ज्योति बने ज्वाला; ठाकरेंचा वाकरे केला…

यंदाचा दसरा मेळावा गाजवला आझाद मैदानावर शिवसेनेच्या ज्योति वाघमारे यांनी

ज्योति बने ज्वाला; ठाकरेंचा वाकरे केला…

विजयादशमीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे शिवतीर्थावर शिउबाठाचा मेळावा झाला. मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे शिमगा करून घेतला. बहुधा त्यांच्या त्याच त्याच टोमण्यांचा उबग आल्यामुळे शिवसैनिकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवलेली दिसली. ओसरलेल्या गर्दीने ठाकरेंना असलेल्या कथित सहानुभूतीचा फुगा व्यवस्थितपणे फोडला. अधिकृत शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आझाद मैदानात जमलेल्या शिवसैनिकांना व्यासपीठावर ज्योती वाघमारे नावाची लखलखती वीज कडाडली. उद्धवजी गुलामगिरी करायची असेल ठाकरे आडनाव लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही वाकरे आडनाव लावा, या त्यांच्या विधानाची पुढे काही दिवस तरी निश्चित चर्चा होईल.

 

शिवसेना फुटल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताकद लावली जाते, अशी चर्चा जोरात आहे. परंतु शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बोटावर मोजण्या इतके लोक उरले. दसऱ्या दिवशी शरद पवारांनी पुण्यात मेळावा घेतला. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादीची जी कुमक ठाकरेंना मिळते तिचा यंदा शिवतीर्थावर अभाव होता. मराठी वृत्तवाहिन्यांनी ओसरलेली गर्दी झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती झाकता आली नाही.

 

शिवतीर्थाची क्षमता फार मोठी नाही. जेमतेम लाखाची आहे. परंतु हे मैदान भरण्या इतपत ताकदही आता ठाकरेंकडे उरलेली नाही. २५ वर्षे मुंबईवर राज्य करणाऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. हे काही एका दिवसात घडलेले नाही. ही गर्दी ओसरत का चालली आहे? एक नाही अनेक कारणे आहेत. पक्षात फक्त चमको नेते उरलेले आहेत. ते जमलेल्या गर्दीसमोर भाषण तर ठोकू शकतात. परंतु त्यांच्या नावाने सभेला गर्दी जमण्याची शक्यता शून्य असते. मग ते संजय राऊत असो वा सुषमा अंधारे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी किती लोक येत असतील, हा संशोधनाचा मुद्दा आहे.

 

सणावाराच्या दिवशी लोकांची मानसिकता वेगळी असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सभेची जाहीरात ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी वाजत, गाजत, गुलाल उधळत या…’ अशा प्रकारे केली जात असे. शिवतीर्थावर त्या दिवशी खरोखर हिंदुत्वाचा आवाज बुलंद होत असे. बाळासाहेब ठाकरे देशविरोधी कारवाया करणाऱ्या उचापतखोरांना खड्या आवाजात दम देत असत.

 

शिवसेनाप्रमुख ज्यांच्याविरोधात आवाज उठवायचे, त्यांच्या सोबत आज उद्धव ठाकरे उभे आहेत. सनातन धर्म, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, देशाची एकता-अखंडता मूळासकट उखडून काढायच्या मागे लागलेल्या लोकांच्या गळ्यात गळे घालण्याचे, त्यांच्या सोबत हातात हात घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या घालण्याचे काम उद्धव ठाकरे नियमितपणे करतात. दसरा मेळावा त्याला अपवाद कसा असेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या दसऱा मेळाव्याचा उल्लेख उपरोधाने शिमगा मेळावा असा केला, तो काही उगीचच नाही. दसऱ्याला घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. लोकांची मानसिकताही गोडधोडाची असते. अशा मानसिकतेने शिवतीर्थावर येऊन मोदीविरोधी वांत्या का ऐकाव्यात असा विचार कदाचित ठाकरे यांच्या पक्षातील लोकांनी केला असावा.

 

 

यंदाचा दसरा मेळावा गाजवला आझाद मैदानावर शिवसेनेच्या ज्योति वाघमारे यांनी. हे नाव तसे फार चर्चेतले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात त्या जे काही बोलल्या त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा आता थांबणार नाही असे दिसते. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या तैनाती फौजेतून उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे हे रत्न पक्षात आयात केले. चेहऱ्यावर चित्र-विचित्र भाव आणि भलताच आव आणून कोणाबद्दल काहीही बोलणे हे अंधारे बाईंचे वैशिष्ट्य. त्या आल्या ठाकरेंच्या पक्षात, परंतु फळल्या एकनाथ शिंदे यांना. अंधारेबाईच्या कारभारामुळे मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे, मीनाताई कांबळे या प्रमुख महिला नेत्यांसह अनेक महिलांनी पक्षाला रामराम ठोकला आणि त्या शिंदेंच्या पक्षात सामील झाल्या.

 

हे ही वाचा:

NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

‘भारतासोबत नातेसंबंध आवश्यक’

पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत करत राहणार

‘जेलर’मधला अभिनेता विनायकन याला अटक

 

वाघमारेबाईंनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जो भडीमार केला तो अभूतपूर्व आहे. त्यांनी सुषमा अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर उद्धव ठाकरे देऊ शकतील का? ‘तुमचे राजकारण जर हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चालत असेल तर बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या सुषमा अक्का तुमच्या पक्षाचा चेहरा कशा?’ ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानीवर अचकट विचकट हावभाव करून बोलणारी ही बाई तुमच्या पक्षाचा चेहरा असेल तर थू तुमच्या जिंदगानीवर’.  ‘तुम्ही सोनिया गांधी आणि सिल्वर ओकची गुलामगिरी करत असाल तर ठाकरे आडनाव बदलून वाकरे आडनाव लावा’, असा घणाघात त्यांनी केला.

 

हे प्रश्न अनेकांच्या मनातले. परंतु शिवसेनेच्या व्यासपीठावर हे प्रश्न विचारण्याची धमक आजवर कोणी दाखवली नव्हती. ती वाघमारे यांनी दाखवली. त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंच्या शिळ्या कढीपेक्षा ज्योति वाघमारे यांच्या भाषणाची चर्चा झाली तर त्यात नवल ते काय? सुषमा अंधारे यांच्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात काय भावना आहेत, त्याची झलक वाघमारेबाई यांच्या भाषणानिमित्त लोकांपर्यंत पोहोचल्या.

 

२०२४ हे देशात निवडणुकीचे वर्ष. महाराष्ट्रात महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक पक्ष शिडात हवा भरण्याचे काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या सभेचा झालेला हा फियास्को, हे काही चांगले लक्षण नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version