लोकसभा निवडणुकीपूर्वी मविआचे विसर्जन करण्याचे डील?

उद्धव ठाकरेंची ताठर भूमिका मविआचे किंवा त्याच्या पक्षाचे भले करणार नाही

लोकसभा निवडणुकीपूर्वी मविआचे विसर्जन करण्याचे डील?

उबाठा सेनेने लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली, तेव्हापासून काँग्रेसमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. काँग्रेसचा दावा होता अशा अनेक जागांवर उबाठा सेनेने दावा केलेला आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर पत्रकार परिषद घेऊन उबाठा सेनेवर तोफ डागली आहे. सांगलीही धुमसते आहे. या घडामोडींतून निवडणुकीपूर्वीच मविआचे विसर्जन होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. उबाठा गट जाणीवपूर्वक त्या दिशेने प्रयत्न करत असल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मविआचा पट उधळला जावा यासाठी ठाकरे गट जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. उबाठा सेनेने यादी जाहीर करण्यापूर्वी मविआतील वाटाघाटी पूर्ण झाल्या होत्या काय, असा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रतिक्रिया काँग्रेसकडून येतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेतेही नाराज आहेत. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी एक्सवर उबाठा सेनेची यादी जाहीर केल्यानंतर मविआमध्ये ही घमासान सुरू झाली.
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने सांगलीतून उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सांगलीतील काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती.

भाजपाने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना इथून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी त्यांनी वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील होते. पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. ते स्वाभिमानीमध्ये काँग्रेसमधूनच आयात करण्यात आले होते. विशाल पाटील पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पडळकर भाजपामध्ये दाखल झाले.

सांगलीत ताकद काँग्रेसची आहे. संघटना मजबूत आहे, कार्यकर्ते आहेत. तुलनेत इथे उबाठा सेना तोळा मासा आहे. ठाकरे गटाचा उमेदवार आणि कार्यकर्ते मात्र काँग्रेसकडे. त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. चंद्रहार यांच्या उमेदवारी मागे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची अंतर्गत हातमिळवणी असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. जयंत पाटील यांचे वसंतदादांच्या परिवाराशी असलेले राजकीय वैर जुने आहे. विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू. पाटलांचा गेम वाजवण्यासाठी जयंत पाटील यांनी चंद्रहार नावाचा मोहरा ठाकरेकडे पाठवला. ठाकरे गट आणि पवार गट एकमेकांना पुरक राजकारण करत असून काँग्रेसचा कडेलोट करतोय. त्यामुळेच मविआचा बाजार उठणार अशी चिन्हे आहेत.

चंद्रहार पाटील यांचे नाव सांगलीतून जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम, विक्रम पाटील, विशाल पाटील आदी नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत. ठाकरेंना मविआचा पट उधळून लावायचा आहे, असे चित्र तूर्तास तरी दिसते आहे. ठाकरे राष्ट्रवादीला सोबत घेऊन आणि काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर काम करतायत. ठाकरेंनी इथे उमेदवार दिला तरी काँग्रेस इथून निवडणूक लढवणार, विशाल पाटील इथून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे निश्चित. हे चित्र सांगलीपुरते मर्यादित नाही.

माजी खासदार संजय निरुपम यांनीही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघासाठी बंडाचे निशाण उभारले आहे. ही जागा ठाकरे गटाने अमोल किर्तिकर यांना जाहीर केल्यामुळे निरुमप यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज पत्रकार परीषद घेऊन उबाठा सेनेवर तोफ डागली. मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला फक्त एक जागा आलेली आहे. हा काँग्रेस संपवण्याचा डाव आहे, असा संताप व्यक्त करून एका खिचडी चोरासाठी मी काम करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.
उत्तर मध्य मुंबईतून ठाकरे गटाने अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली असून इथून निवडणूक लढवण्यास माजी मंत्री वर्षा गायकवाड इच्छूक होत्या. त्यामुळे तिथेही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस सुरू आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकर न पाहिलेला बरा…

गुजरातच्या पराभवानंतर शुभमनला १२ लाखांचा दंड

ठाकरे गटाकडून खैरे यांना उमेदवारी दानवेंना तिकीट नाही

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

उद्धव ठाकरेंची ताठर भूमिका मविआचे किंवा त्याच्या पक्षाचे भले करणार नाही, हे सांगायला कोण्या राजकीय पंडिताची गरज नाही. सांगलीत तिरंगी लढत झाली तर त्याचा थेट लाभ भाजपाला मिळणार. २०१९ ची पुनरावृत्ती होणार. अन्य मतदार संघातही हेच समीकरण असेल.मविआची स्थापनाच भाजपाविरोधी मतांमध्ये होणारी फूट रोखण्यासाठी झाली होती. त्याच उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. रासपाने शरद पवारांचा नाद सोडून पुन्हा एकदा भाजपाशी सोयरीक केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही बाजूला झाले आहेत. एका बाजूला वंचित आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्यामुळे एकास एक उमेदवार देऊन भाजपाला दणका देण्याची योजना केराच्या टोपलीत गेली आहे, हे स्पष्ट. महाराष्ट्रात भाजपा ४० पार करण्यासाठी उद्धव ठाकरे जोरदार प्रयत्न करतायत.

ठाकरे यांनी पडद्यामागे भाजपाशी हातमिळवणी केल्याची चर्चा गेल्या काही दिवसात सुरू होती. अशा बातम्यांची पुष्टी होणे कठीण असते. परंतु उमेदवारांबाबत ठाकरे गटाने वाटाघाटीत पहिल्या दिवसापासून जो ताठरपणा दाखवला त्यातून ही कुजबुज शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंनी भाजपासोबत काही डील केले आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनाही पडलाय. रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत झालेल्या कथित भेटीबाबत संशयाचे धुके अजून पुरते फिटलेले नाही. सांगली आणि उत्तर-पश्चिम मुंबईतील खदखद मविआला सरणावर नेणार अशी चिन्हे आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version