‘जवाहरलाल नेहरुंनी देशातील विज्ञानावर लक्ष केंद्रित केले. वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले, त्याचे आज चीज झाले.’ चांद्रयान-३ च्या यशानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ही प्रतिक्रिया. अनेक काँग्रेस नेत्यांना चांद्रयानच्या निमित्ताने नेहरु प्रेमाचे भरते आले आहे. नेहरुंच्या एकूणच कर्तृत्वावर या अशा काही घटनांच्या निमित्ताने चर्चा होते ही चांगलीच गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे तर कसलेच श्रेय घेऊ नये अशी परिस्थिती आहे.
काँग्रेसने देश स्वतंत्र केला नसता तर ते पंतप्रधानही होऊ शकले नसते. जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांनी ब्रिटीश सत्तेला कडवी झुंज दिली. म्हणूनच नेहरुंना अहमदनगर फोर्ट जेल आणि महात्मा गांधीना आगाखान पॅलेसमध्ये शाही कारावास भोगावा लागला. जिथे उत्तम निवास, चांगेल जेवण, नोकर-चाकर आणि खेळण्याची, फिरण्याची मुभा असे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटीशधार्जिणे होते म्हणून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाला. त्यांना कोलू ओढावा लागला. त्यांचे हालहाल केले. अहिंसात्मक आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारच्या आसनाला हादरे बसत, परंतु नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेमुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे झालेल्या नाविकांच्या बंडामुळे ब्रिटीश सत्तेवर ओरखडाही उमटला नाही. देशासाठी फासावर लटकलेल्या शेकडो क्रांतिकारकांच्या बलिदानापेक्षा सत्याग्रहाची दहशत जास्त होती.
देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुंच्या प्रेरणेने, धरणे, सार्वजनिक कंपन्या, एम्स, इस्त्रो, आयआयटी सारख्या संस्था उभ्या राहिल्या. परंतु देशाची फाळणी कोणत्या मजबुरीमुळे झाली? फाळणीच्या काळात हिंदूंचा जो प्रचंड नरसंहार झाला, त्याचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे? लेडी माऊंटबॅटन यांच्या नादाला लागून देशाचे नुकसान कोणी केले? देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढे वर्षभर लॉर्ड माऊंटबॅटन देशाचे गव्हर्नर कोणामुळे राहिले? १९४८ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात भारतीय सेना जिंकत असताना संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युध्दविराम पदरी पाडून घेण्याचे कर्तृत्व कोणाचे? या निर्णयामुळे भारताची ८३ हजार चौरस कि.मी. जमीन पाकिस्तानच्या घशात गेली, त्याची जबाबदारी कोण घेणार?
देशाच्या अखंडतेपेक्षा शेख अब्दुल्ला यांचे संबंध अधिक प्रिय असल्यामुळे काश्मीरचे राजा हरीसिंग यांनी दिलेला विलिनीकरणाचा प्रस्ताव दोन वेळा कोणी फेटाळला? देशातील सर्व संस्थांनांचा भारतात विलय करून घेण्याची जबाबदारी सरदार पटेल यांनी घेतलेली असताना काश्मीरच्या विलिनीकरणात नाक खुपसण्याचे काम कोण करत होते? पंचशीलच्या भोंगळ धोरणामुळे देशाचे नुकसान कोणी केले? शांततेची कबुतरे उडवण्याचे धंदे करत देशाला युद्ध सज्ज न ठेवण्याचे पाप कोणाचे? चीन युद्धानंतर लडाखमधील भूमी चीनने कोणाच्या काळात बळकावली? चीनने तिबेटचा कब्जा कोणाच्या काळात घेतला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्यपद मिळत असताना, हे पद भारताला नको चीनला द्या, असा शहाणपणा कोणी केला? सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात कोलदांडा घालण्याचे काम कोणी केले? याचे उत्तरही पवारांनी दिले पाहिजे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम
तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
या ताऱ्यांनी केली चांद्रयान ३ मोहीम फत्ते
कारण नेहरुंचे कर्तृत्व फक्त इस्रो आणि एम्सच्या पलिकडचे आहे. त्यांच्या धोरणाची फळे भारत अजूनही भोगतो आहे. पवारांसारखे नेते जेव्हा नेहरुंची प्रशंसा करतात तेव्हा त्यात फक्त बेगडी प्रेमाचे प्रदर्शन नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आपले खुजेपण सतत जाणवत असल्यामुळे आलेले नैराश्यही असते.या वयात, पवार कधी एक हाती सत्ता स्थापन करू शकले नाहीत, हे ऐकण्याची वेळ यावी आणि त्याच वयात आपल्या वैचारिक विरोधकाच्या हाती अवघ्या देशाची सूत्रे असल्याचे चित्र दिसावे हे त्या नैराश्याचे कारण आहे.
या देशाच्या जडणघडणीत ज्यांचा हातभार आहे. त्यांच्या योगदानाबाबत चर्चा जरूर व्हावी, परंतु ती एकांगी नको. चांद्रयान-३ च्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले नाही. भाजपाच्या सर्व नेत्यांनी शास्त्रज्ञांचाच जयजयकार केला आहे. परंतु या यशाचे श्रेय नेहरु यांच्या चरणी वाहणे म्हणजे दांभिकपणाचा कळस आहे. प्रज्ञानंद हा बुद्धिबळात सध्या उत्तम कामगिरी करतो आहे. पवारांचे लॉजिक वापरले तर त्याचे अभिनंदन करण्याची गरज नाही, ज्यांनी बुद्धिबळाचा शोध लावला त्या आपल्या पूर्वजांच्या प्रयत्नांचे चीज झाले. हाच तर्क वापरायचा तर मग श्रेय नेहरुंचे कसे विक्रम साराभाईंना द्या ना!
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)