राजकोट येथील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. राज्यातील महायुतील सरकारला नामुष्की आणणारी ही घटना होती. अनेकांनी संताप व्यक्त केला, पराकोटीची नाराजी व्यक्त केली. परंतु सध्या जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतायत त्याला तमाशा शिवाय दुसरे काहीही म्हणता येणार नाही. गेली अनेक वर्षे, हा शाहु, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे, या वाक्याने भाषणाची सुरुवात करणारे हे नेते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जाणीवपूर्वक टाळणारे हे नेते, त्यांचा इतिहास पुसला जावा असे प्रयत्न करणारे हे नेते, आता छत्रपतींबाबत किती वाटते आणि किती नाही, अशी नौटंकी करतायत. उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या हट्टामुळे पुतळ्यासाठी ठरवलेली मूळ जागा बदलण्यात आली ही वस्तूस्थिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ही काँग्रेसची परंपरा आहे, ती जवाहरलाल नेहरुंपासून सुरू झालेली आहे. काँग्रेस ज्या एकगठ्ठा मुस्लीम मतांच्या प्राणवायूवर जगते तो प्राणवायू छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मिळण्याची शक्यता नाही, हे काँग्रेसवाल्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापासून आजतागायत काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी छत्रपतींचे नाव जाणीवपूर्वक टाळले नाही तर ते पुसण्याचा प्रयत्न केला. अर्थात खुज्या उंचीच्या काँग्रेस नेतृत्वाला ते शक्य झाले नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा हे तिघे काँग्रेस नेते गेली अनेक दशके देशाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या अनेक जाहीर सभा झाल्या, राजकीय दौरे झाले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावर गेले आहेत, तिथे नतमस्तक झाले आहेत, शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत आहेत, असा एक व्हीडीयो कुणी दाखवावा. एकही व्हीडीयो मिळणार नाही. कारण हिंदुत्व, हिंदवी स्वराज्य, भगवा झेंडा हा नेहरु-गांधी घराण्यासाठी कायम तिटकाऱ्याचा विषय राहिलेला आहे. काँग्रेसचा वारसा हा बाबर, औरंगजेबाचा वारसा आहे.
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर छत्रपतींचा जयजयकार होत नाही, हिंदू हत्यांचा खाटीकखाना चालवणाऱ्या धर्मांध टिपू सुलतानाचा उदो उदो होतो. महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना कर्नाटकमध्ये छत्रपतींचा पुतळा क्रेन लावून हटवण्यात आला तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी निषेधाचा एक शब्द तरी उच्चारला होता का? ना त्यांनी, ना काँग्रेसच्या कृपेने मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी, ना संजय राऊतांनी. खासदार वर्षां गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्याच्या बाता करतात. गायकवाड यांनी छत्रपतींचा जय जयकार केल्याची बाब तर खूप दूर राहिली यांनी एखाद्या भाषणात छत्रपतींचे नाव घेतले एवढे फूटेज तर कोणी दाखवावे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही निश्चितपणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. छत्रपती हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, महादेव आहेत. त्यांच्या पुतळ्याबाबत अशी घटना घडल्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली. अनेकांना अतोनात संताप आला. परंतु, राजकीय नेते ज्या प्रकारे या घटनेचे राजकारण करत आहेत, ते जास्त दुर्दैवी आहे. हे असे लोक आहेत, ज्यांनी छत्रपतींचा वारसा कायम नाकारला आहे.
राजकोट येथे ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला ती पर्यायी जागा होती. ती मूळ जागा नव्हती. सिंधुदुर्गमधील पुतळ्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील जी जमीन निवडण्यात आली होती. ती जमीन केंकरे नावाच्या गृहस्थांची होती. सरकार त्यांना बाजारभावापेक्षा जास्त रक्कम देऊन जमीन विकत घ्यायला तयार होते. परंतु त्यांची इच्छा नव्हती. माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यासाठी या जागेत पुतळा उभारु नये असा कोलदांडा घातला होता. तेव्हा ते माजी खासदार झाले नव्हते. वास्तविक त्यांना केंकरेंचे मन वळवता आले असते. राऊतांनी ते केले नाहीच, शिवाय तहसीलदारांना फोन केला आणि त्या जागेवर पुतळा उभा राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांना फोन करून त्या जमिनीसाठी हट्ट धरू नका असे बजावले. त्यानंतर पुतळ्याची जागा बदलण्यात आली. आता तेच विनायक राऊत पुतळा कोसळल्यानंतर आरडाओरडा करतायत. त्यांनी या विषयावर राजकारण जरुर करावे, जे चुकले आहेत, त्यांना धारेवरही धरावे. पण हे सगळे करताना आपण पुतळ्यासाठी जी जागा निवडली होती, त्या जागेवर पुतळा उभारण्यासाठी विरोध केला होता हेही सांगावे.
विनायक राऊतांनी या प्रकल्पात कसे अडथळे आणले आमचे विशेष प्रतिनिधी सुदर्शन सुर्वे यांनी न्यूज डंकावर घेतलेल्या विष्णू मोंडकर यांच्या सविस्तर मुलाखतीतून स्पष्ट झालेलेच आहे. ही मुलाखत अजिबात चुकवू नका. पुतळ्याच्या परिसराच्या सजावटीचे निकृष्ट दर्जाचे काम करणारे बाबा आगणे आणि बाबा सावंत हे उबाठा शिवसेनेचे कार्य़कर्ते होते हेही उघड झाले आहे. त्यामुळे जे काही घडले त्यात उबाठा शिवसेनेचेही हातबोट लागले आहे. तेव्हा सरकारचा जळजळीत निषेध करताना त्यांनी स्वत:च्याही चार थोबाडीत मारून घ्याव्यात आणि जाहीररित्या जनतेची माफी मागून पापक्षालन करून घ्यावे.
हे ही वाचा:
‘शिवलिंगावरील विंचू’ वक्तव्यामुळे पंतप्रधानांची बदनामी; थरूर यांना न्यायालयाने फटकारले
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!
‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला सुरुवात
मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच नाही!
शरद पवार आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी आयुष्यभर छत्रपतींचा इतिहास दूषित करण्याचे, त्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम केले. पवारांनी छत्रपतींचे नाव घ्यायला सुरुवात केली ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची जाहीरपणे पोलखोल केली त्यानंतर. पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधीही घेत नाहीत, हे ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर पवार शिवाजी महाराजांचे नाव घेऊ लागले. पवार त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत फक्त एकदा तीर्थ रायगडावर गेले तेही डोलीमधून. पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या लाँचिंगच्या निमित्ताने. म्हणजे तिथेही तुतारी फुंकण्याचा पक्षीय स्वार्थ होता.
राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. केवळ या तांत्रिक मुद्द्याच्या जोरावर मी औरंगाबादच म्हणणार असे विधान पवारांनी एकदा नाही, दोनदा केले. पवारांची ही कृती मराठ्यांच्या छत्रपतीला हालहाल करून ठार करणाऱ्या विकृत आणि धर्मांध औरंगजेबावर त्यांचे श्रद्धा, प्रेम आणि आस्था व्यक्त करणारी आहे. ते छत्रपतींचे नाव कसे घेतील. अनाजी पंतांना खलनायक दाखवण्यापुरते फक्त पवारांच्या गोतावळ्याला छत्रपती संभाजी महाराज आठवतात. आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यापुरते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे तिथेही ब्राह्मण विरोधात कंड शमवण्याची खुमखुमी जास्त असते. पवारनिष्ठांची मांदीयाळीही अशीच औरंगजेब आणि अफजलखानाशी एकनिष्ठ असलेली. ही सगळी मंडळी अचानक छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आदर, प्रेम व्यक्त करतायत. रावणाने श्रीरामाचे पाद्यपूजन करावे, असा हा सगळा मामला.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)