23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयरवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

गारगाई पिंजाळ प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काहीच आर्थिक तरतूद केली नसल्याचा सवाल वायकरांनी या अधिवेशनात उपस्थित केला. मुंबईकरांच्या हिताचे प्रकल्प झालेच पाहिजेत, अशी गर्जना त्यांनी केली.

Google News Follow

Related

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते एकापाठोपाठ एक त्यांना सोडून जात असताना त्यांचे एकनिष्ठ नेते, व्यावसायिक भागीदार रवींद्र वायकर यांनी आदित्य ठाकरेंना दणका दिला. विधीमंडळात बोलताना मुंबईकरांसाठी गरजेचे असलेले प्रकल्प झालेच पाहिजेत, असे सांगून त्यांनी फक्त आदित्य ठाकरे यांना तोंडावर पाडले नाही तर पक्ष प्रमुखांच्या मतावर बोळा फिरवला आहे. आदीत्य यांच्या उपस्थितच हे घडले हे विशेष.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प रद्द करण्यात आले. हे निर्णय घेण्यामागे पर्यावरणाचे कारण पुढे करण्यात आले असले तरी राजकारण हाच एकमेव निकष होता. तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रद्द करण्यात आलेला गारगाई पिंजाळ हा प्रकल्प मुंबईसाठी प्रचंड महत्वाचा होता. मुंबईच्या भवितव्याच्या दृष्टीने प्रचंड महत्व असलेला हा प्रकल्प रद्द करून महाविकास आघाडीने मुंबईकरांना मिळणारे हक्काचे पाणी पळवण्याचे काम केले होते.

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी या प्रकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मुंबईला सध्या दररोज ४२०० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा अपेक्षित आहे, परंतु फक्त ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. २०४१ पर्यंत म्हणजे पुढील १८ वर्षात मुंबईची लोकसंख्या एक कोटी ७० लाखांचा टप्पा गाठेल
अशी अपेक्षा आहे. तेव्हा पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लिटर्स इतकी असेल.

२०२१ मध्ये या प्रकल्पाला सुरूवात होणार होती. परंतु या धरणामुळे दोन हजार हेक्टर वनजमीन पाण्याखाली जाणार होती आणि साडे चार लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असे कारण देऊन हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला. पालिका आयुक्त आय.एस.चहल यांनी तशी रीतसर घोषणाही केली. त्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करून घेण्यासाठी प्लांट उभारण्याची घोषणा मविआने केली. गारगाई-पिंजाळ प्रकल्प रोखण्यामागे पैशाचे राजकारण आहे. मनोर येथल्या प्रकल्पातून राज्य सरकारला आपले उखळ पांढरे करून घ्यायचे आहे, असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी गेल्या अधिवशनादरम्यान केला होता.

हे ही वाचा:

कुठे गायब झालाय खलिस्तानी समर्थक अमृतपाल?

ठाण्यात बांधणार बागेश्वर धामचे मोठे मंदिर

शासकीय, निमशासकीय कर्मचारी उद्यापासून कामावर राहणार हजर; संप मागे

अनिल जयसिंघानीसाठी ‘ऑपरेशन एजे’…पाच पथके आणि पाठलाग

 

विधीमंडळात करण्यात आलेल्या या आरोपावर रवींद्र वायकर यांनी यंदाच्या अधिवेशनात एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. गारगाई पिंजाळ प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काहीच आर्थिक तरतूद केली नसल्याचा सवाल त्यांनी या अधिवेशनात उपस्थित केला. मुंबईकरांच्या हिताचे प्रकल्प झालेच पाहिजेत, अशी गर्जना त्यांनी केली.

गारगाई-पिंजाळ प्रकल्प मोडीत काढण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, विकास हा मुळावर उठणारा नव्हे, तर शाश्वत टिकणारा हवा, पाण्यासाठी पर्यावरण गमावणे परवडणार नाही. मुंबई वातावरण कृती आराखड्याचे लोकार्पण करताना १४ मार्च २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांनी काढलेले हे उद्गार वायकर एवढ्या लवकर विसरले?

मुळात हा प्रकल्प मविआने रद्द केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मोडीत काढलेला हा प्रकल्प मुंबईच्या हितासाठी पुन्हा सुरू केला. वायकर यांना हे माहीत नसण्याचे काहीच कारण नाही. कारण वायकर हे अनेकदा महापालिकेशी संबंधित होते. अनेक वर्षे नगरसेवक होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे गारगाई-पिंजाळ प्रकल्पाचे महत्वही त्यांना माहिती होते आणि हा प्रकल्प आदित्य ठाकरे यांच्यामुळे बासनात बांधण्यात आला हेही त्यांना माहीती होते.

खारे पाणी गोडे करण्याच्या तुलनेत गारगाई-पिंजाळ प्रकल्पातून मुंबईकरांना मिळणारे पाणी स्वस्त असूनही हा प्रकल्प रद्द करण्याची कारणेही त्यांना ठाऊक होती. तरीही वायकर यांना हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यांच्या या कृतीमुळे फक्त सत्ताधारीच नाही, तर त्यांचे स्वपक्षीय सुद्धा बुचकळ्यात पडले. गारगाई-पिंजाळ प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही हा मुद्दा वरकरणी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात असला तरी हा बाण फिरून आदित्य ठाकरे यांच्या दिशेने जाणार याची कल्पना नसण्या इतके वायकर राजकारणात कच्चे नाहीत.

वायकर यांच्या भात्यातून निघालेल्या या बाणामुळे हा प्रकल्प मोडीत काढण्याचा निर्णय अयोग्य होता, पर्यावरणाचे कारण बोगस होते, खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प मुंबईकरांच्या माथी मारायचा मविआचा डाव होता, हा प्रकल्प लादण्यामागे आर्थिक गणित होते, या सर्व बाबींवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आदित्य ठाकरे यांची बदनामी होईल असा मुद्दा मुळात वायकर यांनी उपस्थित करावा का? जे आदित्यना मुंबईकरांच्या गरजेचे आहे, असे वाटत नव्हते, तेच मुंबईकरांच्या गरजेचे आहे, असे वायकर यांनी ठासून का सांगितले, असे अनेक प्रश्न वायकर यांनी विधीमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नातून निर्माण होतात. वायकरसुद्धा बंडाच्या तयारीत आहेत का? त्या दिशेने त्यांची चाचपणी सुरू आहे का? हे त्यातून निर्माण झालेले उप प्रश्न.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा