शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा

राष्ट्रवादी काँग्रेसचा मामला मात्र अळीमिळी गुपचिळी असा आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा

संसदेत अविश्वास ठरावाची लढाई लढली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत सुद्धा अंतर्गत राडा सुद्धा जोरात होता. महाराष्ट्रात फुटलेले हे दोन पक्ष एकमेकांना भिडलेले आहे. संसदेपर्यंत ही लढाई पोहोचलेली आहे. शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांनी सर्व सदस्यांना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी व्हीप काढला होता. हा व्हीप धाब्यावर बसवून ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी विरोधकांसोबत सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही तीच परिस्थिती होती. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्हीप न पाळणाऱ्या पाच खासदारांविरुद्ध कारवाई करणार असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मामला मात्र अळीमिळी गुपचिळी असा आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासून व्हीपचा मुद्दा गाजतोय. व्हीपचा वापर करून दुसऱ्या गटातील आमदार खासदारांचा काटा काढण्यात येईल ही भीती दोन्हीकडे होती. पक्षाचे नाव आणि निशाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट गारठला. निवडणूक आय़ोगाच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. स्थगिती मिळाली नाही. परंतु दिलासा मिळाला. फेब्रुवारी २०२३ मध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याचा दिलासा दिला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हीप त्यांना लागू होणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु हे कवच फक्त दोन आठवड्यासाठी होते. तो विषय आता संपलेला आहे.

तेव्हा प्रश्न आमदारांचा होता. आता खासदारांचा आहे. पक्षाकडून तीन प्रकारचे व्हीप काढण्यात येतात. एका ओळीचा व्हीप काढला की लोकप्रतिनिधींना शहरात हजर राहाणे बंधनकारक असते. दोन ओळीचा व्हीप काढला की, सभागृहाच्या परिसरात आणि तीन ओळीचा व्हीप काढला की सभागृहात. पक्षाचा प्रतोद व्हीप काढतो. व्हीप म्हणजे पक्षादेश. पक्षाच्या सदस्यांना तो बंधनकारक असतो.

केंद्रातील रालोआ सरकारच्या विरुद्ध जो अविश्वास ठराव विरोधकांनी आणला होता. त्याविरुद्ध मतदान करण्याचा व्हीप शिवसेनेकडून काढण्यात आला होता. खासदार भावना गवळी यांनी हा व्हीप काढला. परंतु ठाकरे गटाच्या खासदारांनी हा आदेश धाब्यावर बसवला. आता राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी कारवाईची शक्यता बोलून दाखवलेली आहे. राहुल शेवाळे अलिकडे उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अत्यंत आक्रमक वक्तव्य करत असतात. त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावाही ठोकला आहे.

व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ठाकरे गटाचा हिशोब चुकता करण्याची आणखी एक संधी मिळालेली आहे. परंतु त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभा अध्यक्षांकडे त्या पाच खासदारांविरुद्ध रितसर तक्रार करावी लागेल. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष रितसर सुनावणी घेतील. त्यानंतर कारवाई होईल. व्हीप धाब्यावर बसवणाऱ्या खासदारांची खासदारकी रद्द करण्याचे आदेश लोकसभा अध्यक्ष देऊ शकतात.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे म्हणतात, नवाब मलिक निर्दोष

१८ वर्षांपूर्वी अंतराळ सफरीचे तिकीट काढणाऱ्याचे स्वप्न झाले साकार!

आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित !

कांद्याच्या किमती येणार खाली? तीन लाख मेट्रिक टन बफरसाठ्यातील कांद्याची विक्री सुरू

शिवसेनेतील हा राडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातही पाहायला मिळाला. लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल हे शरद पवारांच्या गटाचे तर सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे. मोहम्मद फैजल आणि सुनील तटकरे या दोघांनी व्हीप काढला. मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपमधून राष्ट्रवादीचे खासदार आहेत. महाराष्ट्रातील खासदारांवर बहुधा शरद पवारांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी फैजल यांची निवड व्हीप म्हणून केली. विरोधकांनी मोदींच्या भाषणाच्या वेळी जेव्हा सभात्याग केला. तेव्हा सुनील तटकरे वगळता सर्व खासदार बाहेर पडले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये व्हीप राडा झालेला असला तरी दोघांची स्थिती मात्र वेगळी आहे. एकवेळ शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या खासदारांच्या विरोधात तक्रार होईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांपैकी कोणीही तक्रार करण्याच्या भानगडीत पडेल असे दिसत नाही. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर कारवाईची भाषा चुकून सुद्धा करताना दिसत नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version