आव्हाड थोडी लाज बाळगा…

छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढून सुद्धा जर आव्हाडांना तो क्रूर वाटत नसेल तर आव्हाड हे त्यांच्याच वंशावळीतले आहेत

आव्हाड थोडी लाज बाळगा…

मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असा दावा करून काही वेळातच आव्हाड यांनी पलटी मारली आहे. मुघलांचे प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोमा रोमात कसे सामावले आहे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जितेंद्र आव्हाड. देशाची लूट करण्यासाठी आलेले इस्लामी आक्रमक या देशाची समस्या कधीच नव्हती. स्वार्थासाठी त्यांच्यासमोर सरपटणारे जयचंद आणि सुर्याजी पिसाळ ही या देशातील आपली समस्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ही टिप्पणी केली. त्या पाठोपाठ जितेंद्र आव्हाड औरंगजेबाची भलामण करतात हा काही योगायोग नाही. राष्ट्रवादाशी काडीचाही संबंध नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या डीएनएशी या समस्येचा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेला लढा हिंदवी स्वराज्यासाठी होता. यात त्यांना स्वराज्यासोबत स्वातंत्र्य आणि स्वधर्म सुद्धा अभिप्रेत होता. तुर्कांचे अधिपत्य स्वातंत्र्यासोबत स्वधर्मालाही नख लावत होते. भारतावरील हिंदू संस्कृतीचा ठसा संपुष्टात आणून त्यांना इथे इस्लामी राजवट आणायची होती. छत्रपतींचा लढा त्यांच्याविरोधात होता.

आव्हाड म्हणतात, छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वराहून बहादूर गडावर नेले तिथेच त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी विष्णूचे मंदिरही आहे. औरंगजेब जर क्रूर आणि हिंदूव्देष्टा असता तर त्याने तिथे विष्णूचे मंदीरही फोडले असते. एखादा डोक्यावर पडलेला किंवा हिंदूंविरुद्ध छुपा एजेंण्डा राबवणारा माणूसच अशा प्रकारचे विधान करू शकतो. औरंगजेबाने किती मंदिरे पाडली याचा दाखला इतिहासाच्या पानापानावर आहे. काशी विश्वेश्वराचे एक उदाहरणही त्यांच्या धर्मवेडाची पावती देण्यासाठी पुरेसे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढून सुद्धा जर आव्हाडांना तो क्रूर वाटत नसेल तर आव्हाड हे त्यांच्याच वंशावळीतले आहेत, असे मानायला वाव आहे. संभाजी महाराजांचा छळ औरंगेजेबाने हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणूनच केला. आपण जे काही बोललो ते शेकेल याची जाणीव झाल्यानंतर आव्हाडांनी औरंगजेब कसा क्रूर होता, त्याने भावांची हत्या कशी केली याबाबत सारवासारव केली, पण बुंद से गयी वो हौद से नही आती असे म्हणतात.

मुंब्रा हा आव्हाडांचा मतदार संघ आहे. हा मतदार संघ मुस्लीम बहुल आहे. त्यामुळे इथे जिंकण्यासाठी आव्हाड सेव्ह गाझा… वैगेरे आंदोलने करून कट्टरवाद्यांना खूष करण्याचे प्रयत्न करत असतात. दहशत इशरत जहाँची पालखी खांद्यावर मिरवणारे हेच आहेत. गुजरात पोलिसांनी इशरतचा एन्काऊंटर केल्यानंतर आव्हाड भलतेच दु:खी झाले होते. इशरतला शहीद जाहीर करून त्यांनी तिच्या नावे रुग्णवाहिकाही सुरू केली. अमेरिकेच्या सुरक्षा संस्थांनी जेव्हा दहशतवादी डेव्हीड हेडलीला ताब्यात घेतले तेव्हा त्याने इशरतही दहशतवादी होती असा जबाव नोंदवला. हेडली हा मुस्लीम दहशतवादी आणि सीआयएसाठी डबल एजण्ट म्हणून काम करत होता.

कदाचित इस्लामी दहशतवाद्यांमध्ये त्याला सीआय़एनेच पेरले असण्याची शक्यता आहे. त्याला भारतातील इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवायांची अचूक माहिती होती. त्यामुळे देशद्रोह्यांच्या, इस्लामी कट्टरतावाद्यांच्या पालख्या खांद्यावर नाचवण्याची आव्हाड यांची खोड जुनी आहे. हिंदू, हिंदुत्व म्हटल्यावर त्यांच्या पोटात गोळा येतो. त्यांचे राजकीय गॉडफादर शरद पवार यांची शिकवणही तशीच आहे. आव्हाडांचा प्रेरणास्त्रोत हा नि:संशयपणे शरद पवार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे हिरवेकरण करणाऱ्या ब्रिगेडींना दोन थिअरी प्रस्थापित करणे गरजेचे होते. पहिली थिअरी महाराष्ट्राच्या इतिहासातील खलनायक हे मुघल नसून ब्राह्मण होते आणि मुघलांचा लढा फक्त राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी होता.

हे ही वाचा:

कंझावाला प्रकरणी तातडीने अहवाल सादर करा!

‘आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे’

भिवंडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना अटक

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

पहिला सिद्धांत लोकांच्या गळी उतरवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांना हौतात्म्य आले तो दिवस साजरा करण्यासाठी ब्राह्मणांनी गुढीपाडवा सुरू केला अशा कंड्या ब्रिगेडी इतिहासकारांनी पिकवायला सुरूवात केली. दुसरा सिद्धांत पक्का करण्यासाठी औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता त्याने बहादूर गडावरचे विष्णू मंदिर तोडले नाही. अशाप्रकारची विधाने येतात. अफजल खान हा सूफी संत होता, ही ब्रिगेडी पूडी सुद्धा याच उद्देशाने सोडण्यात आली होती. हे दोन्ही सिद्धांत एकदा लोकांच्या गळी उतरवले कि छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते, त्यांचा लढा हिंदवी स्वराज्यासाठी होता हा इतिहासच निकालात काढण्यात येईल.

हेच पवार आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना हवे आहे. महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणे, इतिहासाला कलाटणी देणे ज्यांना जमले नाही, ते महाराष्ट्राचा इतिहास बदलून मतपेढ्या मजबूत करण्याचे काम करतायत. अर्थाच आव्हाडांच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी औंरगजेब हा क्रूर नव्हता या विधानावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही. मराठ्यांचे हिंदवी साम्राज्य संपवायला आलेला इथल्या मातीत गाडला गेला. त्यांच्या पालख्या खांद्यावर मिरवणाऱ्यांनी हा इतिहास लक्षात ठेवावा. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला, मोडीली मांडीली क्षेत्रे, आनंदवन भुवनी या शब्दात आनंद व्यक्त केला. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणारे बुडाल्यावर जनतेने समर्थांचे हेच शब्द आठवून आनंद व्यक्त करू नये असे वाटत असेल तर महाराष्ट्रद्रोह्यांनी थोडी लाज बाळगावी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version