पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही हो यांना…

बैठकीत २८ पक्षांच्या ६३ नेत्यांना पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही

पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही हो यांना…

भाजपाविरोधी I.N.D.I.A. आघाडीची दोन दिवसांची बैठक आज आटोपली. अपेक्षेनुसार बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. पहिल्या दिवशी आघाडीच्या लोगोचे अनावरण होणे अपेक्षित होते. ते आजवर ढकलण्यात आले. तेही न झाल्यामुळे आता ते पुढील बैठकीवर गेले आहे. ‘जागा वाटपाचे ठरू द्या नंतर लोगोचे बघू’, असा समंजस निर्णय बैठकीत घेण्यात आला. अगदी योग्य निर्णय, म्हणजे जागा वाटपावरून उद्या हाणामारी झाली तर लोगोवर झालेला खर्च वाया जायला नको, असा विचार असावा. बैठकीत २८ पक्षांच्या ६३ नेत्यांना पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही.

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीचे अखेर आज सूप वाजले. स्वागत सत्कार, जेवणावळी आणि फोटो सेशनच्या पलिकडे या बैठकीत तसे काही विशेष होणार नव्हतेच. कार्यक्रम पत्रिकेत काल सायंकाळी स्वागत सत्कार आटोपल्यावर लोगोचे अनावरण होणार असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कारण स्पष्ट आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर तोफ डागून आघाडीच्या बैठकीत स्वतःचा अजेंडा घुसडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक पक्षांचे नेते बिथरले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यात अदाणींसोबत काम करतायत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही अदाणींमध्ये प्रचंड रस आहे. प्रत्येक राज्याला अदाणींची गुंतवणूक हवी आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आगाऊपणामुळे बैठकीचा नूर पालटला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम, मध्यप्रदेश आदी पाच राज्यांत निवडणुका आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा निवडणुकीचा हिशोब झाल्यानंतर लोगोबाबत निर्णय घ्यावा असा आघाडीतील पक्षांचा सूर आहे. त्यामुळे संयोजकाची नियुक्तीही झालेली नाही.

बैठकीत काही तरी झाले हे दाखवणे आवश्यक होते. त्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची समितीत वर्णी लागलेली आहे.

हे ही वाचा:

जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित

नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराला राष्ट्रपतींकडून मंजुरी

पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार

भाजपाचे यंव करू आणि त्यंव करू, अशी भाषा करणाऱ्या आघाडीतील नेत्यांचे एका लोगोवर एक मत होऊ नये, यावरून पुढे काय होणार आहे, त्याचा अंदाज लोकांना आलेला आहे. अरविंद केजरीवाल यांचे काँग्रेसशी आघाडीच्या पहिल्या बैठकीपासून खटके उडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात खटके उडू नयेत यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे पुढाकार घेणार आहेत म्हणे. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान पदाचे दावेदार बनवले होते. परंतु, आघाडीत त्यांची भूमिका काय झालेली आहे पाहा. कधी काळी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे सोने वेचले त्यांच्यावर आता गोवऱ्या वेचण्याची वेळ आलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version