लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याबाबत फारसा सस्पेंस उरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: तिसऱ्या टर्मबद्दल आश्वस्त आहेत. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातही ही बाब स्पष्ट झालेली आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र कांटे की टक्कर होणार अशा प्रकारची आकडेवारी या सर्व्हेतून पुढे आलेली दिसते, त्यात फारसे तथ्य वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल, असे भाकीत केले होते. हे भाकीत फक्त भारतीय अर्थव्यवस्थेबाबत नाही, हे भाकीत राजकीय आहे. आपली तिसरी टर्म पक्की असल्याचे मोदी त्यांच्या विरोधकांना आणि समर्थकांना ठणकावून सांगतायत.
जानेवारी २०२३ मध्ये सीव्होटर- इंडिया टुडेचा ‘मूड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे प्रसिद्ध झाला. या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला २९८, यूपीएला १५३ आणि अन्य दलांना ९२ जागा मिळतील असे भाकीत केले होते. त्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात मात्र मविआचे पारडे जड असेल आणि त्यांना ३४ जागा मिळतील भाजपा-शिवसेना महायुतीला १४ जागांवर समाधान मानावे लागेल असे आकडे दिले होते. इंडिया टीव्ही सीएनएक्सचा सर्व्हे २८ जुलै रोजी प्रसिद्ध झाला. या सर्व्हेमध्ये एनडीएला ३१८, इंडीयाला १७५ आणि इतर दलांना ५० जागा मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे चित्र २४-२४ असेल असे म्हटले आहे. म्हणजे दोन्ही आघाड्यांना २४-२४ जागा. या शिउबाठाला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला ११ जागा मिळतील असे भाकीत या सर्व्हेमध्ये करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आणि विरोधकांच्या आघाडीचे इंडिया असे नामकरण झाल्यानंतर आलेला हा पहिला सर्व्हे आहे. पाठोपाठ आलेल्या या दोन्ही सर्व्हेमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनतील असे स्पष्ट करण्यात आले असले तरी महाराष्ट्राच्या बाबत दोन्ही सर्व्हेमध्ये समोर आलेले आकडे भाजपाच्या दृष्टीने समाधानकारक नाहीत. शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीकडे भक्कम बहुमत होते, तरीही अजित पवारांचा सरकारमध्ये समावेश करण्यामागे लोकसभेचे गणित होते. भाजपाला महाराष्ट्रातून ४० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत, म्हणूनच हा जुगाड करण्यात आला. परंतु एवढी कसरत करण्यात आल्यानंतरही सर्व्हेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीच्या वाट्याला केवळ २४ जागा दिसतायत.
काल शरद पवार यांनी धुळ्यात एक विधान केले होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी ठरवले तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकेल. यापेक्षा वेगळं सांगण्याची गरज नाही. पवारांची विधाने अनेकदा फसवी असतात. त्यांच्या विधानाला इंडिया टीव्हीच्या सर्व्हेचा आधार आहे का हे स्पष्ट झालेले नाही. एकत्र आलो तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकेल असे पवार सांगते असले तरी, काही म्हणजे नेमके काय? हे मात्र ते स्पष्ट करत नाहीत. ते काही करू शकत असते तर, राज्यात सत्तारुढ झालेले सरकार हे तिघे हटवू का शकत नाहीत? दोघांच्या पक्षाला पडलेले खिंडार बुजवत का नाहीत? सोडून गेलेल्यांना परत का बोलवत नाहीत? असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत.
हे ही वाचा:
संभाजी भिडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या यशोमती ठाकूर यांना धमकी !
दारूसाठी पाच रुपये कमी दिल्याने दुकानदाराने केलेल्या मारहाणीत एकाच मृत्यू !
त्रिची विमानतळावर ४७ अजगर, २ सरडे घेऊन उतरला प्रवासी !
चीपपुरवठ्यात भारत चीनला निश्चित मागे टाकेल
जानेवारीत सीव्होटरचा सर्व्हे आलेला तेव्हा, ‘देशातील वातावरण बदलते आहे’, असे पवार म्हणाले होते. सलग दोन सर्व्हेमध्ये त्यावेळच्या मविआ आणि आताच्या इंडियाचे पारडे जड दाखवण्यात आले आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ४ जागा मिळाल्या असताना दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला ४ जागांवर विजय मिळेल हे पटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ११ लोकसभा जागांवर विजय मिळेल असे हा सर्व्हे म्हणतो. भाजपाच्या वाट्याला २० जागा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला २-२ जागा असे म्हटले आहे.
भाजपाच्या तीन जागा कमी होण्याचे आणि काँग्रेसच्या जागा १ वरून थेट ११ पर्यंत जाण्याचे काही कारण दिसत नाही.
देशभरात जर मोदी लाट आहे, तर महाराष्ट्रात ती लाट न दिसण्याचे काही कारण नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या १८ जागा केवळ मोदी लाटेमुळे मिळालेल्या आहेत. दहा वर्ष सत्ता राबवल्यानंतर मोदीं बाबत देशामध्ये सकारात्मक वातावरण आहे, असे प्रत्येक सर्व्हे सांगतो आहे. मग महाराष्ट्र त्याला अपवाद कसा असू शकेल?
ठाकरेंचे अडीच वर्षाचे स्थगिती राज संपल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विविध विकास कामांना मतदार पाठिंबा देणार नाही आणि ते स्थगिती राज राबवणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील हा तर्क न पटणारा आहे.
देशभरात सुद्धा भाजपाच्या खासदारांची संख्या ३०० पेक्षाखाली येईल, अशी शक्यता वाटत नाही. २०२४ पर्यंत देशात बऱ्याच चांगल्या घडामोडी होणार आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत भाजपाची पीछेहाट होईल आणि महाराष्ट्रात भाजपा मित्र पक्षांसह फक्त २४ जागा जिंकेल हे न पटणारे आहे. अर्थात २०१४ असो वा २०१९ दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच्या वाट्याला भव्यदिव्य यश येईल असा दावा करणे किती जणांना झेपले होते?
२०२४ च्या पोटात काय दडलेले आहे, याचे सर्व्हेवाल्यांना भाकीत करता येईल यावर तीळमात्र विश्वास वाटत नाही.
महाराष्ट्रातील राजकीय चित्र सध्या प्रचंड धुसर आहे. अनेक जण कुंपणावर बसलेले आहेत. येत्या काळात आणखी किती जण इथून तिथे आणि तिथून इथे उड्या मारतील हे आज सांगणे अशक्य. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसणारे लोक किती काळ त्यांच्यासोबत राहतील याबाबत साशंकता आहे. राज्यातील राजकारणाची सरमिसळ पाहून जाणकार चक्रावले आहेत. सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड गोंधळ आहे. राजकारणात अनिश्चतेचा धुरळा उडला असल्यामुळे कोणतेच चित्र स्पष्ट नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु २०२४ चे मतदान मोदींसाठीच केले जाणार, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या सर्व्हेला एका बातमीपेक्षा जास्त महत्व नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)