27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरसंपादकीयपुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी...

पुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी…

जातीगत जनगणना हे हिंदू समाजात तेढ वाढवण्याचे षडयंत्र आहे हे हिंदू मतदारांना पटवण्यात मोदींना यश आले

Google News Follow

Related

हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या दोन्ही राज्यात भाजपाचा बाजार उठणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. अलिकडे एक्झिट पोलला कोणी फार गांभीर्याने घेत नाही, लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे भजे झालेले सगळ्यांनीच पाहिले. परंतु तरीही भाजपा समर्थकांना फार आत्मविश्वास नव्हता. आज निकाल जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला आणि हरयाणामध्ये भाजपाला बहुमत मिळत असल्याचे आकडे सांगत आहेत. हरीयाणाचे निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. इथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना पोत्यांनी आश्वासने दिली होती. तरीही भाजपाने इथे गेल्या वेळच्या तुलनेत उत्तम कामगिरी केलेली दिसते. ताज्या निकालांचा अर्थ काढायला गेल्यास जिथे मुस्लीम मतांचा टक्का मोठा तिथेच काँग्रेसला जिंकण्याची हमी आहे, असेच म्हणता येईल.

लोकसभा निवडणुकांचे निकाल भाजपाच्या मनासारखे लागले नाहीत. त्यामुळे ही भाजपाच्या उतरंडीला सुरूवात असल्याचा प्रचार विरोधकांनी सुरू केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा पराभूत झाल्यास केंद्रातील सरकारही बदलेल, अशी कुजबुज विरोधकांनी सुरू केली होती. उबाठा शिवसेनेचे नेते यात आघाडीवर होते. गेल्या दहा वर्षांच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व परिवर्तन घडवून दाखवले. एका बाजूला दहशतवाद नियंत्रणात आणत असताना दुसऱ्या बाजूला विकासाची गंगा इथे प्रवाहित करण्यात सरकारला यश आले. त्याचे दृश्य परिणाम इथे दिसू लागले.

शाळा, सिनेमागृहे, बाजार पुन्हा गजबजू लागली. पर्यटकांचा आकडा दोन कोटीच्या पुढे सरकला. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनी काही गावात रस्ते आले, वीज आली. लोकांच्या खिशात चार पैसे आले. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचले. खोऱ्यात शांतता निर्माण करण्यात मोदींना यश आले.परंतु या कामाचे मतांमध्ये परिवर्तन होईल, अशी पुसटशी शंकाही कोणाला नव्हती. खोऱ्यातील मतदारांनी हा विश्वास खरा करून दाखवला. विकासाला फार किंमत न देता गेली अनेक दशके जम्मू काश्मीरला ओरबाडून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या फारुक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला पूर्ण बहुमताची सत्ता दिली. काँग्रेसची या पक्षाशी युती आहे. पीडीपीचा सुपडा साफ झालेला आहे.

भाजपाने खोऱ्यात काही अपक्षांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या रणनीतीला फार यश आल्याचे दिसत नाही. मुस्लीम मतदार धर्माच्या आधारावरच मतदान करतो. त्याला विकासाशी, रोजगाराशी, देशहिताशी फार घेणे देणे नाही. हिजबुल्लाचा कमांडर नसरल्ला जगाच्या पाठीवर कुठे ठार झाला तर यांचा उर भरून येतो. बाकी भारतात कुठे भुकंप येऊन शेकडो लोक ठार झाले, किंवा दहशतवाद्यांशी लढता लढता जवानांना वीर मरण आले तरी यांना काडीचा फरक नाही. हे जम्मू काश्मीरच्या निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हिंदू या निकालातून काही शिकणार आहेत का? हा सवाल आहे. हरयाणामध्ये २०१४ मध्ये भाजपाची पहिल्यांदा सत्ता आली होती. मनोहरलाल खट्टर राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. दुसऱ्या टर्ममध्ये मोदींनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. परंतु निवडणुकीच्या काही काळ आधी त्यांच्या जागी नायब सिंह सैनी यांना राज्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

काँग्रेसने इथे जातीगत जनगणना करू असे आश्वासन दिले होते. ३०० युनिट मोफत वीज, महिलांना २००० रुपये, जुनी पेन्शन योजना, घरासाठी प्लॉट अशी आश्वासनांची उधळण केली होती. म्हणजे एखाद्या दिग्दर्शकाने सुपरहिट सिनेमाचे सगळे फॉर्म्युले एकत्र करून एखादा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करावा तसा काहीसा जाहीरनामा काँग्रेसने जारी केला होता. परंतु हिमाचल प्रदेशमध्ये आलेले आर्थिक संकट, तेलंगणामध्ये तोंडाला पुसलेली पाने पाहून जनता शहाणी झालेली दिसते. जनता फार बधली नाही.

हे ही वाचा:

डासना मंदिरावर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथीयांवर कारवाई करा!

हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार

स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी नाकारली की ऑफरच नव्हती?

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवायला सुरूवात केली होती. विधानसभा निवडणुकी आधी मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्या, अशी खवचट विनंती शरद पवारांनी केली होती. निकाल काहीही येवो, जिंकण्याची शक्यता असो वा नसो, प्रत्येक निवडणुकीत कष्ट घ्यायचे, घाम गाळायचा, हे मोदी आणि शहा यांचे वैशिष्ट्य. मोदींनी या राज्यातही धडाक्यात प्रचार केला. मतदांरांना एकजुटीचे आवाहन केले होते. काँग्रेसला खात्री आहे की, त्यांची व्होटबँक एकसंध राहिली आणि इतरांमध्ये फाटाफूट होईल. त्यामुळे काँग्रेस सतत फोडाफोडीचे राजकारण करत असते. त्यामुळे आपल्याला एकजूट राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी प्रचार सभांमधून केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे… असा संदेश दिलेला आहे, तोच संदेश मोदींनी वेगळ्या शब्दात सांगितला. राहुल गांधी यांचा जातीगत जनगणनेचा मनसुबा दुसरे तिसरे काही नसून हिंदू समाजात तेढ वाढवण्याचे षडयंत्र आहे हे हिंदू मतदारांना पटवण्यात मोदींना यश आले. काश्मीर खोऱ्यात झालेल्या मतदानाच्या पॅटर्नमुळे मोदी आणि त्या आधी योगी आदित्यनाथ जे काही म्हणाले त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. काँग्रेस नेते भुपिंदर सिंह हुडा यांच्या गटाने दलित समाजाच्या नेत्या कुमारी सैलजा यांना फार महत्व न दिल्यामुळे आणि त्यांच्या समर्थकांचा पत्ता कापल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला अशी चर्चा आहे. प्रत्येक निवडणुकीत असे छोटेमोठे विषय निकालाला प्रभावित करत असतात. परंतु यातला सगळ्या मोठा घटक म्हणजे राहुल गांधी यांचे नेतृत्वच आहे.

लोकसभा निवडणुकीत कशाबशा ९९ जागा मिळवू शकलेल्या राहुल गांधी यांना आभाळाएवढे मोठे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचे समर्थक करीत होते. त्या फुग्याला टाचणी लागलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये तोंडावर आपटलेल्या विनेश फोगाटच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपाला लक्ष्य करण्याची त्यांची चालही फसली. आणखी एक फुगा फुटलेला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हरयाणाच्या आखाड्यात उतरले होते. तुरुंगात जाऊन आलेल्या केजरीवालांना सहानुभूतीची लाट हरयाणात हात देईल असे त्यांना वाटले होते. परंतु त्यांच्या पक्षाचा इथेही सुपडा साफ झाला. कधी काळी त्यांच्या पक्षाचे आधारस्तंभ असलेले योगेंद्र यादव या निवडणुकीत काँग्रेसची पालखी घेऊन नाचत होते. त्यांचा एक व्हीडीयो प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये ते म्हणतायत की हरियाणात तीन शक्यता आहेत, काँग्रेसची हवा आहे, वादळ आहे आणि त्सुनामी आहे. राजकीय विश्लेषक जेव्हा दलाली करायला लागतात तेव्हा त्यांची शोभा होते. त्यांच्या या भाषणावरून सोशल मीडियावर यादव यांची चांगलीच हजामत चाललेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा