शारदा मातेची पूजा करण्याची गरज काय? असा सवाल छगन भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या मंचावरून केला. भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले आरोपी आहेत. पण ही बाब विसरून अनेकदा ते समाजसुधारकाच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करतायत. ही उठाठेव समाजाच्या फायद्याची नाहीच, त्यांचाही यातून झालाच तर तोटाच होणार आहे.
भुजबळ हे शिक्षणतज्ज्ञ नाहीत, त्यांचा शिक्षण चळवळीशी कधी संबंध राहिलेला नाही, ते स्वत: उच्च शिक्षाविभूषित नाहीत, समाजसुधारक तर नाहीत नाहीत. त्यांना विद्यार्थ्यांनी कोणाची पूजा करावी हे सांगण्याचे अधिकार दिले कोणी? ते केवळ एक संधीसाधू राजकारणी आहेत.
१९९१ साली शरद पवारांनी शिवसेनेतून भुजबळांसह शिवसेनेचे काही आमदार फोडले. शिवसेनेत असताना भुजबळ, महात्मा जोतिबा फुले किंवा सावित्रीबाईंची पूजा करत नव्हते. तेव्हा नथूराम गोडसे यांचे ते निस्सीम भक्त होते. गांधींचे पुतळे हटवा आणि नथुरामचे पुतळे लावा, हे त्यांचे गाजलेले विधान आहे. परंतु ती भक्ती नव्हती निव्वळ संधीसाधूपणा होता.
पक्ष बदलल्यानंतर भुजबळ यांनी टोपी फिरवली. हिंदुत्व गुंडाळून ठेवले आणि त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या जातवादी धोरणानुसार ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी पेटवापेटवी सुरू केली. त्याच भूमिकेतून त्यांनी शाळांमध्ये शारदा मातेची पूजा कशाला सावित्री बाई फुले यांची पूजा व्हायला हवी, अशी भूमिका मांडायला सुरूवात केली. मुळात ते अशा अविर्भावात सांगत होते की सावित्रीबाईंची पूजा करायला समस्त ब्राह्मण समाजाचा विरोध आहे.
भुजबळ हे, जसा वारा वाहील तशी पलटी मारणारे क्षुल्लक राजकारणी आहेत. पूजा कोणाची करावी आणि करू नये, हे सांगण्याचा नैतिक अधिकार असलेले समाजसुधारक नाहीत. पान खाणाऱ्यांच्या सूचनेनुसार पानवाला जसा पानातल्या चुन्याचे काताचे प्रमाण बदलतो, भुजबळांचे तसे आहे. गिऱ्हाईक बदलले की चुना बदलला. शिवसेनेत असताना साडे तीन टक्क्यांत असलेल्या नथुराम गोडसे यांची ते भलामण करायचे, आता पक्ष बदलल्यामुळे त्या साडे तीन टक्क्यांच्या विरोधात ते बोलत असतात.
महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळी आहे. ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले ही सगळी मंडळी लखलखीत चारित्र्याची होती. पैसा हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय नव्हते. त्यांचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मणवादाला होता. आणि तो अत्यंत प्रामाणिक होता. बाबासाहेबांचे अनेक अनुयायी ब्राह्मण होते. फुल्यांनी मुलींची पहिली शाळा ज्या भिडे वाड्यात सुरू केली, तेही ब्राह्मणच होते. परंतु या महानुभावांनी आपले संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी वाहिले. आय़ुष्यभर जे केले ते लोकांना सांगितले. वाट्टेल त्या मार्गाने पैसे गोळा करण्याचे आणि सत्ता टिकवण्याचे धंदे करून फावल्या वेळात समाज सुधारणेच्या बाता मारल्या नाहीत.
शिवसेनेतून भुजबळ फुटले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, एकेकाळी ज्यांची द्राक्षाचा घड घेण्याची क्षमता नव्हती, त्यांच्याकडे आज द्राक्षाच्या बागा आहेत. शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांवर अप्रत्यक्षरित्या आरोप केले होते. या आरोपांना भुजबळांनीही अत्यंत शेलक्या भाषेत उत्तरं दिली होती. याच भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा पराक्रमही केला होता. कधी काळी ते या शिवसेनाप्रमुखांची सुद्धा पूजा करीत होते. पण पक्ष बदलला देव बदलला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भुजबळ फक्त द्राक्षाच्या बागांपर्यंत मर्यादित राहीले नाहीत. दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारताना त्यांनी प्रचंड मोठा आर्थिक घोटाळ्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याप्रकरणात ईडी, आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत होते. यापैकी लाचलुचपत विभागाच्या चौकशीत त्यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु हे प्रकरण संपलेले नाही. ईडीने त्यांना २०१६ मध्ये याप्रकरणात अटक केली होती. ४ मे २०१८ रोजी त्यांना याप्रकरणातून जामीन मिळाला, परंतु अद्यापि क्लीनचिट मिळालेली नाही. हे प्रकरण उकरून काढणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे. भुजबळांवरील भ्रष्टाचाराचे बालांट अजून सरलेले नाही. त्यांच्याकडे असलेला गडगंज पैसा याच भ्रष्टाचाराचा आहे, असे म्हणायला आजही वाव आहे. हाच काळा पैसा समाजात गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण करतोय. याच काळ्यापैशामुळे समाजात आज अनेक जण शिक्षण आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. एका बाजूला पैशाच्या राशी आहेत दुसऱ्या बाजूला दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे.
शाळेत कोणाची पूजा करायची हे लोक त्यांचे ते ठरवतील. भुजबळांनी अशा किती लोकांच्या शाळेत जाण्याची व्यवस्था केली याचे उत्तर त्यांनी द्यावे. भुजबळ महाविकास आघाडी सरकारच्या काळात अन्न व नागरी पुरवठा असताना केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी पाठवलेला तांदूळ विकण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या चोऱ्यांचे सूत्रधार अजून पोलिसांच्या हाती आले नाहीत. त्यामुळे वंचितांच्या वेदनांचे कारण चोऱ्या माऱ्या करणारे हे लोक आणि सरकारी तिजोरी लुटणारे भ्रष्टाचारी आहेत.
तुरुंगात असताना भुजबळांच्या छातीत वारंवार कळा येत होत्या. त्याच आधारावर त्यांना जामीन मिळाला आणि ते तुरुंगातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आणि सत्ता संजीवनीमुळे ते खडखडीत बरेही झाले. आता भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगवास भोगलेला हा आरोपी लोकांनी पूजा कोणाची करावी याचे धडे देतोय. लोक त्यांचे ऐकून टाळ्याही पिटतात. हेच भुजबळ तेलगी बनावट स्टॅंप घोटाळा झाले तेव्हा गृहमंत्री होते.
हे ही वाचा:
अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
पीएफआय सदस्यांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व
रियाज भाटीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक
आपल्या राजकीय सोयीसाठी कधी नथुरामला डोक्यावर घेणारे आज जोतिबा फुल्यांचे नाव वापरून लोकांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करतायत. पवार हे राजकीय गुरू असल्यामुळे जातीजातीतला संघर्ष हा त्यांच्यासाठीही विजयाचा फॉर्म्युला आहे. महाराष्ट्रात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नसते तेव्हा जातीतला हा संघर्ष अधिक धारधार व्हावा यासाठी पवारांचे चेले प्रयत्न करीत असतात. भुजबळांची ताजी विधाने त्याच पार्श्वभूमीवर तपासून पाहायला लागतील.
भुजबळांनी शिक्षणाबद्दल न बोललेले बरे. त्यांनी द्राक्षाचा घड घेण्याची क्षमता नसलेल्यांनी शेकडो कोटी रुपये कसे कमवावे याचे धडे द्यावेत. विद्यार्थ्यांनी पूजा कोणाची करावी आणि शाळेत फोटो कोणाचे लावावेत हे सांगण्याची तुमची क्षमता नाही आणि योग्यताही नाही.