श्री ४२० तिहारमध्ये रामलीला मैदानावरील कीर्तन अगदीच वाया…

नियतीने केजरीवाल यांची कशी कुचेष्टा केली आहे

श्री ४२० तिहारमध्ये रामलीला मैदानावरील कीर्तन अगदीच वाया…

दिल्लीतील राम लीला मैदानात देशातील २८ पक्ष एकत्र आले होते. सगळ्यांनी एक सुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ठणाणा केला. तुरुंगात असलेले दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जोरदार समर्थन केले. सौ.केजरीवाल यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे ठणकावून सांगितले. राऊज एव्हेन्यू न्यायालयात रामलीला मैदानात करण्यात आलेल्या या मोदीविरोधी वातावरणनिर्मितीवर पाणी ओतले गेले. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केजरीवालना न्यायालयीन कोठडी दिली असून त्यांची रवानगी १५ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात करण्यात आलेली आहे.

ईडीने २१ मार्च रोजी राहत्या घरातून केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. काही दिवस ते ईडीच्या कोठडीत होते.
केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध देशातील २८ पक्षांचे नेते दिल्लीत एकत्र झाले होते. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिरंजीवांसह घोटाळेबाजांच्या या स्नेह मेळाव्यात सहभाग घेतला. ‘अब की बार, भाजपा तडीपार…’ अशी घोषणाही दिली. कधी काळी ज्या राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे नालायक म्हणायचे, रामलीला मैदानावर त्याच्या आरत्या ओवाळून आणि भाजपाच्या विरोधात घणाघात करूनही फारसा उपयोग झाला नाही. राहुल गांधी ठाकरेंच्या चाटुकारितेमुळे प्रसन्न झाले नसावेत. ते जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या तमाम नेत्यांचे नाव घेतले, मात्र ठाकरेंना ते विसरले.

कदाचित ठाकरे राहुल गांधी नालायक म्हणतायत हा व्हायरल झालेला रील त्यांच्यापर्यंत आला असावा. त्यामुळेही राहुलबाबाने त्यांना अनुल्लेखाने टाळलेही असावे. घरगडी कितीही इमाने इतबारे सेवा करीत असला तरी त्याचे कोणाला कौतुक नसते. ठाकरे राहुल गांधींसाठी अदखल पात्र ठरले. केजरीवाल आज न्यायालयात आले तेव्हा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर म्हणाले की, ‘प्रधानमंत्री जो कर रहे है, वो देश के लिये अच्छा नही.’ मुळात ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाने होते आहे, तरी चिखलफेक मात्र मोदींवर सुरू आहे.

रामलीला मैदानाच्या मंचावर सुनीता केजरीवाल काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या शेजारीच बसल्या होत्या. सध्या त्याच मॅडम मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाला आदेश देतायत. ठाकरेंच्या कार्यकाळात तुरुंगात असलेल्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवण्यात आले होते. मै इस्तीफा जुते की नोक पे रखता हूं, अशी डायलॉगबाजी करणारे केजरीवाल तुरुंगातून कारभार हाकण्याचा प्रयत्न करतायत. नियतीने केजरीवाल यांची कशी कुचेष्टा केली आहे पाहा, कधी काळी ज्या रामलीला मैदानात शपथ घेताना केजरीवाल यांनी सोनिया गांधीसह ज्या ज्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याची घोषणा केली होती. ते सगळे जामीनावर बाहेर आहेत. केजरीवाल भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड गेले आहेत. तुरुंगात गेलेल्या केजरीवाल यांना पाठींबा देण्यासाठी रामलीला मैदानात जामीनावर असलेले भ्रष्ट नेते एकत्र येतात. सौ. केजरीवाल या नेत्यांच्या सोबत मंचावर बसतात, हे चित्र पाहण्याचा योग देशाच्या जनतेच्या नशीबी आला.

आपल्यावर आलेले बालंट एखाद्या सहकाऱ्याच्या गळ्यात टाकून मोकळे होण्यासाठी केजरीवाल प्रचंड धडपड करतायत. त्यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान आप सरकारच्या मंत्री आतिषी आणि सौरभ भारद्वाज यांचा गेम वाजवण्याचा प्रयत्न केला.
दारु घोटाळा प्रकरणी दलालाची भूमिका बजावणारा विजय नायर आपल्याला भेटत नसे. तो आतिषी आणि सौरभ भारद्वाज यांच्याशी चर्चा करत असे, असे केजरीवाल यांनी ईडीला सांगितले. ईडीच्या वकीलांनी हे विशेष न्यायालयात सांगितले. तेव्हा आतिषी आणि सौरभ भारद्वाज न्यायालयातच होते. विजय नायरला सीबीआयने अटक केली होती.

अटकेत असलेले मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यापर्यंत केजरीवाल यांचा दावा जाणारच. ईडीच्या वकीलांनी जे त्याचा अर्थही त्यांना समजला असणार. केजरीवाल यांना आपल्या सुटकेसाठी सहकाऱ्यांचा बळी हवा आहे, हे तुरुंगात असलेल्या जैन, सिसोदीया यांना समजत नसेल, असे मानण्याचे काही कारण नाही. हे मंत्री आतापर्यंत केजरीवाल यांच्या विरोधात ओकलेही असतील. मनिष सिसोदीया यांनी दारु घोटाळा प्रकरणशी संबंधित लोकांशी केलेल्या संभाषणानंतर आपले किती फोन, का फोडले याचा तपशीलही दिला असेल. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांच्या फोनचा पासकोड ईडीला न देऊन फार फार तर त्यांचे आजचे मरण उद्या वर जाईल.

हा विजय नायर मद्य लॉबीसाठी मध्यस्थाचे काम करत होता. ‘आप’ने त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगून हात झटकले असले तरी हा दावा उघडा पडला आहे. आप चे मंत्री कैलाश गहलोत यांच्या सरकारी बंगल्यावर या नायरचा मुक्काम असल्याचे उघड झाले आहे. केजरीवाल ईडीच्या तपासाला सहकार्य करीत नाहीत, असे ईडीच्या वकीलांना न्यायालयात सांगितले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ते मला माहीत नाही, एवढेच देतात. माहिती द्यायला टाळाटाळ करतात, असे ईडीच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले आहे. केजरीवाल हे दारु घोटाळा प्रकरणाचे रिंग मास्टर आहेत, असा दावा ईडीने केला आहे.

केजरीवाल यांच्यासाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे तिहार तुरुंगात ते एकटे नसतील. तिथे सत्येंद्र जैन, मनिष सिसोदिया, संजय सिंह हे आप नेते आधीपासून मुक्कामाला आहेत. केजरीवाल यांना माहीत होते की एकदा आपण ईडीच्या हाती आलो तर लवकर सुटका नाही. त्यामुळेच ते अटकेपासून पळत होते. त्यांचा अंदाज खरा ठरतो आहे.
सर्व प्रकरण सुर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे, तरी देशातील २८ पक्षांचे नेते ओरडून ओरडून सांगतायत, की केजरीवाल हे निर्दोष आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांना ईडीने अटक केली आहे. परंतु न्यायालय हा कांगावा ऐकायला तयार नाही.

हे ही वाचा:

तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती

मुंबई गुटखामुक्त करा, काँग्रेस नेते राजेश शर्मांची मागणी!

अडवाणींना भारतरत्न प्रदान करताना पंतप्रधान मोदी यांनी केले प्रोटोकॉलचे पालन

जलपैगुडीतील वादळात पाच ठार, ५०० जखमी!

दोन दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी न्यायाधीश कावेरी बाजवा यांच्यासमोर स्वत: युक्तिवाद केला. ‘तुम्हाला जे काही म्हणायचे आहे, ते लिखित द्या’, असे सांगूनही केजरीवाल बोलत राहिले. माध्यमांमध्ये हेडलाईन्स बनवण्यासाठी सर्व उपद्व्याप सुरू होता. ‘ईडीच्या दबावापोटी काही जणांनी आपले नाव घेतले आहे. आपल्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे ईडीकडे नाहीत’, असे केजरीवाल सांगतायत. तरीही त्यांना न्यायालयाकडून दाद मिळत नाही, कारण गोवा निवडणुकीत झालेल्या पैशाच्या वाटपापासून दारु घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांच्या कबुली जबाबापर्यंत भक्कम पुरावे ईडीकडे आहेत.
रामलीला मैदानात जी गँग एकत्र आली होती, त्या प्रत्येक नेत्याच्या विरोधा ईडी किंवा आयकर विभागाची कोणती ना कोणती कारवाई सुरू आहे. काही जण जामिनावर बाहेर आहेत. प्रत्येकावर अटकेची तलवार लटकते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version