाठी समस्त हिंदू समाजाची माफी मागायला हवी. ही तुलना कोणताही हिंदू सहन करू शकत नाही. पवारांनी रायगडावर जावे आणि तिथली धूळ मस्तकाला लावून झुकवून मुजरा करावा. छत्रपतींचा मावळा व्हायलाही त्याग, तपस्या आणि योग्यता लागते. छत्रपती होणे ही तर खूप दूरची गोष्ट. सूर्य जेवढा पृथ्वीपासून दूर तेवढी दूरची. कोलांट्यांचे राजकारण करणाऱ्यांनी या फंदात पडू नये.

छत्रपती शिवाजी महाराज दुर्दैवाने अल्पायुषी होते. दीर्घायुषी औरंगजेब होता. महाराजांचे निधन झाले तेव्हा ते छत्रपती बनले होते. त्यांनी छोट्याशा का होईना हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. उरी बाळगलेली स्वप्न धुळीस मिळालेली पाहून औरंगजेब पैगंबरवासी झाला होता. अखेरच्या काळात मराठ्यांच्या समशेरीच्या थपडा खात आचके देणारी मुघल सल्तनत पाहाणे त्याच्या नशिबी आले होते. खेडेकरांनी हे लक्षात घ्यायला हवे. चुकीचा ब्रिगेडी इतिहास सांगता सांगता त्यांना खऱ्या ज्वलंत इतिहासाचे विस्मरण झालेले दिसते.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version