शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

लाखो लोकांची मनं दुखावता, याची भरपाई फक्त शब्द मागे घेऊन होऊ शकते का?

शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना लायकी काढणे भोवलेले दिसते. या शब्दावरून बऱ्याच नेत्यांनी जरांगे यांची खरडपट्टी काढल्यानंतर अखेर ते ताळ्यावर आलेले दिसतात. शब्द मागे घेऊन ते थेट अग्रलेख मागे फेम गिरीश कुबेर यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत. पण शब्द मागे घेऊन खरोखर काही उपयोग आहे का? कारण ओठातलं पोटावर आलेले आहे. जरांगेंच्या भावना प्रामाणिक असतील तर त्यांनी ज्यांची लायकी काढली त्यांची माफी मागायला हवी.

पुण्यातील खराडी येथील सभेत जरांगे यांनी हे विधान केले होते. ज्यांची लायकी नाही, त्यांच्या हाताखाली काम मराठ्यांना काम करावे लागत आहे, असे ते म्हणाले. आम्ही तुमच्या पेक्षा सरस आहोत, उच्च आहोत, श्रेष्ठ आहोत हा दर्प या वाक्यात होता. एका बाजूला आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलन करायचे, मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणण्याची मागणी करायची, ओबीसीतूनच आरक्षण हवे असा आग्रह धरायचा आणि दुसऱ्या बाजूला आम्ही तुमच्या पेक्षा उच्च हा टेंभा मिरवायचा असा हा प्रकार होता.

जरांगेंच्या विधानात ज्या श्रेष्ठत्वाचा दर्प येतोय, तोच गोरगरीब मराठ्यांच्या कंठाशी आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागास होण्यासाठी लढाई करणारे जरांगे या दर्पापासून मुक्त नाहीत. हा दर्पच गोरगरीब मराठ्यांच्या दुरावस्थेला जबाबदार आहे. वाडीतला मराठा हा शहरातल्या मराठ्यापेक्षा कमी दर्जाचा, शेती करणारा मराठा गावातील इनामदार, वतनदार मराठ्यापेक्षा, गावातील पाटलापेक्षा कमी दर्जाचा, शह्याण्णव कुळी वेगळा कुणबी वेगळा हे भेद श्रेष्ठत्वाच्या या दर्पाने निर्माण केलेले आहेत. हे लोक एकमेकांना कमी लेखतात. रोटीबेटी व्यवहार करीत नाहीत, हे चित्र गावागावातलं.

आश्चर्य म्हणजे भरपूर जमीन, रग्गड पैसा यामुळे वतनदार, इनामदार मराठयांच्या मनात इतरांबाबत जो हीन भाव आहे, तो आमच्याकडे अर्धा एकर जमीन सुद्धा नाही असा दावा करणाऱ्या जरांगेच्या मनातही असावा हे दुर्दैव. जरांगे ज्यांना लायकी नसलेले म्हणाले ते कोण? अर्थात ओबीसी आणि अन्य आरक्षित जाती. हा भाव पुण्यात त्यांनी बोलून दाखवला.
भुजबळांनी हिंगोलीतील सभेत या मुद्द्यावरून घणाघात केला. जरांगेंना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. लायकीच्या मुद्द्यावरून जरांगेंची पिसं काढली. फक्त भुजबळ बोलले नाहीत, तर या मुद्द्यावरून शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनीही जरांगेंना लक्ष्य केले. जरांगेंची ही टीका सर्वसामान्यांनाही रुचली नाही. जरांगेंच्या या टिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अन्य लोकांच्या मनात अढी निर्माण केली.

पत्रकारांनी या मुद्द्यावरून जरांगेंचा पिच्छा पुरवला होता. तेव्हा एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखे शब्द मागे घेऊन जरांगे मोकळे झाले. एखाद्याला शेलक्या शब्दात हाणायचे आणि अंगाशी आल्यावर शब्द मागे घेऊन मोकळे व्हायचे, हे राजकारणी आणि नोकरी टिकवण्याच्या धडपडीत असलेल्या कुबेरांसारख्या संपादकासाठी ठीक आहे. परंतु सामाजिक न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगेनी अशी भाषा वापरवणे कितपत योग्य?

एका शब्दाने तुम्ही एका समाज घटकाचा अपमान करता, लाखो लोकांची मनं दुखावता, याची भरपाई फक्त शब्द मागे घेऊन होऊ शकते का? तुम्ही जेव्हा समोरच्याची लायकी काढता, तेव्हा त्यालाही तुमची लायकी काढण्याचा परवाना मिळतो. परीस्थिती अशी आली आहे की आरक्षण मिळवण्यासाठी लोक मागासपणाचा शिक्का मागू लागले आहेत. परंतु ज्यांना हा शिक्का हवा हवासा वाटतो, त्यांनाही इतरांची लायकी काढण्याची खुमखुमी आहे. ही फक्त जरांगेंची मानसिकता नाही. मागास म्हणवल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये सुद्धा आपसात उच्च-नीच भेदाभेद आहेत. ओबीसींमध्येही हे पाहायला मिळते. एकाच जातीच्या दोन उपजातींमध्येही हा श्रेष्ठ कनिष्ठतेचा खेळ पाहायला मिळतो. ब्राह्मणातील उपजातीही याला अपवाद नाहीत.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने

महात्मा गांधी गेल्या शतकातील महापुरुष; तर मोदी या शतकातील ‘युगपुरूष’

दक्षिण आफ्रिकेच्या खाणीत लिफ्ट ६५० फूट खाली घसरल्याने ११ दगावले!

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!

आपल्या पेक्षा इतरांना कमी लेखण्याचे त्यांची लायकी काढण्याचे खेळ जेव्हा जाहीर व्यासपीठावर खेळले जातात तेव्हा त्यातला किळसवाणेपणा खुपल्या शिवाय राहात नाही. अशा लोकांचा सामाजिक न्यायासाठी लढाई लढण्याचा, बोलण्याचा अधिकार कमकुवत होतो. जरांगेंना लायकीच्या मुद्द्यावर विचारलेले प्रश्न अनुत्तरीत करू लागले तेव्हा, त्यांनी पत्रकारांनाच विचारले तुम्ही हा विषय सारखा का लावून धरला आहे? असा सवाल केला. म्हणजे पत्रकारांनी काय विचारायचे हे सुद्धा आता जरांगे ठरवणार. हे लायकी काढणे वाईट शेकू शकेल याची जाणीव झाल्यानंतर मी माझे शब्द मागे घेतो, असे सांगून त्यांनी सुटका करू घेतली.

 

अंबडच्या सभेत छगन भुजबळ यांनी जरांगेवर वैयक्तिक टीका केली. त्यांचे शिक्षण काढले, त्यांचा अभ्यास काढला, ते सासऱ्याच्या घरात राहतात हेही काढले. जे काढण्याची गरज नव्हती. ही टीका त्यांना प्रचंड झोंबली. पलटवार करताना जरांगेंनी भुजबळांच्या भ्रष्टाचार, त्यांचा तुरुंगवास काढला. इथपर्यंत ठीक होते. जरांगेनी हिशोब चुकता केला. परंतु जरांगे थांबले नाहीत. त्यांची गाडी घसरली आणि आरक्षण मिळालेल्या जाती-जमातींची लायकी काढली.

 

भुजबळ हे जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करतायत, असे आरोप जरांगेंनी वारंवार केला आहे. परंतु भुजबळांनी मराठ्यांची लायकी काढलेली नाही. ते काम केले जरांगेंनी. इतरांची लायकी काढून जरांगे सामाजिक सलोखा निर्माण करतायत का? त्यांनी इतरांची लायकी काढून चूक केलेली नाही, हे सामाजिक पापच आहे. जरांगेंमध्ये थोडी तरी सामाजिक चाड शिल्लक असेल तर त्यांनी हिंदू समाजाची माफी मागायला हवी. कारण त्यांचे
वक्तव्य हिंदू समाजात फूटीची बीजे पेरणारे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version