दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासावर मारहाण झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. लखनौमध्ये सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना हुडहुडी का भरली होती त्याचे कारण उघड झाले आहे.
१३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून दिल्ली सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात फोन येतो. फोन वरून बोलणारी महिला तिचे नाव स्वाती मालीवाल सांगते. आपल्याला मुख्यमंत्री निवासात मारहाण झाल्याचे सांगते. ती महिला खरोखरच आम आदमी पार्टीची राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मारहाण झाल्यानंतर दोन दिवस गप्प राहिल्यानंतर मालिवाल यांनी काल दिल्ली पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. आज न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांसमोरही त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.
स्वाती मालिवाल यांनी याप्रकरणी केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभवकुमार यांचे नाव घेतले आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापासून हा केजरीवाल यांच्यासोबत आहे. काल जेव्हा केजरीवाल यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली तेव्हाही हा केजरीवाल यांच्यासोबत होता. मारहाणीनंतर या विभवकुमार यांच्याविरोधात कठोर कारवाई करू असे सांगणारे केजरीवाल प्रत्यक्षात त्याला घेऊन फिरत होते.
मालीवाल यांना मारहाण करूनही विभव हा केजरीवालांना चिकटून असणे बरेच काही सांगून जाते.
मुळात केजरीवाल यांनी लखनौला जाऊन अखिलेश यांच्यासोबत पत्रकार परिषद घेण्याचे काहीच कारण नव्हते. ही पत्रकार परिषद जर इंडी आघाडीतील नेत्यांची होती तर त्यात अन्य नेते का नव्हते? दिल्ली पोलिसांपासून विभवला दूर ठेवण्यासाठी केजरीवाल लखनौला आले होते का? या पत्रकार परिषदेत दिसलेले केजरीवाल अत्यंत बावचळलेले होते. मालीवाल यांच्याबाबत जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते अधिक अस्वस्थ झाले. त्यांनी माईक अखिलेश यांच्यासमोर सरकवला. यापेक्षाही महत्वाचे मुद्दे आहेत, असे अखिलेश यांनी सांगितले. राज्यसभेच्या सदस्य असलेल्या एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली असेल तर त्यापेक्षा कोणता महत्वाचा मुद्दा असू शकतो हे मात्र अखिलेश यांनी स्पष्ट केलेले नाही. केजरीवाल यांचा चेहरा मात्र नुकतेच एखाद्याला खांदा देऊन आले असल्यासारखा झाला होता.
मालीवाल यांनी आपल्या अडीच पानी तक्रारीत आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. संवेदनशील ठिकाणी मारहाण झाली असा लिखित जबाब पोलिसांना दिला आहे. त्यांनी एक ट्वीटकरून ही माहिती दिलेली आहे. ही मारहाण का झाली, कोणाच्या आदेशावरून झाली यावर दिल्लीतील भाजपा नेते मनजिंदर सिरसा यांनी प्रकाश टाकला आहे. सुनीता केजरीवाल यांच्या सांगण्यावरून विभवकुमार यांनी ही मारहाण केली असा दावा त्यांनी केलेला आहे. प्रत्यक्षात पोलिस चौकशीतून काय बाहेर येते हे सांगणे महत्वाचे.
हे ही वाचा:
मविआबद्दल राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्याबद्दल का बोलावे?
मुंबईत वोट जिहाद? मविआच्या उमेदवारांना एकगठ्ठा मते देण्याचे फतवे
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश, वाद वाढताच महापालिकेचा यू-टर्न!
ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने आपल्याच पक्षातील एका महिला खासदाराला मारहाण कऱण्यास पतीच्या स्वीय सहाय्यकाचा वापर का करावा? हे गुंतागुतीचे कोडे आहे. केजरीवाल यांची अस्वस्थता बरेच काही सांगून जाते. त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. तुरुंगात राहिलो असतो तर बरे झाले असते, असेही त्यांना वाटत असावे.
दारु घोटाळा प्रकरणात केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर याच सुनीता केजरीवाल पतीचा आवाज बनल्या होत्या. तुरुंगातून केजरीवाल दिल्लीच्या जनतेच्या भल्यासाठी कसे तळमळतायत हे चेहऱ्यावर साळसूदपणाचा आव आणत त्या कॅमेरासमोर येऊन रोज सांगायच्या. त्या बोलायच्या तेव्हा त्यांच्या मागे भगतसिंह आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या मधोमध अरविंद केजरीवाल यांचा फोटो लावण्याचा निलाजरेपणा याच बाईंनी दाखवला होता. त्या केजरीवाल यांची लायकी काय आहे, ते मालीवाल प्रकरणाने दाखवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या तख्तावरून हटवण्याचा आव आणणारे केजरीवाल एका महिलेला झालेल्या मारहाणीप्रकरणी तोंड उचकटण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत, हे देशभरातील जनता पाहते आहे. राजकारण बदलण्यासाठी आलेले केजरीवाल दारु घोटाळा प्रकरणी आत गेलेलेच आहेत, आता महिलेला मारहाण प्रकरणातही ते सहकुटुंब गोत्यात येणार असे चित्र आहे.
मालीवाल यांच्या आरोपा मागे भाजपा असल्याचा आरोप आता आपचे नेते आणि इंडी आघाडीतील तमाम पक्ष करतीलच. मालीवाल यांचे चरीत्र हनन करण्याचा जोरदार प्रयत्न केला जाईल. त्यांनी असा प्रयत्न करून आपली लायकी जरुर दाखवावी, परंतु त्या आधी मालीवाल यांना कोणाच्या आदेशाने मारहाण झाली तेही स्पष्ट करावे.
विभव कुमारला वाचवण्यासाठी केजरीवाल आता प्रचंड आटापिटा करतील, कारण केजरीवालांचे सगळे कारनामे त्याला माहीत आहेत. विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या सरबत्तीसमोर टीकणार नाही. मारहाण करण्यासाठी आदेश कोणी दिले हे नक्की उघड करणार. हे सगळे प्रकरण केजरीवाल यांना शेकणार हे नक्की. दिल्लीतील सात जागांसाठी ६ फेरीत मतदान होणार आहे. त्या निवडणुकीत केजरीवाल यांचा निकाल लागलेला आहे. मोदींकडून जाब मागायला जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल मालीवाल प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती टाळण्यासाठी तोंड लपवून तुरुंगात जातील अशी शक्यता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)