भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…

‘ठाकरेंचा काही विचार असेल तर भाजपाचे दरवाजे खुले आहेत. परंतु चूक त्यांनी केली आहे. त्यामुळे पुढाकार त्यांनाच घ्यावा लागेल’.

भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपाने शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिट्टी मारल्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली होती. परंतु नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले आणि फुग्याला टाचणी लावली. तरीही मौर्य यांच्या विधानाबाबत एक प्रश्न उरतोच की, महाराष्ट्राच्या राजकारणावर उत्तर प्रदेशच्या दुय्यम नेत्याने केलेले विधान हा निव्वळ योगायोग आहे की जुळवून आणलेला योगायोग? केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाने देशभरात ‘मोदी@9’ ही जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. याच मोहीमेअंतर्गत मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना मौर्य यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात एक महत्वाचे विधान केले होते. ‘ठाकरेंचा काही विचार असेल तर भाजपाचे दरवाजे खुले आहेत. परंतु चूक त्यांनी केली आहे. त्यामुळे पुढाकार त्यांनाच घ्यावा लागेल’.

‘चूक मान्य करा, माफी मिळेल…’ असा मौर्यंच्या विधानाचा अर्थ आहे. मीडियाने याचा अर्थ ठाकरेंना भाजपाचे दरवाजे खुले… असा काढला. मौर्य यांचे वक्तव्य आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे टायमिंग असे काही जुळले की त्यातून सोयीस्कर अर्थ काढण्यात आले. राज्यातील काही प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो, राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या टॅगलाईनसह जाहिरात झळकली होती. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. महाराष्ट्रात फक्त शिंदे ही भूमिका भाजपाला पचणे शक्यच नव्हते. भाजपा नेत्यांनी या जाहिराती संदर्भात नापसंती व्यक्त केली होती.

राज्यातील शिवसेना-भाजपा सरकारमध्ये काही तरी पेटले आहे, शिंदे-फडणवीस यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे, असे चित्र निर्माण झाले होते. त्याच वेळी मौर्य यांचे हे वक्तव्य आले. ‘वक्तव्य जरी मौर्य यांनी केले तरी त्यांचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे’, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला इशारा आहे’, असा अर्थ काही राजकीय पंडितांनी या वक्तव्यातून काढला.

शिवसेना-भाजपा युतीत सर्व काही आलबेल नाही, अशी अलिकडे चर्चा सुरू झाली आहे. तसे असेलही. कोणत्याच आघाडीत किंवा युतीत कधीच सर्व काही आलबेल नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते प्रमोद महाजन हयात असताना सुद्धा शिवसेना-भाजपा युतीत अनेक कुरबुरी होत्या. एकमेकांवर जोरदार टीका होत असे. अध्येमध्ये स्फोट सुद्धा घडत असत. परंतु तरीही ही युती २५ वर्षे टीकली. आघाडी आणि युती कशाला एका पक्षात सुद्धा अंतर्गत कुरबुरी असतात, कारण कुरघोडी असते. कुरघोडी शिवाय राजकारण असूच शकत नाही. मौर्य यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांनी फार पतंग उडवू नयेत याची काळजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसते. कर्नाटक सरकारच्या काही निर्णयावरून ठाकरेंना कात्रीत पकडणारे सवाल फडणवीस यांनी केलेले आहेत. सत्तेवर आल्या आल्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने भाजपा सरकारने केलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला, पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा.स्व.संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. एकगठ्ठा अल्पसंख्यांक मतांवर जिंकून आल्यानंतर कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांनी मुस्लीम मतांची किंमत चुकवली.

कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रातही ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवणार, अशी घोषणा मविआच्या नेत्यांनी केली होती. शिउबाठाला विशेष हर्ष झाला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुस्लीम धार्जिण्या निर्णयानंतर महाराष्ट्रात हाच ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवणार काय? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. सावरकरांचा धडा पाठयपुस्तकातून वगळण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी असेही ते म्हणाले आहेत.

केशवप्रसाद मौर्य यांच्या विधानामुळे मीडियाने जो फुगा फुगवला आहे, त्याला फडणवीसांनी पद्धतशीर टाचणी लावली आहे. कारण मौर्य यांच्या विधानातून महाराष्ट्राची जनता काही वेगळा अर्थ काढणार नसली एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले काही नेते मात्र अस्वस्थ होतील, याचा अंदाज फडणवीसांना असणार. ठाकरेंना सवाल करून फडणवीसांनी या नेत्यांना शांत केले. पालघरमध्ये काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र होते. ‘युती भक्कम आहे’, अशी ग्वाही या दोन्ही नेत्यांनी काल दिली. ‘धरम-वीरची जोडी अतूट’ असल्याचे सांगितले. जाहीरातीवरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू असलेला वाद संपल्याचे संकेत दिले. किंबहूना हा वाद अस्तित्वाच नव्हता असे दाखवले.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल

३० वर्षांनी मुंबईत सापडला लोणावळ्यातील दाम्पत्याचा खुनी

आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

आता प्रश्न एवढाच उरतो की, उत्तर प्रदेशचा एक नेता महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर इतके मोठे विधान करतो, हा फक्त योगायोग आहे की हे ठरवून घडवले आहे? हे विधान थेट त्यांच्या मनातून आले की या विधानाचा बोलविता धनी दुसरा कोणी आहे? हे विधान मौर्य यांचे असावे, असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. एका राज्याच्या नेता दुसऱ्या राज्यातील राजकारणाबाबत इतके बिनधास्त राजकीय वक्तव्य करू शकत नाही. केले असेल तर ते आश्चर्य ठरावे.

राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो. उद्धव ठाकरे यांनी ते २०१९ मध्ये नव्याने सिद्ध केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ करून त्यांनी राज्यात सत्तेचा प्रयोग किमान अडीच वर्षे तरी यशस्वीपणे करून दाखवला. त्यासाठी त्यांनी अगदी सहजपणे हिंदुत्व खुंटीला टांगले. त्यामुळे उद्या गरज पडली, तर पुन्हा ते भाजपासोबत जाणारच नाहीत, असे ठामपणे कोण सांगू शकेल?

ठाकरेंकडून असा विचार झालाच तर ते कसे घडू शकते हे मौर्य यांनी स्पष्ट केलेले आहे. उद्धव ठाकरे यांना चूक मान्य करावी लागेल. भाजपाच्या नेतृत्वाशी चर्चा करून ती चूक सुधारावी लागेल, त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना पुन्हा भगवा हाती घ्यावा लागेल. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने दिलेला संकेत असेल वा नसेल महाराष्ट्राचे राजकारण आता अगदी निसरड्या वळणावर चालले असून ते कधीही कुठेही वळू शकते याचे या घडामोडीतून पुन्हा एकदा संकेत मिळाले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version