30 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरसंपादकीयशरद पवारांच्या पाठिंब्याची चर्चा कशाला?

शरद पवारांच्या पाठिंब्याची चर्चा कशाला?

राजकारणातील व्यवहारवादाचे प्राबल्य मान्य केले तरी शरद पवारांना सोबत घेण्याची भाजपाला गरज आहे का

Google News Follow

Related

ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच भाजपाला पाठिंबा देणार, असे भाकीत काही नेत्यांनी केलेले आहे. पवारांकडे भाजपाचे कट्टर समर्थक आणि नेते वेगवेगळ्या नजरेने पाहतात. समर्थक कायम शरद पवारांवर कडवट टीका करत असतात. महाराष्ट्रात जातीवादाचे विष कालवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहातात. भाजपा नेते मात्र पवारांकडे आशाळभूतपणे पाहतायत, त्यांच्या संभाव्य पाठिंब्यावर चर्चा रंगवतायत असे चित्र वारंवार पाहायला मिळते. अजित पवार जेव्हा जेव्हा शरद पवारांना भेटतात, तेव्हा अशा चर्चांना जरा जास्तच ऊत येतो. या चर्चांची मूळात प्रश्न हा आहे की खरोखर भाजपाला शरद पवारांची गरज आहे का?

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे डेंग्युतून खडखडीत बरे झाले आहेत. डेंग्यूच्या रुग्णाला बराच काळ थकवा जाणवतो. परंतु दादांची इच्छाशक्ती इतकी जबर की त्यांनी व्हाया पुणे दिल्लीपर्यंत मजल मारली. पुण्यात शरद पवारांची भेट घेऊन थेट दिल्लीला रवाना झाले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि दिग्गज भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. अजितदादा आणि थोरल्या पवारांची भेट कौटुंबिक होती, असे म्हटले तरी चर्चा होतेच. त्यातच लगोलग अमित शहा यांची भेट झाल्यामुळे चर्चेला गरमागरम तडका लागला.

 

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विकासासाठी शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार, असा गौप्यस्फोट केला. अपक्ष आमदार रवी राणा यांनीही अजितदादांनी शरद पवारांना पटवले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. या चर्चा यापूर्वी अनेकदा रंगल्या आहेत. शरद पवारांची त्यावर ठरलेली प्रतिक्रिया असते. यावेळीही तेच झाले. अजितदादांच्या भेटीनंतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांनी सांगितले.

 

पवार भाजपा सोबत येणार असे सांगण्यात भाजपा नेत्यांना इतकी धन्यता का वाटावी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांची मोहोर उमटली नाही तर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, असे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना वाटते आहे का? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतरही थोरल्या पवारांसोबत बेरजेचे राजकारण करण्यासाठी इतकी धडपड का होते आहे.

 

पवारांनी ज्या प्रकारचे राजकारण आयुष्यभर केले, त्यांची साथ घेतल्यामुळे भाजपाची पत कमी होते, असे मत भाजपाचे कट्टर समर्थक व्यक्त करत असतात. परंतु हा प्रश्न फक्त मूल्यांचा नाही. राजकारणात मूल्यांना फार किंमत नसते. मोदी-शहा यांच्या डोळ्यात विकसित भारताचे चित्र तयार आहे. त्या दिशेने गेली ९ वर्षे त्यांची वाटचाल सुरू आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही मार्गाचे त्यांना वावडे नाही. भाबडे राजकारण करून कपाळमोक्ष करण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. तसे राजकारण त्यांनी केले असते तर आजवर काँग्रेसवाल्यांनी त्यांनी विकून खाल्ले असते. परंतु काँग्रेसच्या तोडीस तोड राजकारण करण्याची क्षमता ही या दोन दिग्गजांचे बलस्थान आहे. त्याच बलस्थानामुळे यश नेहमीच त्यांच्यासोबत असते. राजकारणातील या व्यवहारवादाचे प्राबल्य मान्य केले तरी शरद पवारांना सोबत घेण्याची भाजपाला गरज आहे का, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

हे ही वाचा:

शरद पवारांकडे पहिल्यापासूनच ओबीसी दाखला?

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

मथुरात फटाका मार्केट पेटले, नऊ जण जखमी!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

 

पवारांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. पाच दशकांच्या राजकारणात पवारांच्या आमदारांचा आकडा शंभरच्या पलिकडे कधीच गेला नाही. १९९९ मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचे ५८ आमदार निवडून आले. २००४ मध्ये ७१, २००९ ६२, २०१४ मध्ये ४१ आणि २०१९ मध्ये पावसात भिजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या.

 

आता तर त्यांचा पक्षही फुटला आहे. ९० टक्के कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी त्यांना सोडून गेलेले आहेत. वय त्यांच्या बाजूने नाही. आजारपणामुळे त्यांच्या क्षमतांना मोठी मर्यादा आलेली आहे. अलिकडे झालेल्या ग्रामपंचायचीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे शेवटून पहिले आहे. तेवढी नामुष्की थोरल्या पवारांच्या वाट्याला आली नाही इतकेच.

 

या उलट भाजपाची स्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग दोनदा शंभरावर आमदार जिंकून आणले आहेत. सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखे नेते आहेत. ही कुमक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पुरेशी आहे. फार गोतावळा घेऊन लढाईत उतरणाऱ्यांची अनेकदा नौका बुडाल्याचे इतिहास सांगतो.

 

एकहाती सत्तेचा जो चमत्कार भाजपाने उत्तर प्रदेशात दोनदा घडवला, मध्यप्रदेशमध्ये गुजरातमध्ये अनेकदा करून दाखवला ते महाराष्ट्रात का शक्य होत नाही. इथे कायम कुबड्यांचा शोध का सुरू असतो? पवारांचे राष्ट्रीय राजकारणातील औचित्य संपलेले आहे. पराभवाचे लोण बारामतीपर्यंत कधीही पोहचू शकेल अशी परिस्थिती आहे. ग्राम पंचायत निवडणुकीने त्याची झलक दाखवली आहे.

 

शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील की नाही? तो उघड असेल की छुपा, हा काथ्याकूट निरर्थक आहे. कारण पवारांचे राजकारण म्हणजे काही चांद्रयान नाही की ते ठराविक ठिकाणी लँड करेल. ते भरकटलेले मिसाईल आहे, कुठेही कोसळू शकते. तीनशे पेक्षा जास्त खासदारांचे बळ पाठीशी असलेल्या मोदींना ४ खासदार असलेल्या पवारांचा पाठिंबा किती महत्वाचा हा काही गूढ आणि गहन प्रश्न नाही. पवारांचे राजकीय वजन तोळामासा झालेले आहे. ते कुठेही असले तरी फार फरक पडणार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यावर इतका गहजब करू नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा