राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची धमकी दिली आहे. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती, तेव्हाही ते कायदा हातात घेत होते. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. पण तेव्हा ते कायदा हाती घेण्याआधी जाहीर इशारा देण्याच्या भानगडीत पडत नसत. मारझोड करून मोकळे होत असत. परंतु आता विरोधी बाकांवर बसल्यामुळे त्यांनी कार्यशैलीत बदल केला असावा. यापुढे ते आधी जाहीर करून राडे करणार असे दिसते आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज एक व्हीडीयो जारी करून राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. एका हातात भगवद गीता आणि एका हातात कुराण घेऊन अस्खलित उर्दूमध्ये त्यांनी हा व्हिडीयो जारी केला आहे. आपण सरकारला कायदा हाती घेण्याची धमकी देतानाही ते मुंब्र्याच्या दिशेने झुकलेले सर्वधर्म समभावाचे तत्व विसरले नाहीत. प्रचंड रडवेला, प्रक्षुब्ध चेहरा करून आव्हाड या व्हीडीयोत बोलताना दिसतायत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते. या कार्यक्रमात आव्हाडही सहभागी झाले होते. प्रचंड गर्दीच्या या सोहळ्यात आव्हाड यांनी मध्ये येणाऱ्या एका महिलेला हाताला धरून बाजूला ढकलले. याप्रकरणात महिलेने त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुळात आव्हाड यांनी त्या महिलेला हाताला धरून दूर लोटले नसते, थोडं थांबून ते पुढे गेले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता, परंतु वाटेत कोणी आडवे आलेले बहुधा त्यांना सहन होत नसावे. कोणी आलेच तर त्यांच्या स्टाईलने समोरच्या व्यक्तीला ते बाजूला हटवतात. ही स्टाईलच त्यांना महाग पडली.
आता ती महिला देहविक्रयाच्या प्रकरणात आरोपी झाल्याचे आव्हाड सांगतायत. ती खुलेआम फिरतेय, पण पोलिस तिला पकडत नाहीत, असा त्यांचा दावा आहे. एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आव्हाड तोंड लपवण्याचा प्रयत्न करतायत. महिलेचे चारित्र्य बिघडलेले असल्यामुळे आपल्याला तिच्या हाताला धरून दूर ढकलण्याचा परवाना मिळतो, असे तर आव्हाडांना सुचवायचे नाही?
आव्हाड वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून अशा बऱ्याच गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न करतायत. जर आमच्याच कार्यकर्त्यांनी तिला पकडले, काही केले तर? मी ठार वेडा झालो आहे, पोलिस जर त्या महिलेला संरक्षण देत असतील तर मलाही कायदा हाती घ्यावा लागेल अशी धमकी आव्हाडांनी दिलेली आहे.हे सरकारला आव्हान आहे. गंमत म्हणजे कधी काळी मंत्री राहिलेला नेता हे आव्हान देतो आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे, याची जाणीव गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना करून दिलेली बरी. आव्हाडांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीसांसोबत चांगले संबंध आहेत, अशी चर्चा होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही चर्चा थांबली. परंतु आता आव्हाड व्हीडीयो जारी करून कायदा हाती घेण्याची धमकी देतायत.
विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे ही घटना आईच्या मृत्यू इतकीच दु:खद आहे, असे आव्हाडांचे म्हणणे आहे. आव्हाडांना इतके दु:ख असेल तर त्यांनी व्हीडीयो जारी करण्याची नौटंकी करण्यापेक्षा न्यायालयात धाव घ्यायला हवी होती. जेव्हा एखाद्या व्यक्तिच्या विरोधात कायदा धाब्यावर ठेऊन गुन्हा दाखल करण्यात येतो. तेव्हा तो एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असतो.
भाजपा नेते किरीट सोमय्या, त्यांची पत्नी आणि मुलावर खासदार संजय राऊत यांनी असे अनेक आरोप केले. पोलिसांच्या संगनमताने गुन्हाही दाखल केला. परंतु हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत याची खात्री असल्यामुळे सोमय्या यांनी कायदेशीर लढा दिला. आव्हाड हे स्वत:च्या नावा मागे ड़ॉक्टर लावतात. अर्थात त्यांनी एखाद्या विषयावर डॉक्टरेट केली आहे, असे मानायला वाव आहे. इतकी ज्ञानी व्यक्ति कायद्याची ऐशी तैशी करण्याची भाषा करते मग त्यांचे मुंब्रावासी कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करावी?
आव्हाड यांना न्यायालयाचा मार्ग खुला आहे. परंतु ते या मार्गाने जात नाहीत त्याची काही ठोस कारणे आहेत. एक तर आव्हाडांवर ज्या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, त्याचे व्हीडीयो फूटेज उपलब्ध आहे. आव्हाड त्या महीलेच्या दंडाला धरून बाजूला करतायत हे त्या व्हीडीयो फूटेजमध्ये स्पष्ट दिसते आहे. महिला किंवा तरुणीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणे, असे भादवी कलम ३५४ च्या व्याख्येत म्हटले आहे. दंड पकडल्यामुळे एखाद्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होते की नाही, हे ती महिला किंवा न्यायालय ठरवू शकते. त्यामुळे आव्हाडांसाठी ते थोडं अडचणीचे आहे. आव्हाडांनी त्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचा दावा मान्य केला, तरी चारित्र्य वाईट म्हणून तुम्हाला एखाद्या महिलेच्या विरोधात वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळत नाही, हे आव्हाडांनाही माहिती आहे. शिवाय कायदा पाळण्याचा ना त्यांचा स्वभाव आहे, ना सवय.
एखादी महिला अडचणीत आणत असेल तिचे चारित्र्यहनन करायचे ही राष्ट्रवादीची नीती आहे. करुणा मुंडे यांच्या बहिणीने जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हा शरद पवारांनी तिच्या चारित्र्यावर सूचक प्रश्नचिन्ह लावले होते. विनयभंगानंतर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे, असा आव्हाड यांचा दावा आहे. आव्हाडांनी हा दावा यापूर्वीही केला आहे. महिलेला तयार केले जाते आहे, असे ते म्हणतायत. आव्हाडांचे दावे ऐकणाऱ्यांना भलतीच शंका येते आहे, एखादे जुने प्रकरण पुढे येणाची भीती तर आव्हाडांना सतावत नसेल? महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाबलेले एखादे प्रकरण उभे राहण्याची भीती तर त्यांना वाटत नाही? जर असे काही नसेल तर आव्हाड उर्दूतले व्हीडीयो जारी करून नौटंकी का करतायत?