पवार-दाऊद संबंधांची पुन्हा चर्चा

शरद पवारांचे माफीया दाऊदशी संबंध असल्याचा आरोप जुना आहे.

पवार-दाऊद संबंधांची पुन्हा चर्चा

महाराष्ट्रात सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. एकूणच राज्याच्या तुलनेत बारामतीमध्ये राजकीय पारा जरा जास्तच वाढलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांना निवडणूक मैदानात उतरवल्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळतो आहे. एकाच कुटुंबातील लोक एकमेकांची उणीदुणी काढतायत, तिखट प्रहार करतायत. बारामतीच्या प्रचार धुराळ्यात शरद पवारांच्या दाऊद कनेक्शनची चर्चा होईल असा कोणी विचारही केलेला नसेल.

बारामतीत एका प्रचार सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अलिकडे शरद पवारांकडून अजित पवारांना भ्रष्टाचार प्रकरणावरून टोले लगावले जातायत. त्या मुद्द्यावरून अजित पवारांनी आज शरद पवार यांचे व्याजासह उट्टे काढले. मंत्री झाल्यावर, आमदार-खासदार झाल्यावर आरोप होतातच. ‘तुमच्यावरही दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरून आरोप झाले, भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याबद्दल आरोप झाले’, असा पलटवार अजितदादांनी केला. ‘तथ्य काहीच नव्हते, पण आरोप झालेच ना…’ हे वाक्य जोडायला मात्र अजित पवार विसरलेले नाहीत.

शरद पवारांचे माफीया दाऊदशी संबंध असल्याचा आरोप जुना आहे. हे आरोप अनेकांनी केले आहेत. सुरूवात केली भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी. शरद पवारांच्या मंत्री मंडळात मंत्री असलेल्या एका काँग्रेस नेत्याने दाऊद टोळीच्या दोन गुंडासह केलेल्या विमान प्रवासानंतर बराच गदारोळ निर्माण झाला होता.

मुंबई महापालिकेचे विशेष उपायुक्त गो.रा.खैरनार यांनीही शरद पवार यांच्यावर हे आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी उल्हास जोशी यांनी तर न्यायालयात शरद पवार यांच्याविरुद्ध प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप केला होता की, संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री असताना शरद पवार दाऊद टोळीतील तीन गँगस्टरना कवच पुरवण्याचे काम करायचे. रीसर्च एण्ड एनेलिसिस विंगचे निवृत्त अधिकारी एन.के.सूद यांनीही शरद पवार यांचे दाऊदशी आर्थिक संबंध होते असा आरोप केलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाव न घेता अशाप्रकारचे आरोप केले. ‘ज्यांनी देशात बॉम्बस्फोट घडवले त्यांना ज्यांनी इथून पळ काढायला मदत केली त्यांना सोडणार नाही’, असा इशारा मोदींनी बीकेसी येथे झालेल्या एका जाहीर सभेत दिला होता.
मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले. शेकडो कोटींची मालमत्ता बर्बाद झाली. अनेकांचा बळी गेला. कित्येकांना आयुष्यभर अपंगत्व आले. या स्फोटानंतर राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डच्या संबंधांची चर्चा सुरू झाली.

पंतप्रधान नरसिंहराव यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी निवृत्त गृहसचिव एन.एन.वोरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. या समितीच्या अहवालाची काही पानेच जनतेसमोर येऊ शकली. माफिया, नोकरशहा, राजकीय नेते आणि पोलिसांच्या साटेलोट्यावर या अहवालाच्या माध्यमातनू प्रकाश टाकण्यात आला आहे. हा अहवाल जनतेसाठी एक कोडेच ठरला. कारण हा अहवाल अजूनही गोपनीयच आहे. हा अहवाल जनतेसमोर यावा म्हणून अनेकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु उपयोग झाला नाही. या अहवालात महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे नाव आहे, अशी बरीच कुजबुज झाली.

हे ही वाचा:

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ आलीये!

इम्रान खान यांनी लष्करप्रमुखालाच धमकावले …तर सोडणार नाही!

लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!

शरद पवारांचे नाव दाऊदसोबत अनेकदा जोडण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवाब मलिक यांच्यावर दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासोबत जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप झाला. प्रकरणात तथ्य असल्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दाऊद टोळीच्या संबंधाबाबत चर्चा झाली. शरद पवारांनी याप्रकरणी नवाब मलिक यांना पाठीशी घातले तेव्हा वोरा कमिटीच्या अहवालाची नव्याने चर्चा झाली.
शरद पवारांवर आतापर्यंत ज्यांनी आरोप केले ते विरोधक होते. किंवा असे लोक होते, ज्यांचे पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध असण्याचे काही कारण नव्हते. अजित पवारांनी जेव्हा पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांची चर्चा केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.

तुमच्यावर ही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झाला, असा सवाल आधी अजित पवारांनी केला. तथ्य नव्हते, परंतु आरोप तर झाले ना, असे जोडकाम दुसऱ्या वाक्यात करून घेतले. अजितदादांनाही शरद पवार आणि दाऊद यांच्या कथित संबंधाना उजाळा देण्याची बुद्धी झाली. वाक्यांची रचना अशी केली की आरोपही झाले आणि खंडनही झाले नाही.
तु हरामखोर आहेस, हे पहिले वाक्य, नंतर वाक्य जोडायचे की असे मला तरी वाटत नाही. तुझे थोबाड फोडावेसे वाटते, हे पहिले वाक्य, असे मी बोलेन तरी कसा? हे दुसरे वाक्य. ब्लड इज थिकर दॅन वॉटर असे म्हणतात. परंतु पोलिटीकल इंटरेस्ट्स आर मोर थिकर दॅन ब्लड असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version