अनेकदा खोलवर गाडलेले मुडदे कबर उखडून बाहेर येतात आणि समोर उभे राहतात. देश म्हणजे आपल्या बापजाद्यांची पिढीजात मालमत्ता आहे, या समजुतीवर गांधी परिवाराचा गाढ विश्वास आहे. त्यातूनच यूपीए सरकारच्या काळात २००८ मध्ये पंतप्रधान स्मृती संग्रहालयातून (प्रायमिनिस्टर मेमोरीअल म्युझिअम एण्ड लायब्ररी) कोणत्याही वैध परवानगी शिवाय दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पत्रव्यवहाराचे ५१ पेटारे बाहेर काढण्यात आले. ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी पोहोचते करण्यात आले. ही पत्रं देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत, ती गांधी परिवाराने परत करावी अशी मागणी जोर धरते आहे. यामुळे मणक्यात एखादी थंड शिरशिरी गेल्यासारखा काँग्रेस पक्ष हादरलेला दिसतो. हे फडताळातले असे सांगाडे आहेत, ज्यामुळे काँग्रेसची परिस्थिती बुडत्याचा पाय खोलात अशी होण्याची पूर्ण शक्यता आहे.
भाजपा खासदार संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी जॉर्ज सोरोस प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर शरसंधान केले होते. मायलेकांवर देशद्रोहाचा ठपका ठेवला. पुन्हा एकदा त्यांनी गांधी परिवाराची दुखरी नस दाबली आहे. एक असे प्रकरण ज्यावर गेली अनेक दशके कुजबुज सुरू होती, परंतु आता खऱ्या अर्थाने गडगडाट सुरू आहे. हे प्रकरण आता चव्हाट्यावर आले आहे. याची सुरूवात झाली यंदाच्या सप्टेंबर महिन्यापासून. पीएमएमएलचे सदस्य रिझवान काद्री यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आणि नेहरुंच्या पत्रव्यवहाराचे जे ५१ पेटारे त्यांच्या घरी रवाना केले होते ते परत करण्याची मागणी केली. सोनिया गांधी यांनी ना यावर प्रतिक्रिया दिली ना पत्राचे उत्तर. त्यामुळे काद्री यांनी डिसेंबर महिन्यात दुसरे पत्र पाठवले. सोनियांचे सुपुत्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना. त्यांनीही शून्य प्रतिसाद दिला. ही पत्र आपण बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली आहेत, अथवा नाही, हे स्पष्ट कऱण्याचे सोडून
गांधी परिवार मौन धारण करून बसला आहे आणि काँग्रेस नेते कांगावा करीत आहेत.
ही पत्र १९७१ मध्ये पीएमएमएलच्या स्वाधीन करण्यात आली होती. हा नेहरुंचा पत्रव्यवहार आहे. विजया लक्ष्मी पंडीत, बाबू जगजीवनराम, गोविंद वल्लभपंत, पद्मजा नायडू, अलबर्ट आइनस्टाईन आणि एडविना यांना लिहीलेलीही पत्र आहेत. ही पत्र तब्बल ३७ वर्षे पीएमएमएलमध्ये होती. तेव्हा कोणाला समस्या झाली नाही. मग २००८ मध्ये अचानक सोनिया यांना या पत्रांची आठवण व्हावी आणि कोणाला काहीही न सांगता-कळवता ही पत्र त्यांनी इथून हलवावी, हे संशयास्पद आहे. कदाचित या पत्रांमध्ये असे काही दडलेले आहे, जे उघड झाले तर कदाचित काँग्रेसला जड जाईल.
काँग्रेस नेत्यांच्या या प्रकरणावर प्रतिक्रिया मोठ्या गमतीदार आहेत. हा देशातील संवेदनशील मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा डाव आहे, अशी नेहमीची घासलेली प्रतिक्रिया आली. भाजपाचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत,
असा दावाही रत्नाकर त्रिपाठी हे काँग्रेस प्रवक्ते करतायत. एकूणच काँग्रेस नेत्यांची पळापळ सुरू आहे. काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि भीती एकत्रितपणे दिसते आहे. ही खळबळ पाहाता भाजपाने त्यांच्या लंगोटीत हात घातला आहे, हे उघड होते. एडविना आणि लॉर्ड ल्यूईस माऊंटबॅटन यांचे वैवाहिक जीवन अत्यंत वादग्रस्त होते. विवाहानंतर एडविना आणि ल्यूईस यांच्या विवाहबाह्य भानगडी होत्या. बहुधा दोघांमध्ये अलिखित करार होता, एकमेकांच्या भानगडीत न पडता,
आपापलं आय़ुष्य जगायचे. १९४४ च्या एफबीआयच्या फाईल्समध्ये असा उल्लेख आहे की लॉर्ड माऊंटबॅटन हे बाय सेक्शुअल होते. एडविना यांच्या कैक बॉयफ्रेंड सोबत त्यांनी संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे नेहरू-एडविना यांच्या संबंधांचे प्लॅटोनिक, स्पीरीच्युअल अशा शब्दात वर्णन करणारे लोकांना उल्लू बनवण्याचे काम करतात. पामेला हीक या कन्यारत्नाने सुद्धा अशीच भलामण केलेली आहे. हे संबंध कसे होते ते पाहण्यासाठी कोणीही माऊंटबॅटन यांच्या बेडरुममध्ये डोकावलेले नाहीत. परंतु नेहरु हे एडविना यांच्या पूर्णपणे आहारी गेले होते, ही बाब कमीअधिक प्रमाणात सभ्य शब्दात अनेकांनी मान्य केली आहे.
हे ही वाचा:
दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!
उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?
‘योगी की कुर्बानी दे दूंगा’ अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तुलही सापडली!
आधी विरोध आता उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही!
माऊंटबॅटन जेव्हा भारतात आले तेव्हा एडविना यांचा वापर त्याने गळ टाकताना त्यावर आमीष लावतात त्याप्रमाणे केला. फाळणीच्या काळात असे निर्णय जे नेहरुंच्या गळी उतरवणे कठीण होते ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एडविना यांचा वापर करण्यात आला. फाळणीच्या पूर्वी लॉर्ड माऊंटबॅटन पत्नीसोबत सिमल्यात उन्हाळी सुट्टीसाठी जातात आणि सोबत नेहरुंना घेऊन जातात ही गोष्ट, साधी सरळ वाटत नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारत ब्रिटनला धार्जिणा राहावा यासाठी एडविना यांचा वापर झाला. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतीय सेना त्यांना यशस्वीपणे मागे रेटत होत्या. तेव्हा नेहरुंना संयुक्त राष्ट्रांत जाण्याची बुद्धी एडविना यांच्यामुळेच झाली. माऊंटबॅटन दांपत्य स्वदेशात गेल्यानंतरही नेहरुंचे हे चाळे थांबले नाहीत. ते नियमित पत्र लिहून त्यांच्याशी देशाच्या कारभाराबाबत चर्चा करत राहिले. नेहरु या बाईंच्या इतके भयंकर नादी लागले होते की, १९६० मध्ये एडविना यांचे निधन झाल्यानंतर समुद्रात होणारा त्यांचा अंत्यसंस्कार चित्रित करण्यासाठी नेहरुंनी नौदलाच्या दोन फ्रिगेट्स रवाना केल्या होत्या. देशाला बापाची मालमत्ता समजण्याची नेहरु-गांधी परिवाराची परंपरा किती जुनी आहे, हे यातून लक्षात येऊ शकते.
एडविना आणि नेहरुंच्या संबंधाबाबत बरेच काही लिहिले गेले आहे, बोलले गेले आहे. मौलाना आझाद हे काँग्रेसचे बडे नेते. त्यांनी लिहून ठेवले आहे की, नेहरुंवर एडविना यांचा प्रभाव होता. एडविना आणि माऊंडबॅटन यांचे कन्यारत्न असलेल्या
पामेला यांचे तर डॉटर ऑफ एम्पायर हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २००९ मधले एक विधान आहे. ते म्हणाले की एडविना आणि नेहरु यांच्या लफड्याचा परिणाम देशाच्या अखंडतेवर झाला. देशाची फाळणी झाली. काँग्रेसवाल्यांचे नेमके हेच दुखणे आहे. जो पत्र व्यवहार सोनिया यांनी ताब्यात घेतला आहे, त्याचे कारण हेच आहे. नेहरुंना हनी ट्रॅप करून ब्रिटीशांनी कसे वापरले त्याचा सज्जड पुरावा म्हणजे ही पत्रे. ब्रिटीश लवादानेही ही पत्रे भारताला देण्यास नकार दिला. या पत्रांमुळे भारत, ब्रिटन आणि पाकिस्तानच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद केला.
उद्धव ठाकरेंना बाळासाहेब कधी कळलेच नाही. नेहरु-एडविना प्रकरणाचे जे रडगाणे मोदींनी गाऊ नये असे विधान त्यांनी केले आहे. त्यांना बहुधा आपल्याच पित्याचा इतिहास आणि त्यांनी केलेल्या विधानांचा विसर पडलेला आहे. काँग्रेसची लफडी बाहेर पडू लागली की, त्यांचे नेते युक्तिवाद करतात की जुने मुडदे का उखाडताय? त्याच काँग्रेसचे नेते लोकसभेत लोकसभेत द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कसा कापला त्याची तद्दन खोटी गोष्ट मीठ मसाला लावून सांगतात. त्यांना आणीबाणीची आठवण करून दिली की पुन्हा हाच तर्क, कशाला जुन्या गोष्टी खणून काढताय ? परंतु हीच मंडळी संघाचा काडीचाही संबंध नसलेल्या गांधी हत्येची चर्चा मात्र वारंवार चघळत असतात. जमीनीत तुम्ही एक दाणा पेरलात, तर तुम्हाला मूठभर दाण्यांचे कणीस मिळते. भूतकाळ आणि जमिनीत हेच साम्य आहे. काँग्रेसने जे काही भूतकाळात पेरले आहे ते त्याच प्रमाणात आता त्यांच्यासमोर येते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)